विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – मेलबर्न विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे. तसेच २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले एकोणचाळिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कव्हिले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेतMay I grow in the esteem of future generations  हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडेचार हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारांपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न शंभरांहून अधिक संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटी-मोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत.

अभ्यासक्रम – मेलबर्न विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे पूर्णवेळ आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम एक वर्षांपासून ते चार वर्षांपर्यंतच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या चारशे एवढी आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये एकूण दहा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील आíकटेक्चर, बिल्डिंग अ‍ॅण्ड प्लॅनिंग, आर्ट्स, बिझनेस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, इंजिनीअिरग, फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड म्युझिक, लॉ, मेडिसिन, डेंटिस्ट्री अ‍ॅण्ड हेल्थ सायन्सेस, सायन्स, व्हेटर्नरी अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर सायन्सेस या दहा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या विभागांशिवाय विद्यापीठाच्या वॉल्टर अ‍ॅण्ड एलिझा हॉल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रिसर्च, फ्लोरी इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन ह्यूमॅनिटीज, इन्स्टिटय़ूट फॉर फ्रंटियर लाइफ अ‍ॅण्ड मेडिकल सायन्सेस, इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड एनर्जी, रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर न्युरोसायन्स अ‍ॅण्ड मेंटल हेल्थ, द मेलबर्न इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक अ‍ॅण्ड सोशल रिसर्च, ग्रॅटन इन्स्टिटय़ूट’ या विद्यापीठाशी संलग्न मात्र स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या नामांकित संशोधन संस्था आहेत.

सुविधा – मेलबर्न विद्यापीठाचा पार्कव्हिले येथील मुख्य कॅम्पस म्हणजे आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांनी सज्ज असे एक छोटे शहरच आहे. विद्यापीठाच्या या परिसरामध्ये एकूण वसतिगृहे, बारा ग्रंथालये, बारा म्युझियम, आठ रुग्णालये, कॅफे, अद्ययावत जिम्स, बगीचे, सुपरमार्केट, इतर ब्रँडेड दुकाने, संशोधन संस्था, ज्ञानाधिष्ठित उद्योगांची औद्योगिक वसाहत आहेत. विद्यापीठाकडून विविध स्वरूपात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आíथक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात आणि ‘ऑन कॅम्पस जॉब्ज’ यांसारख्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हेल्थ सíव्हस सेंटर, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा आणि वर्क परमिट यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला वाहून घेतलेले विविध क्लब्ज आहेत.

वैशिष्टय़

मेलबर्न विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे. त्या देशातील सर्वाधिक म्हणजे दहा नोबेल पुरस्कार या विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांना मिळालेले आहेत. विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थ्यांपकी ३६ टक्के विद्यार्थी हे १३० पेक्षाही अधिक देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. विद्यापीठाच्या एकूण माजी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास चार लाख एवढी आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होतो. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे प्रमाण ९८ टक्के एवढे उत्कृष्ट आहे. त्या निकषामध्ये विद्यापीठाचा जगामध्ये सातवा क्रमांक आहे. पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरील विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून इंटर्नशिप्सची संधी दिली जाते. त्यासाठी विद्यापीठाने १६०० पेक्षाही अधिक कंपन्या वा संस्थांबरोबर स्वत:ला जोडून घेतलेले आहे.

–itsprathamesh@gmail.com संकेतस्थळ –   https://www.unimelb.edu.au/