गेल्या दोन वर्षांपासून भारतामध्ये सुजाण पालकांकडून आपल्या मुलांसाठी घरच्या घरी शिक्षणाचा(होम स्कूलिंग) पर्याय स्वीकारण्याकडे कल वाढत आहे. दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वर्षांला लाखो रुपयांचा खर्च करून पालक आपल्या मुलांना घरीच विषयानुरूप तयार करीत आहेत. आत्ता समग्र शिक्षणात होम स्कूलिंगचे प्रमाण कमी असले, तरी शासकीय आणि खासगी शाळांतील शिक्षणाचा वर्षांनुवर्षे खालावत जाणारा दर्जा पाहता भविष्यात ते वाढतच जाणार आहे. अमेरिका आणि ब्रिटन या दोन राष्ट्रांमध्ये सध्या होमस्कूलिंगवरून प्रचंड चर्चा होत आहेत.  अमेरिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या गोळीबार आणि हिंसाचारांच्या सत्रामुळे गेल्या दोन दशकांत ४ टक्क्य़ांहून अधिक पालक आपल्या मुलांना घरीच शिकविणे पसंत करत आहेत, अगदी जास्त खर्च आला तरीही.  ब्रिटनमध्ये उच्च आर्थिक गटातील एक स्तर आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी त्याचा कल पाहून घरीच शिकवत आहे. याचा परिणाम गेल्या काही महिन्यांत ब्रिटनने होमस्कूलिंगबाबत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. परिणामी वादाचे मोहोळ उठले आणि होमस्कूलिंगचे पुरस्कर्ते पालक विरुद्ध प्रशासन अशी वैचारिक हक्कांची लढाई सुरू झाली आहे. प्रशासन होम स्कूलिंगच्या दर्जाबाबत आक्षेप घेऊन त्याबाबत रीतसर नोंदणी करण्यास सांगत आहे. तर याला पालकांकडून आणि होमस्कूलसाठी स्वतंत्ररीत्या शिकविणाऱ्या शिक्षकांकडून विरोध करण्यात येत आहे. पाल्याला जे काही शिकवायचे आहे, ते घरी शिकविताना सरकारने आम्हाला कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करू नये, अशी पालकांची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी तेथील एका बालकलाकार मुलीला तिचे पालक घरी शिकवत असल्याचा आक्षेप घेऊन सरकारने तिला शाळेत पाठविण्याचा आदेश दिला. त्यावरून तिच्या पालकांनी तुरुंगात जायची तयारी ठेवली. पण आम्ही आमच्या मुलीला घरीच शिकविणार, हा पवित्रा कायम ठेवला. घरामधून एकांगी शिक्षण दिले जाईल या भीतीने ब्रिटन सरकारने होमस्कूलिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. पण गंमत अशी आहे की, साऱ्याच खंडांमध्ये होमस्कूलिंग केलेली मुले शाळेत जाणाऱ्या मुलांहून अधिक तणावरहित आणि सक्षम शिक्षण घेत असल्याचे दाखले मिळत आहेत. मूलभूत ज्ञान कौशल्यांमध्ये ती शाळेत जाणाऱ्या मुलांहून वरचढ ठरत आहेत. त्यामुळेच होमस्कूलिंगची ही लाट वाढत चालली आहे.

संकलन – रसिका मुळ्ये