डॉ. सिद्धीविनायक बर्वे

जीवतंत्रज्ञान हे उगवतीचे शास्त्र आहे. जगभरात जीवतंत्रज्ञानाची क्रांती उलगडतेय.. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशातील जवळपास साठ टक्क्यांहून अधिक जनता उदरनिर्वाहासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून असते. जीवतंत्रज्ञान विषयातील करिअर निवडताना या विषयातील संशोधन तसेच औद्योगिक विकासाच्या नेमक्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेच ठरते. त्यात जीवतंत्रज्ञान हे एक संशोधनाधिष्ठित शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रगत आस्थापनांची गरज असल्यामुळे या पार्श्वभूमीवर आपला देश जीवतंत्रज्ञानासारखी आधुनिक क्रांती पेलू शकेल काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो.

आपला देश कृषिप्रधान असल्यामुळेच नेमकी हीच परिस्थिती भारतात वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाची प्रगती होण्यासाठी अत्यंत पोषक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जीवतंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन क्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पदविका तसेच अनेक छोटे छोटे मर्यादित कालावधीचे अनेक अभ्यासक्रम भारतातील अनेक शैक्षणिक संस्थात उपलब्ध आहेत. जीवतंत्रज्ञान ही आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा अंतर्भाव असलेली ज्ञानशाखा असल्यामुळे अनेक आंतरशाखीय विषयातील अभ्यासक्रम अनेक विद्यापीठ तसेच महाविद्यालयांतून शिकविले जातात. जीवतंत्रज्ञानाशी संलग्न सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायन शास्त्र, जीवभौतिकी शास्त्र, रेणवीय जीवतंत्रज्ञान, जीवअभियांत्रिक तंत्रज्ञान, वनस्पतीज तसेच प्राणिज जीवतंत्रज्ञान, बायोइन्फरमॅटिक्स तसेच जीनोमिक्स, प्रोटीओमिक्स अशा जीवतंत्रज्ञानांतर्गत येणाऱ्या विषयांचे अनेक अभ्यासक्रम विविध शैक्षणिक संस्थांतून शिकविले जातात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तसेच एवढी प्रचंड विविधता असलेले अभ्यासक्रम उपलब्ध असल्यामुळे नेमका कुठला अभ्यासक्रम निवडावा याविषयीही संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. म्हणून जीवतंत्रज्ञानातील प्रमुख उपयोजित ज्ञानाशाखांची व्याप्ती समजून घेतली पाहिजे.

वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाच्या वाढीस पोषक ठरणारे वातावरण. करिअर तसेच व्यावसायिकदृष्टय़ा वाढ होण्याच्या अमाप संधी आपल्या देशात उपलब्ध आहेत. यामध्ये  वनस्पतींशी निगडित तंत्रज्ञानाचा अंतर्भाव होतो. वनस्पतींशी निगडित असल्यामुळे या तंत्रज्ञानात कृषी क्षेत्रातील वनस्पतीशी निगडित असलेल्या अनेक तंत्राचाही अंतर्भाव होतो. अलीकडे शेती क्षेत्राशी निगडित जीवतंत्रज्ञानास कृषी जीवतंत्रज्ञान असंही संबोधण्यात येतं. एकूण वनस्पतींशी निगडित सर्व तंत्रज्ञानाचा समावेश वनस्पतीज जीवतंत्रज्ञानात होतो.  वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाचा अभ्यास करताना त्याअंतर्गत जीवरसायनशास्त्र, रेणवीय जीवतंत्रज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांचा अंतर्भाव होतो.

भारतातील विभिन्न प्रदेशात निरनिराळ्या प्रकारचे वातावरण आहे, त्यामुळे वनस्पतींची विपुल जीवविविधता आपल्या देशात आढळून येते. जीवतंत्रज्ञानाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हीच बाब अत्यंत महत्त्वाची आहे. या वनस्पतींचा तसेच या वनस्पतीतील जनुकांचा वापर आपण करून घेणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त जगातील इतर देशांच्या तुलनेत जवळपास वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश लाभण्याचे वरदानही भारताला लाभले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृषिक्षेत्राशी निगडित तरुण मानवी संसाधन आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन तसेच व्यवसायाची प्रचंड संधी भारताकडे उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.

वनस्पतींची मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यासाठी वनस्पतीज जीवतंत्रज्ञानात उतीसंवर्धन या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्राव्दारे एकाच प्रकारच्या वनस्पतीची प्रचंड प्रमाणात वाढ करता येणे शक्य होते. अशा प्रगत तंत्राने विकसित केलेल्या वनस्पतींव्दारे कृषीक्षेत्रातील अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊ शकते. ऊतीसंवर्धनाबरोबर रेणवीय जीवशास्त्राच्या सहाय्याने पिकांना लागणाऱ्या किडींपासून संरक्षण करणाऱ्या वनस्पतींच्या वाणांची निर्मिती केली जाऊ शकते. ऊतीसंवर्धनाद्वारे बागायती क्षेत्रातील वनस्पतींची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करून बागायती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडू शकतात.शेती क्षेत्रासोबत सुगंधी व औषधी वनस्पतींची निर्मिती वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाव्दारे करून मोठय़ा प्रमाणावर करिअरच्या संधी वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध आहेत..

वनस्पती जीवतंत्रज्ञानातील ऊतीसंवर्धन तंत्राद्वारे केळी, बागायती पिक तसेच गुलाब तसेच इतर अनेक फुलांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती केली जाते. शेती क्षेत्रात सुगंधी तसेच औषधी वनस्पतींच्या उत्पादनातून औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या वनस्पतीज घटकांची निर्मिती या तंत्राद्वारे करता येणे शक्य आहे. औषधी वनस्पतींच्या संदर्भात बोलायचे तर या क्षेत्रात वनस्पतीज जीवतंत्रज्ञानद्वारे संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहे. औषधी वनस्पतींची निर्मिती व संवर्धन हे एक मोठे आव्हान आहे. नष्ट होत चाललेली वनस्पतींची जीवविविधता वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने टिकवता येणं शक्य आहे.

वनस्पतीज जीवतंत्रज्ञानातील अभ्यासक्रम अनेक विद्यापीठं तसेच शैक्षणिक संस्थांतून उपलब्ध आहेत. वनस्पतीज जीवतंत्रज्ञानातील संशोधन करणाऱ्या अनेक प्रगत संशोधन संस्थाही भारतात आहेत. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा तसेच जीवतंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित अनेक संस्थांतून वनस्पतीज जीवतंत्रज्ञानावर संशोधन केले जाते.

भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वनस्पतीची विविधता आढळून येते, इतक्या मोठय़ा प्रमाणावर सुगंधी व औषधी वनस्पती केवळ भारतात आढळून येतात. असे असताना जागतिक स्तरावर या क्षेत्रातील उत्पादनांची निर्यात करण्यात भारतापेक्षा इतर देश दिसून येतात. यात आपल्याला बदल घडवून आणायला हवा. वनस्पतीज जीवतंत्रज्ञानातून हे साध्य करणे शक्य आहे. वनस्पतीज जीवतंत्रज्ञानाची व्याप्ती यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे.

शेती, बागायती, वन, सुगंधी व औषधी वनस्पती अशा अनेक क्षेत्रात वनस्पतीज जीवतंत्रज्ञानात करिअरच्या मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. वनस्पतीज जीवतंत्रज्ञान हा जीवतंत्रज्ञानाचा केवळ एक छोटा घटक आहे. वनस्पतीज जीवतंत्रज्ञानातील काही तंत्राची आपण ओळख करून घेतली. भारतासारख्या कृषिप्रधान देशात वनस्पतीज जीवतंत्रज्ञान नवी ‘हरित क्रांती’ घडवू शकते. जागतिक स्तरावर महासत्ता होण्यासाठी आपल्याला हे आव्हान स्वीकारायलाच हवे.