23 April 2019

News Flash

शिका आणि संशोधन करा

भारत सरकारने विज्ञान विषयातील उच्च श्रेणीच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आयसर या संस्थेची स्थापना केली आहे.

भारत सरकारने विज्ञान विषयातील उच्च श्रेणीच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आयसर या संस्थेची स्थापना केली आहे. आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च. या संस्थेचे पुणे, बेहरामपूर, कोलकता, मोहाली, थिरुवनंतपूरम, तिरुपती आणि भोपाळ येथे कॅम्पस आहेत. हा अभ्यासक्रम पूर्णपणे निवासी स्वरूपाचा आहे. त्यामुळे प्रवेश मिळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला संस्थेच्या वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे. या संस्थेत संशोधनकार्यासाठी वाहून घेतलेल्या अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विज्ञान विषयाच्या विविध शाखांचा एकात्मिक अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. त्याला अत्याधुनिक संशोधन कार्याची जोड दिली जाते. क्रीडा व इतर सांस्कृतिक कौशल्यवाढीच्या सोईही उपलब्ध करून दिल्या जातात.

अभ्यासक्रम

या संस्थेने बी.एस- एम.एस (बॅचलर इन सायन्स- मास्टर इन सायन्स) हा डय़ुअल डिग्री इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये आंतरशाखीय (मल्टिडिसिप्लिनरी) संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत सर्व विद्यार्थ्यांना समान विषय शिकावे लागतात. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी मात्र स्पेशलायझेशनचा विषय अभ्यासावा लागतो. पाचव्या वर्षी संशोधन अहवाल तयार करावा लागतो.

अशी असते परीक्षा

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयसर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट ही चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. या परीक्षेच्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातात. या चारही विषयांच्या प्रत्येकी १५ अशा ६० प्रश्नांचा समावेश असतो. परीक्षेचा कालावधी तीन तास. प्रत्येक अचूक उत्तराला ३ गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये असतो. ज्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणित वा जीवशास्त्र या विषयांचा अभ्यास केला नसेल त्यांना या विषयांचा पेपर देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना ११ व १२ वीचा संबंधित विषयाचा अभ्यास करावा लागेल.

या परीक्षेचा अभ्यासक्रम हा १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार करता येतो. तथापी ११ वी आणि १२ वीच्या एनसीईआरटीची (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) पुस्तके अभ्यासणे उपयुक्त ठरू शकते. ही पुस्तके एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. घरी वाचून जर एखादा धडा समजणे कठीण जात असेल तर संबंधित विषयांच्या अध्यापकांकडून समाजावून घेणे उचित ठरेल. चाळणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि उपलब्ध जागा यावर विद्यार्थ्यांचा संबंधित विषय वा कॅम्पससाठी निवड होते. त्यामुळे हव्या असलेल्या शाखेला/अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

अभ्यासक्रम आणि कॅम्पस

(१) भोपाळ कॅम्पस येथील बी.एस-एम.एस डय़ुइन डिग्री इन इंजिनीअरिंग सायन्स या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणित या विषयाचा अभ्यास केलेला असावा. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून भोपाळ कॅम्पसमध्ये बी.एस इन इकॉनॉमिक सायन्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. इतर विषयांसोबतच १२ वी मध्ये गणित या विषयाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी मूलभूत विज्ञान शिकवले जाते. तसेच अर्थशास्त्राची तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतरची तीन वर्षे ही आर्थिक शास्त्र शिकावे लागते. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जर विद्यार्थ्यांनी आणखी एक र्वष संशोधन कार्यासाठी व संशोधन अहवाल तयार करण्यासाठी व्यतीत केले तर त्यांना बी.एस-एम.एस ही पदवी दिली जाते. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (अ‍ॅडव्हान्स्ड) मध्ये पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचा क्रमांक लागेल, तेच विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

  • या संस्थेत बी.एस-एम.एस हा अभ्यासक्रम बायोलॉजिकल सायन्स, केमिकल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री, अर्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरॉन्मेंटल सायन्सेस, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि फिजिक्स या विषयांमध्ये करता येतो. संपर्क – iiserb.ac.in
  • आयसर कोलकता अभ्यासक्रम- बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, जिऑलॉजिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स.
  • संपर्क – http://www.iiserkol.ac.in
  • आयसर मोहाली अभ्यासक्रम- बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स आणि फिजिकल सायन्स. संपर्क  http://www.iisermohali.ac.in/
  • आयसर थिरुवनंतपूरम अभ्यासक्रम – बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स.संपर्क – http://www.iisertvm.ac.in
  • आयसर तिरुपती अभ्यासक्रम – बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स. संपर्क –  http://www.iisertirupati.ac.in
  • आयसर पुणे अभ्यासक्रम – बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स, फिजिकल सायन्स आणि अर्थ सायन्स. संपर्क –  http://www.iiserpune.ac.in

इतर प्रवेश पद्धती

या संस्थेच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये तेराशे जागा आहेत. (बेहरामपूर- १०० जागा, भोपाळ – २५० जागा/ बेसिक सायन्सेस- २०० आणि इंजिनीअरिंग सायन्सेस- ५०, कोलकता- २०० जागा, मोहाली- २०० जागा, पुणे- २०० जागा, थिरुवनंतपूरम- २०० जागा, तिरुपती- १५० जागा,) त्यापैकी निम्म्या म्हणजे ६५० जागा या आयसर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे भरल्या जातात. जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (अ‍ॅडव्हान्स्ड) मध्ये मिळालेले गुण आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमध्ये शिष्यवृत्तीमधील गुणांवर आधारित एक स्वतंत्र गुणवत्ता यादी उर्वरित जागांसाठी तयार केली जाते. त्यानुसार थेट प्रवेश दिला जातो. जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (अ‍ॅडव्हान्स्ड) परीक्षेत संबंधित विद्यार्थी पहिल्या दहा हजारांमध्ये येणे आवश्यक आहे. तसेच या विद्यार्थ्यांला १२ वी विज्ञान परीक्षेत ६० टक्के गुण मिळायला हवेत. या तिन्ही पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी होऊ  शकतात. मात्र त्यासाठी त्यांनी स्वतंत्ररीत्या अर्ज भरावा लागेल. प्रत्येक प्रक्रियेचे शुल्कही वेगळे वेगळे भरावे लागतील. एखाद्या विद्यार्थ्यांची सातपैकी कोणत्याही आयसरमधील अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यास त्याला जागा स्वीकृती शुल्क- सिट अ‍ॅक्सप्टेन्स फी भरून त्याची जागा आरक्षित करावी लागेल. खुल्या संवर्गासाठी हे शुल्क २५ हजार रुपये आणि राखीव संवर्गासाठी हे शुल्क १२ हजार ५०० रुपये आहे.

प्रवेश प्रकिया जॉइंट अ‍ॅडमिशन कमिटीद्वारे केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच ऑनलाइन अर्ज भरावा लागतो.

या चाळणी परीक्षेद्वारे निवडलेल्या काही विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या संस्थेत १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, नॉन क्रीमीलेअर इतर मागास वर्ग २७ टक्के, दिव्यांग संवर्ग ३ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.

या संस्थेची प्रवेश प्रक्रिया मे महिन्यात सुरू होणार आहे. आयसर अ‍ॅडमिशन अ‍ॅप्टिटय़ूड चाळणी परीक्षेचे एक केंद्र पुणे हे आहे. या परीक्षेचा निकाल त्वरित म्हणजे दुसऱ्याच दिवशी लावला जातो.

  • संपर्क – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – ४११००८, दूरध्वनी – (०२०) २५९०८००० फॅक्स २०२५१५६६.

 

First Published on April 14, 2018 12:10 am

Web Title: learn and do research