देशातील नामांकित औषध संशोधन प्रयोगशाळापकी एक असलेल्या लखनौच्या सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूटची ओळख करून घेऊ या. संस्थेतील विविध अभ्यासक्रम आणि संशोधनकार्याची सविस्तर माहिती-

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात स्थापन झालेल्या काही निवडक औषध संशोधन प्रयोगशाळांपकी एक म्हणजे लखनौची सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट. देशातील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या ३८ प्रयोगशाळांपकी एक असलेल्या या संशोधन संस्थेची स्थापना १७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाली.
जैवविज्ञान शास्त्रातील संशोधनात अग्रणी असलेल्या या संशोधनसंस्थेत औषधी द्रव्यांच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पाडणारे अत्याधुनिक अतिकुशल तंत्रज्ञान उपलब्ध आहे. दुर्धर रोगांशी सामना करण्यासाठी आवश्यक औषधी द्रव्ये बनविण्यासाठी अपेक्षित असणारी अद्ययावत तंत्रशुद्ध कार्यपद्धती येथे उपलब्ध आहे.
सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट या बहुशाखीय संशोधन प्रयोगशाळेत जैव विज्ञानातील तज्ज्ञ मनुष्यबळ वेगवेगळ्या संशोधन, तांत्रिक सहकार्य अशा कार्यासाठी विभागले गेले आहे.
संस्थेची उद्दिष्टे
० निदानोपयोगी नवनवीन औषधी द्रव्यांचे विकसन.
० रोगनिर्मिती व त्याचा शरीरातील प्रादुर्भाव याच्या निदानासाठी पेशीय अभ्यास.
० संततीनियमनासाठी प्रभावी औषधीद्रव्यांचे विकसन.
० औषधी द्रव्यनिर्मिती तंत्राचे विकसन.
० तांत्रिकदृष्टय़ा उपयुक्त अशा मनुष्यबळाचे विकसन.
० कर्करोगाच्या विविध प्रकारांतून संशोधन.
संस्थेतील संशोधनकार्य
० स्तनांच्या कर्करोगाला अटकाव करणाऱ्या रसायनग्राही द्रव्यांचा अभ्यास.
० कर्करोगविरोधी औषधी द्रव्यांचा रोग्याच्या शरीरावरील परिणाम.
जैव संशोधनाचे लक्ष्य
कर्करोगाच्या विविध प्रकारातील संशोधन. हृदयाशी तसेच केंद्रीय चेतासंस्थेसंबंधीत रोगांवर औषधी द्रव्यांचे विकसन.                                 
  संस्थेतील मानवी आरोग्य संदर्भातील संशोधन  
सी.डी.आर.आय.मधील मानवी पुनरुत्पादन क्षमतेबाबतचा अभ्यास मुख्यत्वे स्त्री-पुरुषांनी वापरावयाची गर्भनिरोधक औषधी द्रव्ये, शुक्रजंतूंना निष्प्रभ करणारी गर्भनिरोधके, हाडांचा ठिसूळपणा नियंत्रित करणारी औषधी द्रव्ये, स्त्रियांमधील स्तनांचा कर्करोग, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथींची अनावश्यक वाढ या विषयांवर केंद्रित आहे.   
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार, जागतिक स्तरावर आजही गर्भपाताच्या सोयीसुविधा म्हणाव्या तितक्या लोकाभिमुख व सुकर झालेल्या नाहीत. परिणामस्वरूप, गर्भपाताच्या किंवा गर्भधारणा नियंत्रणाच्या अयोग्य पद्धतींमुळे जगात मोठय़ा प्रमाणावर स्त्रिया मृत्युमुखी पडत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या समन्वयाने सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये प्रभावी गर्भनिरोधक औषधी द्रव्ये व साधने, स्त्रियांमधील रजोनिवृत्तीनंतरचे आजार, स्त्रियांमधील स्तनांचा कर्करोग यावर संशोधन करणारा दूरलक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. तसेच स्त्री-पुरुषांमधील जननक्षमता नियंत्रित करणाऱ्या अंतस्त्रावी  ग्रंथींचा अभ्यासही सुरू आहे.
सूक्ष्म जिवाणूंमुळे निर्माण होणाऱ्या
आजारांवरील संशोधन
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, आजही क्षयरोगाची लागण होऊन लाखो लोक जगात दरवर्षी दगावतात. या रोगावरील उपचारपद्धतीला लागणारा वेळ हा खूप जास्त असल्याने, बऱ्याचदा रुग्णाकडून औषधयोजनेत हलगर्जीपणा झाल्यामुळे रोगाचे स्वरूप अजूनच क्लिष्ट रूप धारण करते. या आरोग्यविषयक प्रश्नावर उपाय म्हणून क्षयरोगावरील कमी कालावधीची, अधिक सुकर पण त्याच वेळी अधिक प्रभावी  औषधयोजना अस्तित्वात आणणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. अर्थात या कामात संस्थेतील जैवशास्त्रज्ञ, रसायनतज्ज्ञ (केमिस्ट), औषधनिर्माणशास्त्रज्ञ (फार्मास्युटिस्ट) या सर्वाचा सक्रीय सहभाग आहे. तसेच बुरशीजन्य, विषाणूजन्य संक्रमक रोगांवरही संशोधन सुरू आहे.
सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट ही सुरवातीपासूनच जैव विज्ञानातील संशोधनासाठी भारतातील अग्रणी संस्था मानली गेली आहे. संस्थेतील अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग एकंदरीतच मानवजातीसाठी, मुख्यत्वे करून देशाच्या जनतेसाठी निदानोपयोगी औषधी द्रव्ये, रोगांशी लढा देणाऱ्या  प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या विविध लशींचे निर्माण करण्यासाठी केला जातो.  
संस्थेतील शिक्षणाच्या संधी
पीएच.डी. शिक्षणक्रम –
नवनवीन परिणामकारक औषधी द्रव्यांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण आणि अनुकूल संधी पुरवल्या जातात. जैवविज्ञानाच्या व विज्ञानाच्या ज्या शाखांमधून संशोधनाची संधी मिळते, त्या पुढीलप्रमाणे-
जैवरसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, निदानीय (क्लिनिकल) आणि प्रायोगिक (एकस्पिरीमेन्टल) औषधी द्रव्ये, औषधी द्रव्यांचे निर्माण व विकसन अंतस्राव विज्ञान, किण्वन प्रक्रिया, औषधी रसायन शास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र,  रेण्वीय (मोलेक्युलर) संरचनात्मक जीवशास्त्र, परजीवी विज्ञान, औषध निर्माण विज्ञान, विविध औषधी द्रव्यांचा शरीरावर व चयापचय संस्थेवरील परिणाम, औषधशास्त्र, विषशास्त्र.
संस्थेतील या शिक्षण कार्यक्रमामागे विद्यार्थ्यांमधील संशोधनक्षमता वाढवून नवनवीन उपयुक्त, जनसामान्यांना परवडण्यासारखी औषधे किंवा त्यासाठीच्या तंत्रज्ञानाचे विकसन करणे हा आहे. हा चार ते पाच वर्षांचा शिक्षणक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थी संस्थेतील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. देशात किंवा विदेशात अभ्यासविषयक परिषदांतूनही सहभागी होऊ शकतात.  
पीएच.डी. शिक्षणक्रमासाठी पात्रता – एम.एस्सी.किवा जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र समकक्ष पदवी तसेच ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी आवश्यक असणाऱ्या सी.एस.आय.आर., यु.जी.सी., नेट या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.या कार्यक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया वर्षांतून मे व सप्टेंबर अशी दोनदा होत असते. इच्छुकांनी www.cdriindia.org  वर संपर्क साधावा.  
अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेिनग प्रोग्राम हा शिक्षणक्रम जुल २०१३ पासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, विविध खासगी तसेच सरकारी संशोधन प्रयोगशाळा, औषधनिर्मिती उद्योग यातून आधीपासूनच कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यान्वित होत आहे. या कार्यक्रमाचा कालावधी वेगवेगळ्या स्तरातील उमेदवारांसाठी वेगवेगळा आहे. (दोन आठवडय़ांपासून एक वर्षांपर्यंत.) अधिक माहितीसाठी www.cdriindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधा.  
संस्थेतील नोकरीच्या संधी         
सी.डी.आर.आय. मध्ये एम.एस.सी. किंवा रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यांतील समकक्ष पदवीधारक उमेदवारांना प्रोजेक्ट असिस्टंट पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. (www.cdriindia.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा.) सी.डी.आर.आय.मध्ये तरुण, हुशार संशोधकांना नोकरीच्या संधीप्राप्त होतात. समाजासाठी निदानोपयोगी औषधी द्रव्यांची निर्मिती, रोगाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या लसीकरणासाठीच्या औषधी द्रव्यांची निर्मिती, आरोग्यसेवेतील नवनवीन तंत्रज्ञानाचे विकसन, अशा निरनिराळ्या ध्येयांसाठी काम करू इच्छिणाऱ्या वैज्ञानिक शिक्षणाची व संशोधनाची पाश्र्वभूमी असलेल्या भारतीय नागरिकाला संस्थेत संशोधनाची संधी मिळू शकते.
इच्छुकांनी recruit@cdri.res.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.