केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या डीबीटी-बायोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम- २०१५-१६ या विशेष योजनेंतर्गत बायोटेक्नॉलॉजी उद्योग आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक समन्वय साधण्याच्या उद्देशाने खालील योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश बायोटेक्नॉलॉजी व पशूू-विज्ञान विषयात नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित उद्योगात थेट वा प्रत्यक्ष कामाच्या सरावाद्वारे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास साधणे हा आहे.
 शैक्षणिक अर्हता
अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१४ अथवा २०१५ या शैक्षणिक सत्रात बीई, बीटेक, एमएस्सी, एमटेक, एमव्हीएससी यांसारखी पात्रता किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची संगणकीय पद्धतीने निवड चाचणी घेण्यात येईल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्या आधारे त्यांची या प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल.
प्रशिक्षण कालावधीत पाठय़वेतन योजनेंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी- उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान दरमहा १० हजार रुपये पाठय़वेतन केंद्र सरकारतर्फे देण्यात येईल. ज्या औद्योगिक कंपन्या या कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यावर उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरीत सामावून घेण्याचे कसलेही बंधन नाही. उलट सहभागी उद्योग-संस्थांना त्यांनी प्रशिक्षित केलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार त्यांना प्रशिक्षण राशी स्वरूपात निर्धरित रक्कम देय असेल.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ‘बायोटेक कन्सोर्टियम इंडिया लि., नवी दिल्ली’ यांच्या नावे असणारा आणि नवी दिल्ली येथे देय असलेला ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवावा.
अधिक माहिती
प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची डीबीटी-बायोटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्रॅम २०१५-१६ ची जाहिरात पाहावी अथवा http://www.bcil.nic.in/bitp2015/index.asp किंवा http://www.bcil.nic.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज मनोज गुप्ता, मॅनेजर, बायोटेक कन्सोर्टियम इंडिया लिमिटेड,पाचवा मजला, अणुव्रत भवन, २१०, पं. दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०००२ या पत्त्यावर १० मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.