एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील पेपर एक संयुक्त पेपर व पेपर दोन पदनिहाय पेपर हा पॅटर्न मागील वर्षीपासून लागू झाला आहे. लिपिक टंकलेखक पदासाठीचा पेपर दोन या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पेपरचे विश्लेषण केल्यास या वर्षीच्या तयारीसाठी दिशादर्शक ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या टेबलमध्ये देण्यात आली आहे.

यापकी बुद्धिमापनविषयक प्रश्नांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या आणि पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

गणित

  • संख्यांचे प्रकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णाकांवरील क्रिया, लसावि, मसावि, समीकरणे, बहुपदी, आलेख, शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता,       क्षेत्रफळ, परिमिती यांवर आधारित प्रश्नांचा यामध्ये समावेश होतो.
  • मूलभूत अंकगणितावरील प्रश्न सोडविण्यासाठी सरावच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दहावीपर्यंतची गणिताची तसेच के सागर प्रकाशनाची अंकगणितावरील पुस्तकेही तयारीसाठी उपयुक्त आहेत.
  • पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
  • शेकडेवारी, व्याज, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण हे घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
  • नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.

सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र)

  •    इतिहास घटकामध्ये भारताच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. मध्ययुगीन व आधुनिक काल खंड यावरील प्रश्न यामध्ये समाविष्ट आहेत.
  •    पाचपकी केवळ एक प्रश्न हा तथ्यात्मक व थेट आहे. बाकीचे चार प्रश्न सोडविण्यासाठी नेमकी माहिती असणे आवश्यक असल्याचे लक्षात येते. त्यामुळे या पाच गुणांसाठीसुद्धा अभ्यास करताना पाठांतराचा शॉर्टकट उपयोगाचा नाही.
  •    ‘एनसीईआरटी व राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पुस्तके’ आणि ‘सतीश चंद्रा’ यांचे ‘मध्ययुगीन भारत’ व ‘बिपिन चंद्रा’ यांचे ‘आधुनिक भारत’ ही पुस्तके अभ्यासावीत. या पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘के सागर प्रकाशना’ने उपलब्ध करून दिला आहे.
  •    भूगोलामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्नांचा समावेश केलेला आहे. दूरसंवेदनावरही प्रश्न विचारलेला दिसून येतो.
  •    या घटकावरील प्रश्न तथ्यात्मक आणि बऱ्याच अंशी थेट असल्याचे दिसून येतात.
  •    एकूण विषयाचा आवाका पाहता जागतिक भूगोलातील महत्त्वाचे तथ्ये कोष्टकामध्ये मांडून पाठ करण्यापुरतेच मर्यादित ठेवणे व्यवहार्य आहे.
  •    भारताच्या प्राकृतिक भूगोलावर तर महाराष्ट्राच्या आíथक, राजकीय व प्राकृतिक भूगोलावर भर देणे आवश्यक आहे.
  •    या घटकाच्या तयारीसाठी ‘माजिद हुसेन’ यांचे ‘वर्ल्ड जिओग्राफी’, ‘जिओग्राफी ऑफ इंडिया’ आणि ‘के. ए. खतीब’ यांचे ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
  •  नागरिकशास्त्र घटकामध्ये राज्यघटना, स्थनिक स्वराज्य शासन आणि राज्यव्यवस्था विषयातील मूलभूत संकल्पना / सिद्धांत विचारलेले दिसून येतात.

या घटकावरील संकल्पनात्मक प्रश्न हे विषयाची समज असेल तर सोडविता येतील असे आहेत. तर तथ्यात्मक प्रश्नांची काठिण्य पातळी पाहता राज्यघटना व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे कायदे मुळातून व बारकाईने अभ्यासणे आवश्यक ठरते.

या घटकाच्या अभ्यासासाठी ‘एम. लक्ष्मीकांत’ यांचे ‘इंडियन पॉलिटी’ व ‘के सागर प्रकाशना’चे ‘महाराष्ट्रातील पंचायतराज’ ही पुस्तके उपयुक्त आहेत.

शासनाचे प्रकार, त्यांचे चांगले-वाईट गुणधर्म, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, घटनेतील महत्त्वाच्या तरतुदींमागचे तत्त्वज्ञान व हेतू, महत्त्वाची कलमे-मूलभूत हक्क, नीतीनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, केंद्र-राज्य संबंध, कायदा निर्मिती प्रक्रिया, केंद्र व राज्य कायदे मंडळे (संसद, विधानसभा, विधान परिषदा), न्यायपालिका, घटनात्मक पदे या साऱ्याबाबतच्या तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करताना ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांसाठीचे कायदे यांमधील तरतुदी बारकाईने पाहाव्यात.