जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख – अमेरिकेतील बाल्टिमोर मेरिलँडमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले एकविसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. अमेरिकी उद्योजक, तत्त्ववेत्ता जॉन्स हॉपकिन्स यांनी दान केलेल्या संपत्तीतून १८७६ साली हॉस्पिटल आणि त्याच्याशी संलग्न वैद्यकीय विद्यापीठ स्थापन केले गेले. त्यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ असे नाव देण्यात आले. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ हे अमेरिकेतील पहिले संशोधन विद्यापीठ असल्याचे मानले जाते. गेली १४० वर्षे संशोधन करत असलेले जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आजही वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरावरील संशोधनामध्ये आपला दबदबा कायम राखून आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ‘द ट्रथ विल सेट यू फ्री’ हे आहे. अमेरिकेमध्ये विद्यापीठाचे मेरिलँड आणि वॉशिंग्टन येथे तर इटली, चीन आणि सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय कॅम्पस आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये मिळून विद्यापीठाचे दहा शैक्षणिक व संशोधन विभाग चालवले जातात. सध्याच्या घडीला जॉन्स हॉपकिन्समध्ये सर्व विद्याशाखांमधील मिळून २६० अभ्यासक्रम असून जवळपास पंचवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम- जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. दोन्ही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे मुख्यत्वे संशोधन अभ्यासक्रम आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ जरी वैद्यकीय व जीवशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असले तरी पदवी अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थी कला शाखेतील विषयांनाही प्राधान्य देताना आढळतात. विद्यापीठात एकूण दहा शैक्षणिक-संशोधन विभाग आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज, अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, बिझनेस, एज्युकेशन, इंजिनीअिरग, मेडिसिन, नर्सिग, पीबडी आणि पब्लिक हेल्थ या स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, डिप्लोमा, प्रोफेशनल प्रॅक्टिस, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि िस्प्रग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी सॅट तर पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई/ जीमॅट आणि टोफेल या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजअंतर्गत इंटरनॅशनल फायनान्स, ग्लोबल पॉलिसी, ग्लोबल रिस्क्स, पब्लिक पॉलिसी इत्यादी विषय येतात. स्कूल ऑफ इंजिनीअिरगअंतर्गत सिस्टीम्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, बायोइंजिनीअिरग, केमिकल इंजिनीअिरग, सिव्हिल इंजिनीअिरग, सायबर सिक्युरिटी, जनरल इंजिनीअिरग, इंजिनीअिरग मॅनेजमेंट, डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअिरग हे विषय येतात. जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनअंतर्गत बायोकेमिस्ट्री, सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोलॉजिकल केमिस्ट्री, जेनेटिक्स, बायोमेडिकल इंजिनीअिरग सर्जरी, हेल्थ रिसर्च, न्यूरोलॉजी, न्यूरोसायन्स इत्यादी प्रमुख विषय आहेत.

सुविधा- जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाकडून विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वतीने जेएचयू ग्रँट्स, बाल्टिमोर स्कॉलर्स, क्लार्क स्कॉलरशिप, डेव्हीस युनायटेड वर्ल्ड कॉलेज स्कॉलर्स प्रोग्राम, हडसन गिलियम सक्सेस स्कॉलरशिप, फेडरल पेल ग्रँट्, फेडरल सप्लिमेंटल एज्युकेशनल ऑपॉच्र्युनिटी ग्रँट् इत्यादी आर्थिक मदतनिधीबरोबरच अनेक गुणवत्तेवर आधारित ‘मेरीट बेस्ड स्कॉलरशिप’ व खासगी शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात. निवास व भोजनाच्या सुविधा विद्यापीठाने आपल्या परिसरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या दाव्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे शंभर टक्के विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे विद्यार्थी-प्राध्यापक गुणोत्तर हे ७:१ इतके आहे.

वैशिष्टय़

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये जगभरातील अनेक दिग्गज्जांचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व्रूडो विल्सन या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. गेल्या चाळीस वर्षांमध्ये विद्यापीठाने २७ नोबेल पारितोषिक विजेते तयार केले आहेत. सध्या विद्यापीठातील तीन कार्यरत प्राध्यापक नोबेल पुरस्कार विजेते आहेत.

मी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून २०१७ साली न्यूरोसायन्स या विषयातून पदवीधर झालो. विद्यापीठाचा परिसर व आरेखन अतिशय सुंदर आहे. विद्यापीठातील जैव विज्ञान शाखेच्या जवळपास सर्वच विषयांतील अभ्यासक्रमाची तयारी अत्यंत काटेकोरपणे करून घेतली जाते. जैवविज्ञानातील बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा संशोधन क्षेत्राकडे आहे. जीवशास्त्रातील संशोधन प्रक्रिया ही एकंदरीत किचकट व वेळखाऊ असते, तरीही विद्यापीठातील विद्यार्थी संशोधन प्रक्रियेबाबत उत्साही आहेत. याचे कारण विद्यापीठातील संशोधनास अनुकूल असणारे वातावरणच आहे.

– अक्षय अल्घाट्टा, बी.एस्सी. न्यूरोसायन्स, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ

संकेतस्थळ  https://www.jhu.edu/