मागील लेखात आपण महाराष्ट्र वन सेवा परीक्षेचे टप्पे, पूर्वपरीक्षेचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता यांची माहिती घेतली. आज आपण वन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करूयातवन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करूयात आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे आखता येईल ते पाहू या..

मुख्य परीक्षेचे स्वरूप
1

* मुख्य परीक्षा – ४०० गुण

* प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन.

१. सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज).

२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन.

आयोगाने वन सेवा मुख्य परीक्षेतील पेपर २ ची विभागणी सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन या दोन घटकांत केलेली आहे.

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक १ :

सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज)

१. भारताचा इतिहास. महाराष्ट्रावर अधिक भर.

२. देशाचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. महाराष्ट्रावर अधिक भर.

३. भारतीय राज्यसंस्था व शासन. घटना आणि राजकीय प्रणाली, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था.

४. आर्थिक आणि सामाजिक विकास.

पेपर क्रमांक २ :

मुख्य परीक्षा पेपर क्र. २ चे माध्यम  केवळ इंग्रजी असते, याची नोंद परीक्षार्थीनी घ्यावी. या विषयात सामान्य विज्ञान  (जनरल सायन्स) आणि निसर्ग संवर्धन  (नेचर कॉन्झर्वेशन) या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१. सामान्य विज्ञान (जनरल सायन्स)- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र.

२. निसर्ग संवर्धन (नेचर कॉन्झर्वेशन)-

२.१ * मृदा – मृदेचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैवशास्त्रीय गुणधर्म. प्रक्रिया आणि माती निर्मितीचे घटक. खनिज आणि मातीचे सेंद्रिय घटक, मृदेच्या उत्पादकतेत त्यांची भूमिका, मातीचा प्रकार, मातीसंबंधित समस्या आणि त्यात सुधारणा.

* माती आणि ओलावा टिकणे- जमिनीची धूप होण्याची कारणे, नियंत्रणाची पद्धत. वनाची भूमिका, पाणलोट व्यवस्थापन वैशिष्टय़े आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी उचलावी लागणारी पावले.

२.२ * पर्यावरणीय व्यवस्था – प्रकार, अन्नसाखळी, अन्न जाळे, पर्यावरणीय पिरॅमिड, ऊर्जेचा प्रवाह, कार्बन आणि नायट्रोजनचे जैवरासायनिक चक्र.

* खते – सेंद्रिय आणि रासायनिक.

* वनस्पती आणि प्राण्यांचे आजार.

* कीटकनाशके.

* इजा होऊ शकतील अशा वनस्पती आणि तण.

२.३* पर्यावरणीय प्रदूषण – प्रकार, नियंत्रण, जैव निर्देशक आणि धोक्यात आलेल्या प्रजाती.

* उत्खनन आणि खाणकामासंबंधित पर्यावरणीय समस्या.

* ग्रीनहाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेिडग, पर्यावरणीय बदल.

२.४ * देशातील महत्त्वाची जंगली श्वापदे.

* गुरांच्या जाती, चारा आणि गवताळ प्रदेश व्यवस्थापन, कुरणांचे अर्थशास्त्र.

२.५*  देशातील महत्त्वाच्या स्थानिक वृक्षांच्या जाती, विदेशी वनस्पती, वनस्पती- उत्पादनाचा स्रोत. उदा. अन्न, फायबर, जळाऊ लाकूड, इमारतीसाठीचे लाकूड इत्यादी. वनउत्पादन, औषधी वनस्पती, ऊर्जा लागवड, खारफुटी, वनआधारित उद्योग.

* वनस्पतीच्या वाढीवर आणि वितरणावर परिणाम करणारे घटक. भारतातील वनांचे प्रकार.

२.६*  राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये. जागतिक वारसा वास्तू.

* सामाजिक वनीकरण, वन व्यवस्थापन, शेती वनीकरण.

* भारतीय वन धोरण, भारतीय वन कायदा, वन्य जीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा, १९८०.

* निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था.

२.७ * हवाई छायाचित्रे, संकल्पनात्मक नकाशे, उपग्रह चित्रे यांचा वापर. ‘जीआयएस’चे तत्त्व आणि उपयोजन.

* जैवविविधता, जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे, जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व.

* वनस्पती प्रजनन, ऊती, आदिवासी आणि वन, देशातील महत्त्वाच्या जमाती.

वरील विश्लेषणावरून असे दिसते की, पेपर क्र. १ मधील इतिहास या घटकात समाजसुधारकांचे कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारकांची विधाने, ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे व तरतुदी. भूगोल या घटकात प्रामुख्याने महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या उपघटकांवर भर देण्यात आला आहे. तसेच जगाचा भूगोल, भूगोलातील मूलभूत संकल्पना, पर्वत, पठारे, मृदा, प्राकृतिक विभाग यांचाही अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. राज्यशास्त्र या घटकात भारताच्या संविधानातील कलमे, तरतुदी, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, तज्ज्ञांची मते, जोडय़ा लावणे, कालखंडांचा चढता-उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटकात अर्थशास्त्रातील मूलभूत संज्ञा व संकल्पना, शासकीय धोरणे, योजना, िलग गुणोत्तर, कृषी, उद्योग व सेवा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

पेपर- २ चे विश्लेषण करायचे झाल्यास विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, परीक्षार्थीनी पर्यावरणीय संकल्पना, शासन निर्णय, धोरणे, कायदे, जैवविविधता, वन्यपशू- वनस्पती प्रजाती, त्यांना होणारे रोग, पर्यावरणीय समस्या, वन धोरण यांच्या अभ्यासावर भर द्यावा.

संदर्भसूची 

* पेपर १- इतिहास- राज्य परीक्षा मंडळाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर व बेल्हेकर, महाराष्ट्राचा इतिहास- कठारे, गाठाळ, भूगोल- राज्य परीक्षा मंडळाची सहावी ते बारावीची पुस्तके, जिओग्राफी थ्रू मॅप- के. सिद्धार्थ,  महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, खतीब. राज्यशास्त्र- इडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची अकरावी-बारावीची पुस्तके. अर्थशास्त्र – इंडियन इकोनॉमी-  रमेश सिंग, भारताचा व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल.

* पेपर २-

१. सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) : एनसीईआरटीची  आठवी ते दहावीची पुस्तके.  राज्य परीक्षा मंडळाची आठवी ते दहावीची पुस्तके. समग्र सामान्य विज्ञान- नवनाथ जाधव  (के. सागर प्रकाशन)

२. निसर्ग संवर्धन : ल्युकेन्स जनरल स्टडी (इकोलॉजी अ‍ॅण्ड पर्यावरण), सवदी, शंकर आयएएस (एन्व्हायरॉन्मेन्ट), ई. बरुचा, आयसीएसई (नववी आणि दहावीचे पर्यावरण विषयाचे पुस्तक.), फोरेस्ट्री- अँटोनी राज अ‍ॅण्ड लाल, इंडियन फॉरेस्ट्री- मणिकंदन अ‍ॅण्ड प्रभू, प्रिन्सिपल्स ऑफ अ‍ॅग्रोनॉमी- रेड्डी, कृषीविषयक- के. सागर, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा- के. सागर.

2