|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख – शिख धर्मगुरू गुरुनानकजींच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबर, १९६९ रोजी अमृतसरमध्ये गुरुनानक देव विद्यापीठाची स्थापना झाली. नॅकची ‘ए’ ग्रेड मिळवणारे हे विद्यापीठ २०१८ सालच्या राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांसाठीच्या ‘एनआयआरएफ’ मानांकनामध्ये देशात ५९ व्या स्थानी आहे. विद्यापीठ स्थापनेपासूनच गुरुनानकजींचे आयुष्य आणि त्यांच्या शिकवणीविषयीचे संशोधन आणि त्याचा प्रसार करणे, पंजाब राज्यातील शैक्षणिकदृष्टय़ा मागास वर्गासाठी शिक्षणाचा प्रसार करणे, पंजाबी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे या प्रमुख उद्देशांसह सुरू असलेली या संस्थेची वाटचाल गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय अशीच ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा मौलाना अबुल कलाम आझाद चषकावर आत्तापर्यंत तब्बल २२ वेळा या विद्यापीठाने आपले नाव कोरले आहे. सांस्कृतिक स्पर्धामध्येही या विद्यापीठाची कामगिरी उल्लेखनीयच ठरलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवांचे ९ वेळा विजेतेपद, तर उत्तर विभाग आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये १४ वेळा विजेतेपदाचा बहुमान पटकावणारी कामगिरी या विद्यापीठाने नोंदवली आहे. याशिवाय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘कॅटेगिरी-क’ हा दर्जा मिळालेले पंजाब राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

संकुले आणि सुविधा – अमृतसर शहराच्या पश्चिमेकडील भागामध्ये जवळपास पाचशे एकरांच्या परिसरात या विद्यापीठाचे मुख्य संकुल विस्तारले आहे. त्याशिवाय विद्यापीठाची एकूण चार विभागीय संकुले पंजाब राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यापकी सठियाला व फटू धिंगा (सुलतानपूर लोधी) ही संकुले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मानली जातात. जालंधर व गुरुदासपूर येथे असलेली विद्यापीठाची विभागीय संकुलेही त्या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठाच्या विविध सेवा सुविधा पोहोचवत आहेत. या बरोबरीने विद्यापीठाद्वारे नियंत्रित अशी एकूण नऊ महाविद्यालये चालतात. मुख्य संकुल, विभागीय संकुले आणि या महाविद्यालयांच्या माध्यमातून हे विद्यापीठ एकाचवेळी पाच हजारांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’सारखी संस्थाही सुरू केली आहे. या संस्थेमार्फत आयआयटी-जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण पुरविले जाते. विद्यापीठाच्या मुख्य संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन व विद्याíथनींसाठी चार वसतीगृहे आहेत. जालंधर, गुरुदासपूर व सठियाला संकुलामध्येही वसतीगृहांच्या सुविधा उपलब्ध आहेत. जालंधरला केवळ विद्याíथनींसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थी व संशोधकांची ग्रंथालयाची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे भाई गुरुदास ग्रंथालय महत्त्वाचे ठरते. १९७० मध्ये स्थापन झालेले हे ग्रंथालय उलटय़ा त्रिकोणाच्या आकारातील पाच मजली इमारतीमधून चालते. ग्रँड टँक रस्त्यावरून विद्यापीठाकडे पाहिले असता, सहजच नजरेस पडणारी अशी ही ग्रंथालयाची इमारत सर्व शैक्षणिक विभागांसाठी मध्यवर्ती ठिकाणही ठरते. विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी परीक्षेतील आपल्या कामगिरीची माहिती देऊ शकेल, अशी एसएमएस सुविधा विद्यापीठाने विकसित केली आहे. हॉकीसाठीचा अस्ट्रो टर्फ, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, शूटिंग रेंज अशा क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सुविधाही विद्यापीठाने निर्माण केल्या आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम – विद्यापीठांतर्गत एकूण १३ विद्याशाखांतर्गत ३८ शैक्षणिक विभागांचे कामकाज चालते. या विभागांमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अशा प्रकारांमधील अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या आíकटेक्चर विभागामध्ये बॅचलर ऑफ आíकटेक्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या जोडीने विद्यापीठाने अर्बन डिझाइन आणि सस्टेनेबल बिल्ट इन्व्हायर्न्मेंट या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिले आहेत. बॉटनिकल अँड इन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस विभागामध्ये बी. एस्सी. हॉनर्स बॉटनी, एम. टेक. इन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. केमिस्ट्री विभागांतर्गत टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या विषयातील बी. टेक अभ्यासक्रम चालतो. पंजाब स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अंतर्गत इकॉनॉमिक्स विषयातील बी. एस्सी. व एम. एस्सीचे अभ्यासक्रम चालतात. त्या जोडीने बिझनेस इकॉनॉमिक्स विषयातील एम.ए. अभ्यासक्रम, बँकिंग इन्शुरन्स अँड फायनान्स विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा पर्यायही या विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षणशास्त्र विभागांतर्गत एम. ए. एज्युकेशन आणि एम. एड. या अभ्यासक्रमांच्या जोडीने ‘अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन’ विषयातील प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. स्पेशल एज्युकेशन विषयातील पदविका अभ्यासक्रमही या विभागात उपलब्ध आहे. फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागांतर्गत त्याच विषयातील बी. टेक आणि एम. एस्सीच्या अभ्यासक्रमांची सुविधा विद्यार्थ्यांना मिळते. परकीय भाषा विभागामध्ये रशियन, फ्रेंच, जर्मन आणि जॅपनीज या भाषांच्या अध्यापनाचे काम चालते. हिंदी विभागांतर्गत हिंदी पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. इतिहास विभागामध्ये ‘हेरिटेज टुरिझम ऑफ नॉर्थ वेस्ट इंडिया’ या विषयातील, तर मानसशास्त्र विभागामध्ये ‘मेंटल हेल्थ कौन्सेलिंग’ या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठीचे वेगळे पर्याय ठरतात. विद्यापीठाच्या स्पोर्ट्स सायन्स अँड मेडिसिन विभागामध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स न्युट्रिशन, स्पोर्ट्स बायोकेमिस्ट्री, एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स फिजिओलॉजी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स अँथ्रोपोमेट्री या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या मुख्य संकुलाशिवाय इतर विभागीय संकुलांमध्ये व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वाणिज्य, विज्ञान आणि विधी विद्याशाखेमधील विविध पदव्युत्तर तसेच पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.

borateys@gmail.com