शिक्षक पात्रता परीक्षेचा संदर्भग्रंथ
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (पहिली ते आठवीच्या व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित/ विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी) ही परीक्षा यंदापासून अनिवार्य करण्यात आली आहे. या पुस्तकात या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा – बालमानसशास्त्र व शिक्षणशास्त्र (अध्यापन), मराठी भाषा, व्याकरण व अध्यापनशास्त्र, इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड मेथडोलॉजी, गणित व अध्यापनशास्त्र – विज्ञान, पर्यावरण, इतिहास – नागरिकशास्त्र व भूगोलासह या विषयांच्या घटक व उपघटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गुण विभागणीनुसार प्रत्येक घटकांवर स्पष्टीकरणासह सराव प्रश्नसंचही देण्यात आले आहेत. परीक्षार्थीना आगामी परीक्षेच्या स्वरूपाची नेमकी कल्पना यावी, यासाठी तीन सराव प्रश्नसंचही देण्यात आले आहेत.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – शैक्षणिक व बालमानसशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन, शैक्षणिक व्यवस्थापन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, प्राथमिक शिक्षण आणि समाजाचा सगभाग, नव्या सहस्रकातील प्राथमिक शिक्षण, कृतिसंशोधन प्रक्रिया व नवे उपक्रम या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा, व्याकरण व अध्यापनशास्त्रात आकलन, संवाद कौशल्य, मराठीच्या पाठय़पुस्तकांचे ज्ञानशास्त्रीय विश्लेषण, संबोधांची मांडणी, अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे, भाषा विषयाची विशिष्ट अध्ययन पद्धती, अध्यापनाचे नियोजन व मूल्यमापन, सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न, भाषा व व्याकरण.
इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड मेथडोलॉजी – इंग्रजी भाषा शिकवण्याच्या अध्ययन पद्धती व तंत्रे, दृष्टिकोन, संवाद लेखन, उतारा लेखन, संभाषण, व्याकरण शिकविण्याच्या पद्धती, भाषा कौशल्य, वाचन कौशल्य अवगत होण्यासाठीच्या पद्धती इत्यादी.
गणित व अध्यापनशास्त्र – गणिताचा अभ्यास करण्याचे सूत्र, विभाज्यतेच्या कसोटय़ा, बैजिक राशीची सूत्रे, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाची सूत्रे, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, मसावि व लसावि, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा सरासरी, वयवारी, बँका, पोस्टाचे व्यवहार, शेअर बाजार, विक्रीकर, आयकर, मूल्यवर्धित कर, बीजगणित, भूमिती, गणित व अध्यापनशास्त्र.
परिसर अभ्यास आणि अध्यापनशास्त्रामध्ये परिसर अभ्यास, पर्यावरण, सामान्य विज्ञान, महाराष्ट्रातील संत, शिवाजी व शिवकाल, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल – महाराष्ट्र, भारत, जग व अवकाश, परिसर अभ्यास प्रश्नसंच.
शिक्षक पात्रता परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या परीक्षार्थीना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल, अशी याची रचना करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा – गोपाल दर्जी, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, मूल्य – ४४० रु.

मानवी हक्क चळवळीचा वेध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर – ३च्या सुधारित अभ्यासक्रमावर बेतलेले ‘मानवी हक्क’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आहे. यात संबंधित अभ्यासक्रमाची मुद्देसूद मांडणी करण्यात आली आहे. आकलन सुलभ व्हावे, म्हणून योग्य तिथे तक्ते आणि आकृत्यांसह स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित विषयातील अद्ययावत आकडेवारीसह ताज्या घडामोडींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षार्थीखेरीज विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, विद्यार्थी, मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
या पुस्तकात मानवी हक्क विकास, बाल विकास, महिला विकास, युवा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्टय़ा वंचित वर्गाचा विकास, वृद्ध व्यक्तींचा विकास, कामगार कल्याण, अपंगांचे पुनर्वसन, विकास प्रकल्प अथवा नैसर्गिक आपत्तींमुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण, मूल्ये व नीतितत्त्वे अशा विविध प्रकरणांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
१९ व्या शतकात सुरू झालेली मानवी हक्क चळवळ आणि २० व्या शतकात या चळवळीचा प्राधान्याने करण्यात आलेला पुरस्कार तसेच शासनसंस्था, न्याययंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था या सर्व स्तरांवर मानवी हक्कांची होणारी जपणूक याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
मानवी हक्क – दत्ता सांगोलकर, जिज्ञासा प्रकाशन, पुणे. पृष्ठे २२८, मूल्य – १६५ रु.