|| डॉ. श्रीराम गीत

  • माझा पुतण्या सुमुख आत्ता बारावी झाला आहे. त्याचे वेगळे स्वप्न आहे. त्याला गोपालनाचा व्यवसाय करायचा आहे. एक-दोन गाई घेऊन नंतर तो वाढवायचा आहे. तो त्याने कशा प्रकारे करावा? यासाठी कोकणामध्ये अल्पमुदतीचे काही अभ्यासक्रम आहेत का? – दि. बा. प्रभुदेसाई, कुर्ला

गोपालनाचा व्यवसाय अभ्यासक्रम करून करावा, या आपल्या अपेक्षेशी मी सहमत नाही. कारण जोवर व्यवसायातील खाचखळगे प्रत्यक्ष अनुभवून, पाहून शिकले जात नाहीत, तोवर त्याचे स्वरूप पुस्तकीच राहते. मोठय़ा गोशालेत, दुग्ध व्यावसायिकाकडे उमेदवारी करणे त्याला सहज शक्य आहे. अन्यथा एखादी गाय विकत घेऊन ती भाकड झाल्यावर व्यवसाय बंद पडण्याची शक्यताच जास्त. कृषी विद्यापीठातील डेअरी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बऱ्याचदा नोकरीकडे वळतात, हेही लक्षात घ्यावेत.

  • मी कॉमर्सच्या पहिल्या वर्षांला आहे. सी.ए. करावे की एम.पी.एस.सी. यामध्ये गोंधळलो आहे. परिस्थिती जेमतेम आहे. दोन्हीपैकी काय परवडेल? काय सुचवाल? – गणेश गोरे

गणेश, सी.ए. परवडेल की एम.पी.एस.सी. या प्रश्नावर मी अक्षरश: अडकलो. सध्याची परिस्थिती पाहता दोन्हीसाठीच्या खासगी शिकवणी वर्गाचे शुल्कच सहज लाखभर रुपयांच्या आसपास पोहोचते. ते न लावता दोन्हीपैकी काही तरी एक मिळवलेला फार क्वचित सापडतो हे नीट लक्षात घ्यावेस. कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षांत टॅक्स सल्लागाराकडे उमेदवारी करायला सुरुवात केली तर बी.कॉम.नंतर डीटीएल व सवडीने लॉ करून तुलाही टॅक्स सल्लागार बनणे नक्की शक्य आहे ना? हा शंभर टक्के यशाचा रस्ता आहे. शिवाय उमेदवारीदरम्यान थोडाफार पॉकेट मनी मिळू शकेल तो वेगळाच. स्पर्धा परीक्षा पदवीनंतर सुरू होतात. पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना पदवीधर झाल्यावरही नोकरी न करता त्यामागे जाणे हे योग्य की अयोग्य हे तुलाच ठरवायचे आहे.

  • मी बी.ई. डिस्टिंक्शन घेऊन पूर्ण केले आहे. नंतर एक वर्ष गॅप घेऊन एमबीए प्रवेश परीक्षा दिली. त्यात ८० परसेंटाइल मिळाले आहेत. आता मी बँकेच्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांचा विचार करीत आहे. एमबीए करावे का? मी गोंधळले आहे. – पल्लवी जोशी

एमबीए प्रवेश परीक्षेद्वारे उत्तम कॉलेज मिळवणे व बँकेच्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षांद्वारे नोकरी मिळवणे यामध्ये फारसा फरक नसतो. एमबीएसाठीचे उत्तम कॉलेज यंदा एक लाखातून जेमतेम दोन हजारांना मिळाले आहे. तसेच वीस लाखांतून बँकांसाठी निवडले जाण्याचे प्रमाण आहे. दोन्ही परीक्षांतील व्हर्बल, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन, न्यूमरिकल्स यात फार तफावत नाही. मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या परीक्षातून ‘सरकारी’ नोकरी हा आकर्षक शब्द सुरू होतो.  बी.ई. तेही डिस्टिंक्शन घेऊन उत्तीर्ण झालेल्या पल्लवीने अशा नोकरीत कितपत समाधान मिळेल याचा विचार प्रथम करावा. खरे तर एखादी तांत्रिक नोकरी मिळवून एमबीएचे परसेंटाइल वाढवून नव्वदीपार नेणे शक्य आहे ना?