13 August 2020

News Flash

करोनोत्तर आव्हाने : सजग होणे गरजेचे

करोनासंदर्भातील संशोधन क्षेत्रात तर अजूनच वेगळे दृश्य पाहायला मिळते

डॉ. श्रीराम गीत, करिअर समुपदेशक

करोनानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी कशा बदलत जातील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  टाळेबंदीच्या काळातील ठप्प झालेले व्यवहार आणि अर्थचक्रातील बदल पाहता त्या रास्तही आहेत पण पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. पुढच्या काळातील करिअरचा मार्ग कसा असेल, याविषयी विविध विषयांतील तज्ज्ञांनी लिहीलेली ही लेखमाला..

करोनानंतरचे वास्तव अजून कोणालाच माहीत नाही. करोनाबरोबरचे युद्ध किंवा करोनाबरोबरच सहजीवन यावर विविध अंगाने घनघोर चर्चा होऊ शकते. मात्र करिअर वृत्तान्तच्या वाचकांच्या दृष्टीने गेल्या दशकातील शिक्षण (पदव्या) कसे असेल व ज्यातून हाती काय लागेल हा यक्षप्रश्न बनणार आहे, एवढे मात्र नक्की. कारण साधेसे आहे. येत्या वर्षां दोन वर्षांत किमान २५ ते ३५ टक्के नोकऱ्या एकतर नष्ट होतील किंवा त्यातील कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलत जाईल. या बदलाला सामोरे जाणे सोपे नाही. त्यासाठी येत्या सहा- सात वर्षांमध्ये शिकण्याच्या वयोगटातील म्हणजे यंदा दहावी पास होणाऱ्यांपासून पहिली पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने सजग व्हायला हवे. म्हणजे नेमके काय करायचे?

आपण गेल्या ६० दिवसातील घरबंदीचे उदाहरण घेऊन हाच विषय विविध अंगांनी पाहिला तर? वृत्तपत्र, बातम्या, विश्लेषण व लेख यामध्ये रस असणाऱ्या अनेकांच्या लक्षात आले असेल की करोनासंदर्भात संख्याशास्त्र, साथींचा इतिहास, विषाणूंचा अभ्यास, समाजमनाचा अभ्यास, राज्यशास्त्रीय व घटनात्मक निर्णय, आंतरराष्ट्रीय ताणतणाव, यातून येणारे अर्थकारण या प्रत्येकाला जितके महत्त्व आले तितके महत्त्व कोव्हिड योद्धे म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर्स व त्यांच्या मदतनीसांना मिळाले काय? मात्र त्यांच्या कामाचे फक्त कौतुक होत राहिले हे मात्र खरे.

करोनासंदर्भातील संशोधन क्षेत्रात तर अजूनच वेगळे दृश्य पाहायला मिळते. रसायनशास्त्रातील, औषधनिर्माण शास्त्रातील बायोटेक किंवा जेनेटिक्समधील भिंती पूर्णत: नष्ट झालेल्या सहज लक्षात येते. त्याचवेळी उपयोजित संशोधनाची मागणी प्रचंड वाढली. उदाहरण म्हणजे पीपीई सूट व मास्क यांची निर्मिती. व्हायरसला परिपूर्ण प्रतिबंध करून या दोन गोष्टींची निर्मिती सोपी नाही याचाच अर्थ संशोधनाचे विविध मार्ग असतात, पण त्याचे उपयोजन तितकेच महत्त्वाचे असते.

शिक्षण, कला क्षेत्र, मनोरंजन या तीन क्षेत्रात तर आमूलाग्र बदल या दोन महिन्यात साऱ्यांनीच अनुभवले आहेत. त्यातून ही तीनही क्षेत्रे अक्षरश: नव्याने कात टाकून उभी राहतील. त्यात होणारे बदल समजायला अजून काही महिने जावे लागणार आहेत हे मात्र नक्की. ट्रॅव्हल, हॉटेल, केटरिंग, इव्हेंटस, विमानसेवा या उद्योगांना मात्र सावरायला किती वेळ लागेल हे माहीत नाही.

या साऱ्यातून म्हणजेच करोनाच्या २०२० मधल्या मंथनातून दोन गोष्टी  सुस्पष्ट  होऊन पुन्हा अधोरेखित होत आहेत. पहिली म्हणजे आवडीचा विषय, त्याचेच फक्त शिक्षण, त्यातील पदव्या घेऊन बाहेर पडणारे निरुपयोगी ठरणार आहेत. आनुषंगिक उपयोजन व त्यासाठीचे कौशल्य मिळविणे ही सर्वात महत्त्वाची गरज राहणार आहे. दुसरी त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे, याआधी त्यासाठी सजगपणा असा शब्द वापरला होता. सजगपणाचा सोपा अर्थ म्हणजे, ‘हे माझे काम नाही हे’ वाक्य विसरून ‘जिथे काही कमी तिथे मी’ ही वृत्ती अंगी बाणवणे. घरबंदीच्या काळात घरोघरी ही शिकवण अनेकांना मिळाली आहेच. त्याचे वर्णन इथे नको.

थोडक्यात स्पेशालिस्ट, कन्सल्टंट, अ‍ॅडव्हायजर अशा बिरुंदांऐवजी सर्वसमावेशक जनरॅलिस्टसाठी येता काळ आश्वासक असणार आहे. ज्यांचे शिक्षण संपत आले आहे, यंदा हाती पदवी येणार आहे त्यांना हे जास्त लागू पडते. अधिक काय शिकू याऐवजी प्रथम काम शिक, अनुभव घे व त्यानंतर पुढचा विचार कर हे येत्या तीनचार वर्षांत गरजेचे राहील. ज्या प्रगत देशात शिक्षणासाठी, स्थायिक होण्यासाठी इथले सारेच उत्सुक असतात. तिथले गेल्या ५० वर्षांचे वास्तव हेच सांगते. मात्र परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फी रूपी डॉलर्ससाठी त्यांचे स्वागत होत असते. असे सारेच देश कोलमडले, भोवंडले आहेत. म्हणून हा उल्लेख.

येत्या काळात सामान्यज्ञानाऐवजी व्यवहारज्ञानावर भर देणारा प्रगती करत राहणार आहे. इंग्रजी गप्पांऐवजी इंग्रजी संवाद कौशल्यावर प्रभुत्व असलेली अनेक ग्रामीण मुले आज आयटी इंडस्ट्रीत पाय रोवून उभी आहेत. याउलट निव्वळ छान छान कॉलेज व छान मार्ग आणि कॅम्पस यातून निवडले गेलेले अनेकजण नोकरी राहील का जाईल, या चिंतेत आहेत.

इंटरनेट हे माहिती, ज्ञान मिळवण्याचे आणि सुलभ संवाद साधण्याचे माध्यम आहे, वेळ घालवायचे साधन नाही हे कळणारे चौकस, सजग विद्यार्थी यातून रस्ते शोधत आहेत. पुरेशा कष्टांसह त्यांना ते नक्की सापडतील.

या साऱ्याबद्दल अधिक नेमकेपणाने व विस्ताराने पुढच्या लेखातून पाहू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 1:41 am

Web Title: career challenges after coronavirus zws 70
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : टोक्यो ऑलिम्पिक्स, पॅरालिम्पिक्स
2 एमपीएससी मंत्र : आधुनिक जगाचा इतिहास
3 एमपीएससी मंत्र : फिफा युवा महिला विश्वचषक
Just Now!
X