स्क्री नरायटर अर्थात पटकथालेखक हा आपल्या कल्पनाशक्तीद्वारे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, अ‍ॅनिमेशन व्हिडीयो आणि व्हिडीयो गेम्सची निर्मिती करतो. पटकथालेखकाला स्वतंत्रपणे कल्पना विकसित करता येते अथवा एखाद्या सत्यघटनेवर आधारित कादंबरी, नाटक, कॉमिक बुक लिखाणाकडेही त्याला वळता येऊ शकते. या क्षेत्रात तुमची शैक्षणिक अर्हता लक्षात घेतली जात नाही तर या क्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी तुमची कथाकथनाची शैली, क्षमता आणि तुमच्या कल्पनाशक्तीचा विस्तार आणि खोली महत्त्वाची ठरते.
मात्र, या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी तुमची पटलेखनविषयक कौशल्ये विकसित करण्याकरता तसेच एखादी गोष्ट पटकथेत
रूपांतरित कशी करता येते, याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम शिकणे अत्यावश्यक आहे.
इतर व्यवसायांसारखेच या क्षेत्रातही कामासंबंधीचे पॅशन आवश्यक आहे. मेहनत आणि सर्जनशीलता या दोन्ही वृत्ती अत्यावश्यक ठरणाऱ्या या क्षेत्रात आखून दिलेल्या मुदतीत सर्जनशील लिखाण केल्यानेच यश नजरेच्या टप्प्यात येते. या क्षेत्रात लिखाणासोबतच सर्जनशीलता, वेगाने काम करता येणे, लवचीकता, लक्ष केंद्रित करून काम करण्याची वृत्ती आणि तुमचे म्हणणे समोरच्या समोर नीट मांडता येण्यासाठी संवादकौशल्ये आवश्यक असतात. हेही लक्षात घेतलं पाहिजे की, अमुक एका वेळात सर्जनशीलपणे काम करणे आवश्यक ठरल्याने तुमच्यावर साहजिकच कामाचा दबाव व ताण येतो.
एखादा चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका अथवा नाटक पाहताना, त्यामागचे पटकथालेखकाचे सर्जनशील मन आपल्याला जाणवत राहते. गोष्टीचा पाया रचणे, आराखडा उभा करणे आणि तो विकसित करण्याची मोलाची कामगिरी पटकथालेखकाची असते.

पटकथालेखनाची प्रक्रिया
बव्हंशी कथा आणि पटकथांची सुरुवात व्यक्तिरेखांच्या बांधणीतून होते. या व्यक्तिरेखा एखाद्या पटकथेचा कणा असतात, त्यांच्याशिवाय कथा विकसित करणे शक्य नसते. त्याकरता सविस्तर संशोधन आवश्यक असते आणि प्रत्येक व्यक्तिरेखा ही अत्यंत बारकाईने विकसित करावी लागते. त्या व्यक्तिरेखेच्या नावासहित, तिचं अल्पचरित्र, माहिती, त्या व्यक्तिरेखेचे ध्येय, महत्त्वाकांक्षा, भावना आणि व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढाव्या लागतात.
एकदा का त्यातील व्यक्तिरेखांचा आराखडा तयार झाला की मग पटकथा लिहिणे सुरू करता येते. प्रत्येक पटकथा लिहिण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. एखादा पटकथालेखक आधी संपूर्ण आराखडा सविस्तर मांडून मग पटकथा लिहिण्यास सुरुवात करेल, काही जण लिहायला सुरुवात करतील आणि मग ती कथा उत्तरोत्तर विकसित होत जाईल.. या सर्व प्रक्रियेला एखाद्या महिन्यापासून कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो. काही जण आपल्या आयुष्यभरात एखादीच अव्वल कथा लिहितात.
पटकथेचा पहिला कच्चा मसुदा तयार झाला की, पटकथालेखकाला त्याची उजळणी, पुनर्माडणी करावी लागते, त्याचे संपादन करावे लागते. जोपर्यंत पटकथा अचूक झाली आहे, याची खात्री पटकथालेखकाला होत नाही तोपर्यंत असे फेरफार तो अनेकदा करत राहतो. जेव्हा पटकथा पूर्ण होते, तेव्हा ती निर्मात्यांना विकण्याचे लेखकाचे प्रयत्न सुरू होतात.

या क्षेत्राचे स्वरूप
पटकथालेखनातून सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि त्यामुळे कामाचे- नवनिर्मितीचे समाधान मिळते, लोकप्रियता लाभू शकते. खूप लोकांपर्यंत पोहोचता येते. या कामात तुमच्या वाटय़ाला टीका येऊ शकते. मानसिकरीत्या अत्यंत तणावाचे आणि थकवणारे असे हे काम आहे. या क्षेत्रात अनेकदा दडपणाखाली काम करावे लागते.

या क्षेत्रातील प्रवेशासाठी..
पटकथालेखनाच्या करिअरमध्ये स्वत:ला सिद्ध करू इच्छिणाऱ्यांनी तुमचे ध्येय, महत्त्वाकांक्षा आधी निश्चित करायला हवी, जेणेकरून संबंधित अभ्यासक्रमाला तुम्ही न्याय देऊ शकाल.
या क्षेत्रात करिअर करायचे निश्चित केल्यानंतर, तुम्हाला देशभरातील स्क्रीनरायटिंग या स्पेशलायझेशनच्या अनेक पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. त्यात फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन ऑफ इंडिया, आर के फिल्म्स अ‍ॅण्ड मीडिया अ‍ॅकॅडमी, इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह एक्सलन्स अशा आघाडीच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

आवश्यक कौशल्ये
पटकथालेखनाच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांकडे अफाट कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, श्रवणकौशल्य, नावीन्यपूर्णता आणि सर्जनशीलता, कथाकथनाची उत्तम क्षमता, संशोधनाची हातोटी असावी लागते.
पटकथालेखकाचे तासातासाचे वेळापत्रक असते. घरून काम करणारा फ्रीलान्स लेखक त्याचे कामाचे तास आखू शकतो, पण जर लेखक एखाद्या स्टुडिओस्थित लिखाणाच्या टीमचा घटक असेल तर त्याला ठरलेल्या कार्यालयीन वेळा पाळाव्या लागतात. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे काम पूर्ण करण्याची मुदत काटेकोरपणे पाळावी लागते. घरून काम करा अथवा कार्यालयात काम करा, तुम्हाला सतत पटकथा संपादक, निर्माते, मध्यस्थ यांच्याशी चर्चा करण्यासाठी संपर्कात राहावे लागते.

 

– अपर्णा राणे