News Flash

शिक्षणाचा जपानी मंत्र क्योटो विद्यापीठ,जपान

क्योटो विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पस्तीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे

संग्रहित छायाचित्र

विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख – जपानमधील सात राष्ट्रीय विद्यापीठांपकी एक असलेले क्योटो विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पस्तीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जपानमधील कानसाई भागात असलेल्या क्योटो शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८९७ साली करण्यात आली. क्योटो विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. क्योटो शहरामधील योशिदा हा क्योटो विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. विद्यापीठाचे इतर दोन कॅम्पस क्योटोजवळ असलेल्या कस्तुरा आणी उजी या दोन ठिकाणी आहेत. क्योटो विद्यापीठामध्ये सध्या जवळपास तीन हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून बावीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या सर्व कॅम्पसमध्ये एकूण दहा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, अठरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न तेरा संशोधन संस्था, तेवीस शैक्षणिक केंद्र आणि अभ्यास-संशोधनासाठी असलेल्या इतर काही संस्था एकमेकांच्या सहकार्याने नांदत आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. कॅम्पसमधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम दहा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात. २०१८च्या सांख्यिकीनुसार जवळपास ११० देशांमधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या विद्यापीठामध्ये आपल्या शिक्षणासाठी आले होते.

अभ्यासक्रम – क्योटो विद्यापीठातील ठरावीक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजी भाषेमध्ये शिकवले जातात. बहुतांश अभ्यासक्रम हे जपानीमध्ये चालतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी फक्त इंग्रजी भाषेमध्येच नव्हे तर जपानी भाषेमधील अभ्यासक्रमांनाही ते प्रवेश घेऊ शकतात, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे जपानी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे पूर्णवेळ आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहेत. क्योटो विद्यापीठामध्ये एकूण दहा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत.

विद्यापीठातील लेटर्स, एज्युकेशन, लॉ, इकॉनॉमिक्स, सायन्सेस, मेडिसिन, फार्मास्युटिकल सायन्सेस, इंजिनीअिरग आणि अ‍ॅग्रिकल्चर या दहा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या विभागांशिवाय विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ूट फॉर केमिकल रिसर्च, इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ह्य़ुमॅनिटीज, इन्स्टिटय़ूट फॉर फ्रंटियर लाइफ अ‍ॅण्ड मेडिकल सायन्सेस, इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड एनर्जी, रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर सस्टेनेबल ह्य़ुमॅनोस्फियर, डिझास्टर प्रिव्हेन्शन रिसर्च इन्स्टिटय़ूट, युकावा इन्स्टिटय़ूट फॉर थिओरीटिकल फिजिक्स, इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च, रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर मॅथेमॅटिकल सायन्सेस, इन्स्टिटय़ूट फॉर इंटिग्रेटेड रेडिएशन अ‍ॅण्ड न्यूक्लिअर सायन्स, प्रायमेट रिसर्च इन्स्टिटय़ूट, सेंटर फॉर साऊथ-ईस्ट एशियन स्टडीज, सेंटर फॉर सेल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन’ या तेरा स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या नामांकित संशोधन संस्था आहेत.

सुविधा – क्योटो विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच वसतिगृहांची सोय केलेली आहे. विद्यापीठाचे यासाठी हाऊसिंग ऑफिस हे स्वतंत्रपणे कार्यरत असून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी जपानमध्ये सुरक्षित वावरत यावे यासाठी ते कटिबद्ध आहे. क्योटो विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपात अधिकाधिक आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. क्योटो विद्यापीठाकडून ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम’ राबवले जातात व जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली ‘मेक्स्ट स्कॉलरशिप’ ही शिष्यवृत्ती आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा शिकण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिकवणी वर्ग, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हेल्थ सव्‍‌र्हिस सेंटर व विद्यापीठाचे रुग्णालय, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा आणि वर्क परमिट यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या आवारात एकूण शंभर सांस्कृतिक तर ८८ क्रीडा क्लब्ज आहेत.

वैशिष्टय़

क्योटो विद्यापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे म्हणूनच आतापर्यंत आशिया खंडामध्ये सर्वाधिक नोबेल पुरस्कार या विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांना मिळालेले आहेत. देशातील पंचवीस नोबेलविजेते फक्त या विद्यापीठातील आहेत. विद्यापीठाच्या दाव्यानुसार येथे दृश्य कलेपासून ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत सर्व विषयांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत जवळपास पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी ग्रहण केली आहे. २०१७ या एका वर्षांत या विद्यापीठातून ३६१ नवीन शोध लावले गेले तर एकूण २६० पेटंट मिळवले.

itsprathamesh@gmail.com

संकेतस्थळ – https://www.kyoto-u.ac.jp/en/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:37 am

Web Title: kyoto university world university rank japan
Next Stories
1 प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल चालू घडामोडी व संभाव्य प्रश्न
2 एमपीएससी मंत्र : वनसेवा परीक्षा मुख्य परीक्षा पेपर दोन विश्लेषण
3 शब्दबोध : मेहनत
Just Now!
X