उत्तम जीवनशैलीचे जीवन जगण्यासाठी आपण तऱ्हेतऱ्हेच्या व्यवसायांवर, उत्पादनांवर अवलंबून असतो खरे, पण प्रत्यक्षात दैनंदिन जीवन जगताना आपल्याला त्या व्यवसायांचे मोल क्वचितच जाणवते. त्या उत्पादनाच्या प्रक्रियेचे टप्पे, त्यातील सातत्यपूर्ण सुधारणा आपण लक्षात घेतोच असे नाही, हा मुद्दा उपस्थित करत बिनीचे व्यावसायिक आणि लेखक सुब्रोतो बागची यांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यवस्थापन आणि व्यवसायजगताची पुरेशी माहिती दिली तर त्यांचे या संदर्भातील कुतूहल जागे होईल, हा मुद्दा अधोरेखित केला आहे. या संबंधात त्यांचे ‘एमबीए @ वय वर्ष सिक्स्टिन’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. यात उद्योगविश्व, प्रसिद्ध उद्योजक आणि व्यवसायाच्या विविध संज्ञा आणि संकल्पनांची या पुस्तकात मुलांना रुचेल अशा भाषेत ओळख करून देण्यात आली आहे.
पदवीनंतर व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे उद्योगजगताबद्दल त्रोटक ज्ञान, मूळ संकल्पनांविषयी अनभिज्ञता अनुभवल्यानंतर शाळेतल्या वरच्या इयत्तांमधील मुलांना उद्योगजगत आणि व्यवस्थापनाविषयीच्या मूलगामी संकल्पना सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. बोजड भाषा टाळून गोष्टीरूपाने, मुलांना रुचेल अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात
झालेला दिसतो.
हे पुस्तक लिहिण्यापूर्वी लेखकाने षोडशवर्षीय युवकांचा व्यावसायिक जगाविषयीचा दृष्टिकोन, त्यांच्या या संबंधीच्या शंका, व्यवसाय जगताविषयी त्यांना आकर्षण वाटते का, हे लेखकाने जाणून घेतले. मुलांशी सतत संवाद, केस स्टडी, टिपणं, बिझनेस फिल्म्स, प्रेझेन्टेशन्स अशा विविध मंथनातून हे पुस्तक एकजिनसी झाले आहे. मुलांची व्यावसायिक जगाची तोंडओळख होण्याच्या दृष्टीने तसेच  विलक्षण व्यावसायिक जगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण किती विविध प्रकारच्या व्यवसायांचा उपयोग करतो, याची ओळख पहिल्या प्रकरणात करून दिली आहे. यात अनेक व्यवसायांच्या एकत्रित साखळीतून आपले घर साकार होते, ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
प्रत्यक्ष व्यवसाय कसा चालतो व उद्योजकांविषयी माहिती देणारी फिल्ड ट्रीप विद्यार्थ्यांना कशी उपयुक्त ठरते, हे उदाहरणांतून लेखकाने साध्या, सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. उद्योजकांमध्ये विशेष कोणता गुण असतो, सर्वसामान्य लोकांपेक्षा ते वेगळे का ठरतात, हे जाणून घेण्यासाठी हे भिंतीबाहेरचं शिक्षण मुलांना नक्कीच लाभदायक ठरते, हे यानिमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चिकमंगळूरच्या कॉफीच्या मळ्याला भेट देऊन कॉफीच्या लागवडीपासून कॉफी बियांची पावडर करण्यापर्यंतच्या प्रक्रिया बघताना नकळत मुलांना कॉफी उत्पादनाचा इतिहास, उत्पादन व विक्री प्रक्रिया, या व्यवसायातील अडचणी समजतात. हे उदाहरण देत शैक्षणिक सहल महत्त्वाची का असते, हे खेळीमेळीने या प्रकरणात सांगितले गेले आहे.
मोठमोठय़ा उद्योजकांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या बालपणाविषयी, जडणघडणीविषयी माहिती मुलांना प्रेरणा देते, हे लक्षात घेत आणखी एका प्रकरणात लेखकाने स्टीव्ह जॉब्ज आणि बिल गेटस्ची जीवनकहाणी सांगितली आहे.
गरिबी दूर करण्यासाठी सहकारी चळवळीचे महत्त्व, छोटय़ा कर्जाची उपलब्धता या संकल्पना या पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत. यात वेंकटस्वामींच्या अरविंद आय हॉस्पिटलया समाजोपयोगी उपक्रमाचीही सविस्तर माहिती आहे, त्याचबरोबर सौरऊर्जेवर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात संशोधन करणाऱ्या हरीश हांडे यांनी ग्रामीण जनतेच्या गरजा व समस्या कशा दूर केल्या, याचे आगळे उदाहरणही सांगितले आहे. त्यांनी खेडय़ातील लोकांना नेमके काय हवे, हे जाणून घेण्यासाठी श्रीलंकेतील एका खेडय़ात मुक्काम ठोकला. गावावर आणि गावक ऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सौरऊर्जेचा वापर कसा केला, सूर्यास्तानंतर भाजी विकणे दुरापास्त झालेल्या भाजीवाल्यांसाठी हरीशच्या संशोधकांना सोलर बॅटरी चार्जिग सोल्युशन कसे वापरले, हे नमूद केले आहे. त्यांच्या सेल्को कंपनीची अ‍ॅप्लिकेशन टीम प्रत्येकाच्या विशिष्ट गरजा ध्यानात घेऊन कसे काम करते, हे स्पष्ट करणारे प्रकरण स्वारस्यपूर्ण आहे. व्यवसाय आणि सामाजिक बांधीलकी स्पष्ट करणारे हे प्रकरण विद्यार्थ्यांच्या मनात नकळत अनेक मूल्ये रुजवते.
‘उद्योजकतेमधील गुणधर्म’ या विषयावर जर विद्यार्थ्यांनी अहवाल तयार केला आणि त्याचे सादरीकरण केले, तर या प्रक्रियेत विद्यार्थी किती गोष्टी शिकतात, उद्योजकतेविषयीच्या अनेक संकल्पना त्यांना मुळापासून कशा उमजतात, एखाद्या व्यावसायिकाचा संघर्ष ते यश या प्रवासाचा अभ्यास कसा प्रेरणादायी ठरतो, हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.
पुस्तकातील एका प्रकरणात रूपक कथेतून व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणारे एंजल इन्व्हेस्टर, कॉर्पस् फंडची गुंतवणूक, व्हेन्चर कॅपिटल फंड अशा संकल्पना सोप्या प्रकारे समजावून सांगितल्या आहेत.
आणखी एका प्रकरणात वडिलांनी आपल्या मुलाला उत्पादन विभागाचे काम कसे चालते, त्या प्रक्रियेतील नियोजन, विविध विभागांचा ताळमेळ, परस्परपूरक कार्यपद्धती, आऊटसोर्सिग, संगणक आणि कॉम्प्युटर पद्धतीमुळे वेगवान झालेली उत्पादनप्रक्रिया अशा विविध गोष्टी कशा समजावून सांगितल्या, याचे वर्णन आहे. घरातील स्त्रीला कुटुंबाच्या आवडीनिवडी, गरजा कशा बरोबर ठाऊक असतात, तेच काम व्यवसायात इन्व्हेन्टरी कंट्रोलर कसा करतो, हेही त्यात विशद करण्यात आले आहे. उत्पादनाची विक्री, विपणन प्रक्रिया, दर्जा नियंत्रण, माहिती व्यवस्था, व्यवस्थापन याचे काम कसे चालते,  त्यासाठी कुठल्या नव्या पद्धतींचा उपयोग केला जातो, हेही यात सांगण्यात आले आहे. उद्योगात मनी, मशिनरी आणि मटेरिअलपेक्षाही माणूस कसा महत्त्वाचा असतो, हे मनावर बिंबवणारे एक प्रकरण पुस्तकात आहे. त्याचबरोबर कोअर कॉम्पिटन्स, व्हर्टिकल ते हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन, जस्ट इन टाइम, पुरवठा साखळी या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.  मार्केटिंगमधील सेगमेन्टेशन, पोझिशनिंग, ब्रँडिंग- गुणधर्म आणि प्रतिमा हे सारे मुद्देही स्पष्ट केले आहेत.
टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट ही संकल्पना समजावून देताना उत्कृष्ट दर्जाच्या सेवा आणि प्रमाण यांच्यातील नाते, त्यासाठी करावी लागणारी उत्कृष्ट कामगिरी याचे महत्त्व सांगितले आहे. कामगिरीचे मोजमाप करताना नियोजन, अंमलबजावणी, तपासणी आणि कृती या टप्प्यांची माहिती दिली आहे. वेळापत्रक, उद्दिष्ट, सातत्याने सुधारणा, उत्कृष्ट दर्जा, अपव्यय टाळण्याकडे कल या कल्पना स्पष्ट केल्या आहेत. या प्रकरणात दर्जासंबंधीची सात तत्त्वे मांडण्यात आली आहेत. यात उत्पादनाचा दर्जा सर्वात महत्त्वाचा, ग्राहकांना आकर्षून घेणे आणि बांधून ठेवणे, उत्पादनापेक्षा उत्पादनप्रक्रिया महत्त्वाची, सातत्यपूर्ण सुधारणा, वस्तुस्थितीवर आधारित व्यवस्थापन, प्रत्येकाचा सहभाग, मानवजातीविषयी सन्मानाची भावना राखणे, प्रत्येकाला आदराने वागवणे ही तत्त्वे स्पष्ट केली आहेत. कुठल्याही उद्योगाच्या यशासाठी अभिनव कल्पना, नवे शोध आणि नवनिर्मिती कशी उपयुक्त ठरते, हेही सांगितले आहे.
बोजड भाषा टाळून गोष्टीरूपाने, मुलांना रुचेल अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात झालेला दिसतो. व्यवसायजगताबद्दलचे त्यांचे कुतूहल जागे व्हावे, चर्चा करून त्यांनी अधिक माहिती मिळवावी आणि स्वत: विचार करायला लागावे हा पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू बऱ्याचअंशी साध्य झालेला दिसून येतो. पुस्तकाच्या शेवटी एमबीए करावे की नाही, करायचे तर केव्हा या प्रश्नाच्या कात्रीत सापडलेल्यांसाठी लेखकाने चार अनुभवाचे शब्द सांगितले आहेत. व्यवस्थापन आणि व्यवसायाचे बाळकडू मिळण्यासाठी हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरेल. सिद्ध
एमबीए अ‍ॅट वय वर्ष सिक्स्टिन – सुब्रोतो बागची, रोहन प्रकाशन, अनुवाद – उल्का राऊत, पृष्ठे – १५४, मूल्य – १२५