News Flash

संशोधन संस्थायण : उपकरणनिर्मितीतील कौशल्य

ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांचे संशोधन, रचना आणि विकासाला समíपत असलेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सेन्ट्रल सायन्टिफिक इन्स्ट्रमेंट्स ऑर्गनायझेशन, चंदिगड

सेन्ट्रल सायन्टिफिक  इन्स्ट्रमेंट्स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ) ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक उपकरणे व तत्सम साधनांच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५९ साली झाली असून सुरुवातीला नवी दिल्ली येथे संस्थेचे कार्यालय व प्रयोगशाळा होत्या. नंतर १९६२ साली ही संशोधन संस्था चंदिगड येथे हलवण्यात आली. संस्थेच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक उपकरणे व साधनांच्या संशोधनामुळे या क्षेत्रातील भारतीय उद्योगांना जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निश्चितपणे मोलाची मदत झालेली आहे.

  • संस्थेविषयी

ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांचे संशोधन, रचना आणि विकासाला समíपत असलेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. तसेच ती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न आहे. सीएसआयओ ही भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांच्या क्षेत्रामध्ये संशोधन करत असतानाच या क्षेत्रातील उद्योगवाढीला उत्तेजन देण्यासाठी कार्यरत असणारी एक शिस्तबद्ध, बहुआयामी आणि बहुविद्याशाखीय संशोधन आणि विकास संस्था आहे. संस्थेचा कॅम्पस अंदाजे एकूण १२० एकर एवढय़ा क्षेत्रात पसरलेला आहे. यामध्ये कार्यालयीन इमारती, संशोधन व विकास प्रयोगशाळा, इंडो-स्विस प्रशिक्षण केंद्र आणि एक गृहनिर्माण प्रकल्प इत्यादींचा समावेश आहे. संस्थेच्या सर्व प्रयोगशाळा अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहेत.

या प्रयोगशाळांमध्ये अ‍ॅग्रोनिक्स, मेडिकल इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड प्रोस्थेटिक डिव्हाइसेस, ऑप्टिक्स अ‍ॅण्ड कॉकपिट बेस्ड इन्स्ट्रमेंटेशन, फायबर / लेझर ऑप्टिक्स बेस्ड सेन्सर्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रमेंटेशन, अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स बेस्ड ट्रान्सडय़ूसर्स इत्यादी क्षेत्रांतील पायाभूत सुविधांसह उच्च प्रशिक्षित आणि उत्तम प्रशिक्षित कर्मचारी आहेत. संस्थेने अतिशय साध्या व सोप्या साधनांपासून ते अत्याधुनिक वैज्ञानिक व संशोधन उपकरणांपर्यंत अनेक प्रकारची साधने/उपकरणे संख्येने भरपूर प्रमाणात विकसित केली आहेत. तसेच त्यांच्या व्यावसायीकरणासाठी ही साधने/उपकरणे पुढे औद्योगिक क्षेत्राकडे पाठवण्यात आली आहेत. देशातील वैज्ञानिक उपकरण उद्योगाच्या विकासाकडे मोठय़ा प्रमाणात योगदान दिल्यामुळे सीएसआयओ निश्चितच उपकरणे आणि साधन उद्योगातील उच्च दर्जाची विश्वसनीयता प्राप्त करते.

  • संशोधनातील योगदान

सीएसआयओ ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांच्या संशोधन व रचनाशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे, मात्र सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेला विज्ञान क्षेत्रातील इतर शाखा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करणे आवश्यक आहे. संस्थेमध्ये होणाऱ्या या आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय  संशोधनाला (Interdisciplinary  and multidisciplinary research) वाहून घेणारे एकूण दोनशे प्रमुख संशोधक आणि त्यांचे इतर अनेक सहकारी तंत्रज्ञ आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांशी संबंधित संशोधनातील स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड डिफेन्स अ‍ॅप्लिकेशन्स, ऑप्टिक्स अ‍ॅण्ड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटेशनल इन्स्ट्रमेंटेशन, जिओ सायन्टिफिक इन्स्ट्रमेंटेशन, मेडिकल इन्स्ट्रमेंटेशन, अ‍ॅग्रो इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेंटेशन, अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रमेंटेशन, एनर्जी मॅनेजमेंट, कंडिशन मॉनीटिरग अ‍ॅण्ड क्वालिटी कंट्रोल, एन्व्हायर्नमेंटल मॉनीटिरग अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, मायक्रोइलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स अ‍ॅण्ड सेन्सॉर्स, बायोमॉलीक्युलर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड नॅनोटेक्नोलॉजी या विषयांतील वैज्ञानिक आणि औद्योगिक उपकरणे हे सीएसआयओच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. याव्यतिरिक्त संस्था, संशोधन क्षेत्रात जागतिकीकरणामुळे देशात आणि जागतिक स्तरावर होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांना अनुसरून, वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांच्या मदतीतून विविध समस्यांचे निराकरण कसे करता येईल या बाबतीमध्येही संशोधन करत आहे.

  • विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएसआयओ ही संशोधन संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक उपकरणांचे संशोधन व  विकसन या विषयांतील देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत येथे अनेक विद्यार्थी येथे पीएचडीचे संशोधन करतात. तसेच, सीएसआयओ देशातील कित्येक विद्यापीठांशी पीएचडी व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. सीएसआयओ दरवर्षी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे डिझर्टेशन वर्क (प्रकल्प संशोधन) पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी सीएसआयओमधील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेत असतात.

संस्था अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅडव्हान्स्ड इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग’ या विषयामध्ये दोन वर्षांच्या पदव्युत्तर संशोधन कार्यक्रम (पीजीआरपीई) राबवते. या क्षेत्रातील अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी सीएसआयओ ही भारतातील एकमेव संशोधन संस्था आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना  सायन्टिस्ट ट्रेनी क्यूएचएस (टी) म्हणून नियुक्त केले जाते. या अभ्यासक्रमासाठी ऑप्टिक्स, फोटोनिक्स, जैव-वैद्यकीय इन्स्ट्रमेंटेशन आणि अ‍ॅग्रोनिक्स या संशोधन क्षेत्राचा समावेश आहे.

  • संपर्क

सीएसआयआर- सेन्ट्रल सायन्टिफिक इन्स्ट्रमेंट्स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ)

सेक्टर ३० सी, चंदिगड – १६००३०

दूरध्वनी  +९१- १७२ – २६५२५०३

संकेतस्थळ  www.csio.res.in/

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2018 2:50 am

Web Title: article about central scientific institutions organization
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : कायद्याचा अभ्यास
2 कोलकात्यातील शैक्षणिक केंद्र जाधवपूर विद्यापीठ
3 भूगोलाच्या गतवर्षीय प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा
Just Now!
X