देशांतर्गत चाश्ल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान), बेळगाव व बंगळुरू (कर्नाटक) व घोलपूर (राजस्थान) येथील सैनिक शाळांमध्ये सहावी व  नववी इयत्तेत प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी पाचवीची तर नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांनी आठवीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते संबंधित पात्रता परीक्षा देणारे असावेत आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोमर्यादा : सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी १० ते ११ वयोगटातील तर नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी १३ ते १४ वयोगटातील असावेत. वयोमर्यादेची अट माजी सैनिकांच्या मुलांसाठी ६ महिन्यांनी शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी विविध केंद्रांवर घेण्यात येईल.
लेखी निवड परीक्षा संबंधित पात्रता परीक्षेचा शैक्षणिक अभ्यासक्रम व त्याशिवाय बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांवर आधारित असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित वर्गातील प्रवेशासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : या परीक्षांसंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय सैनिक शाळांची जाहिरात पाहावी अथवा राष्ट्रीय सैनिक शाळांच्या http://www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज संबंधित सैनिक शाळेच्या पत्त्यावर २० सप्टेंबरपूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. ज्या शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सैनिक शाळेत प्रवेश घेऊन आपले करिअर घडवायचे अशा विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा विचार करावा.