डॉ. अमृता इंदुरकर

वासलात

‘कुटुंबकलहामुळे वर्षांनुवर्षांपासून स्थगित राहिलेल्या इस्टेटीची वासलात लावली.’ एखादा लांबलेला निर्णय, कोर्ट केस प्रकरणसंबंधित प्रलंबित निर्णय, एखादे रेंगाळलेले काम इत्यादी गोष्टी जेव्हा तडीस जातात, त्यांचा निकाल लागतो तेव्हा आपण म्हणतो ‘त्या कामाची वासलात लावली’. वासलात म्हणजे निकाल, निर्णय, हिशेब हा अर्थ आपल्या परिचयाचा आहे. मूळ अरबी  ‘वासिलात्’ या स्त्रीलिंगी शब्दापासून वासलात शब्द तयार झाला आहे. वासिलात् म्हणजे एका बाबीखाली आलेल्या सर्व रकमांची जमा. यासंदर्भात इतिहासाचार्य राजवाडे यांनी खडर्य़ाच्या लढाईच्या पत्रव्यवहारातील एक उदाहरण दिले आहे- ‘तहा पासोन वासलातीचा ऐवजही माघारा देविला’. पण ‘वासलात’चे अजून बरेच अर्थ आहेत जे क्वचितच वापरले जात असतील. वसूल, जमा, उत्पन्न व त्याचा हिशोब, जमाखर्च, हिशोब लिहिताना काढावयाची एक रेघ, हकिकत, गोष्ट, खटका, काम, शेवट, फैसला, व्यवस्था, तजवीज, परिणाम, अखेर इतके वासलातचे अर्थ आहेत.

वैराण

‘वैराण वाळवंटातून प्रवास करताना दिशांचा निश्चित अंदाज येत नाही. किंवा कथा, कादंबरीतून हमखास वाचनात येणारे वाक्य म्हणजे, ‘माझ्या वैराण आयुष्यात आता कुठलाच ओलावा उरलेला नाही’. तर ग्रेस यांच्या कवितेमध्येही याचा उल्लेख येतो.  वैराण दिशांचा जोग, चांदणे नदीच्या पाण्यावर निजलेले ..

वरील पहिल्या उदाहरणांवरून वैराण म्हणजे वालुकामय निर्जल प्रदेश हा अर्थ कळतो. फारसी ‘वैरान्’वरून वैराण शब्द तयार झाला आहे. फारसीमधे वैरान् म्हणजे उद्ध्वस्त, पडीक, ओसाड, उजाड. मराठीतही हाच अर्थ जसाच्या तसा आला फक्त वैरान्मधील ‘न’ जाऊन ‘ण’ आला इतकाच काय तो बदल. कदाचित हिंदीमधील ‘विरान’ शब्द यावरूनच आला असावा. ‘हमारी पुरखों की हवेली अब वीरान हो गयीं’ कारण फारसीमध्ये ‘वैरानी’ हा शब्द गैरआबादी, नासाडी, ओसाडी यासाठी वापरला जातो.

amrutaind79@gmail.com