रोहिणी शहा

जूनमध्ये गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होत आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे दुसरे वर्ष असले तरी प्रश्नांचे स्वरूप आणि काठिण्य पातळी समजून घेण्यासाठी सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण उपयुक्त ठरू शकते. अर्थव्यवस्था घटकाच्या तयारीच्या दृष्टीने सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.

सन २०१८च्या पेपरमध्ये अर्थव्यवस्था घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे –

* प्रश्न १. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते अशा प्रकारे दोन भागांत विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपकी कोणते दोन स्रोत / मार्ग आहेत?

अ. बा कर्ज ब. कर महसूल

क. अल्प बचती  ड. करेतर महसूल

पर्यायी उत्तरे –

१) अ आणि ब   २) ब आणि ड

३) क आणि ड   ४) अ आणि क

* प्रश्न २. भांडवली वस्तू उद्योग व पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?

१) एस. व्ही. एस. राघवन प्रतिमान       २) चक्रवर्ती प्रतिमान

३) केळकर प्रतिमान              ४) महालनोबिस प्रतिमान

* प्रश्न ३. खालील विधाने विचारात घ्या.

अ.   मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.

ब.   आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.

क.   बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे.

वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब   २) ब आणि क

३) अ आणि क   ४) वरील सर्व

*     प्रश्न ४. खालील विधाने विचारात घ्या.

अ.   शिलकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.

ब.   तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

क.   भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.

वरीलपकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?

पर्यायी उत्तरे –

१) अ आणि ब   २) ब आणि क

३) फक्त ब      ४) फक्त क

*     प्रश्न ५. खालील विधाने विचारात घ्या.

अ.   लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही.

ब.   लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम / निर्णायक स्वरूपाचा नसतो.

क.   लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो.

वरीलपकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?

पर्यायी उत्तरे –

१) फक्त अ           २) ब आणि क

३) फक्त क           ४) अ, ब आणि क

*     प्रश्न ५. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या.

अ.   पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.

ब.   दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.

क.   तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण व औद्योगिकीकरण जलद होते.

ड.   १९२१ नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला.

वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?

पर्यायी उत्तरे –

१) अ आणि ब   २) ब आणि क

३) क आणि ड   ४) वरील सर्व

सन २०१८च्या पेपरमधील अर्थव्यवस्था घटकाच्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील बाबी समजून घेणे आवश्यक आहे –

*    अर्थव्यवस्था घटकाच्या राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण अशा सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

*    अभ्यासक्रमात स्पष्टपणे नमूद नसल्या तरी पंचवार्षकि योजनांवर प्रश्न विचारलेला आहे.

*    शासकीय अर्थव्यवस्थेचा आणि दारिद्रय़ निर्मूलन/ रोजगार निर्मितीचा भाग म्हणून विविध योजनांवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमात उल्लेख नाही म्हणून जुन्या योजनांचा अभ्यास सोडून देता येणार नाही.

*    सन २०१८मध्ये तथ्यात्मक प्रश्नांची संख्या नगण्य आहे आणि संकल्पनात्मक प्रश्नांवर जास्त भर देण्यात आला आहे.

*    मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांसाठी संकल्पनात्मक प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा आत्मविश्वासाने प्रश्न सोडविता येतील अशा प्रकारची आहे.

*    बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त असली तरी प्रश्नांचे स्वरूप हे प्रत्येक विधान सत्य किंवा चूक / बरोबर आहे का हे स्वतंत्रपणे तपासणारे असे आहे. दिलेली विधाने काही वेळा एकाच मुद्याच्या अंतर्गत येत असली तरीही त्यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध नाही अशा प्रकारचा बहुविधानी प्रश्नही विचारण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नांची लांबी जास्त असली तरी बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा सर्वागीण अभ्यास झाला असेल तर ते सोडविताना ताण येणार नाही.

*  एकूण प्रश्नांचे स्वरूप व त्यांमधील मुद्दे पाहता अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे, कायदेशीर तरतुदी, योजनांचे स्वरूप इत्यादी पारंपरिक मुद्दे आणि लोकसंख्या, अर्थसंकल्प, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्रय़, रोजगार इत्यादी महत्त्वाच्या मुद्दय़ांची अद्ययावत आकडेवारी व चालू घडामोडींबाबतची संकल्पनात्मक व तथ्यात्मक माहिती अशी या घटकाच्या तयारीची चौकट असायला हवी.