आर्थिक, ग्रामीण आणि शाश्वत विकास

फारुक नाईकवाडे

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे भारतीय राजकीय यंत्रणा आणि भूगोल या घटकांची तयारी कशी करावी याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली.

या लेखामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, शाश्वत विकास आणि ग्रामविकास या घटकांची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या घटकांचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे

* भारतीय अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका, भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरणाचा परिणाम

* शाश्वत विकास – प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शाश्वत शेती आणि औद्योगिक विकास, शाश्वत विकासामधील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय संस्था व अशासकीय संस्थांची भूमिका

* राजकीय, आर्थिक, सामाजिक, दळणवळण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विकासाचा ग्रामीण जीवनावरील परिणाम

वरील अभ्यासक्रम समजून घेतला तर लक्षात येते की कृषी अधिकारी म्हणून ग्रामीण भागामध्ये कार्य करणे अपेक्षित असल्याने शेती, प्राथमिक क्षेत्रातील विकास आणि ग्रामीण विकासाशी निकटतेने संबंधित असलेले मुद्दे फक्त समाविष्ट केलेले आहेत. या तिन्ही घटकांचा एकमेकांशी संबंध जोडून आणि एकत्रितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. अशा अभ्यासामुळे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या दृष्टीने योग्य तयारी शक्य होईल. तयारी कशा प्रकारे करता येईल ते पाहू.

* अर्थव्यवस्थेच्या शेती तसेच प्राथमिक क्षेत्रावर अभ्यासक्रमामध्ये आणि त्यामुळे प्रश्नांमध्ये विशेष लक्ष दिले आहे. शेती व प्राथमिक क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न, आव्हाने, समस्या, त्यांची कारणे, परिणाम आणि त्यावरील संभाव्य उपाय या बाबी समजून घ्यायला हव्यात. यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, ग्रामीण स्थानिक हस्तोद्योग यांचाही समावेश करायला हवा.

* या क्षेत्रांची भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिका अभ्यासण्यासाठी त्यांचा सकल घरेलू / राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न (GDP & GNP), आणि भारतीय आयात व निर्यातीमधील वाटा या बाबतीतील दरवर्षीची अद्ययावत आकडेवारी (टक्केवारी), हरित क्रांती व त्यानंतरच्या कालखंडातील या क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेतील बदललेला हिस्सा या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

* तसेच खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यावर विशेषत: जागतिकीकरणाचे या क्षेत्रांवरील परिणाम समजून घ्यायला हवेत. यासंबंधात गॅट करार, जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदांमधील ठराव / निर्णय व त्याबाबतची भारताची भूमिका व्यवस्थित समजून घ्यावी. याबाबत चालू घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे.

* भारतीय अर्थव्यवस्थेवर या खुल्या धोरणाचा झालेला परिणाम हा या क्षेत्रांवर भर देऊन अभ्यासणे आवश्यक असले तरी एकूण जागतिक व्यापार व अर्थव्यवस्थेमधील भारताचे स्थान, त्या संबंधित निर्देशांकातील भारताचे स्थान या समष्टी अर्थशास्त्रातील (Macro Economics) बाबी समजून घ्याव्यात.

* शाश्वत विकासातील पर्यावरणाशी संबंधित बाबी मूलभूत संकल्पनांसहीत समजून घ्यायला हव्यात. प्रदूषण, त्याचे प्रकार, त्याचे परिणाम, त्याच्या निवारणाशी संबंधित उपाय, कायदे आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयत्न हे मुद्दे पहायला हवेत.

* नैसर्गिक साधनसंपत्ती, तिचे प्रकार, स्रोत, तिच्या वापरावरील मर्यादा, अतिरीक्त वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील तसेव संवर्धनासाठीचे संभाव्य उपाय या मुद्यांच्या आधारे महत्वाच्या खनिज व इतर नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करायला हवा.

* शाश्वत विकासाचा अभ्यास संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अभ्यासाने सुरु करणे आवश्यक आहे. त्यातील अन्न सुरक्षेतील शाश्वत शेती, पोषण; स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, जमिनीवरील आणि पाण्यातील सजीव सृष्टी या उद्दिष्टांबाबतचे प्रयत्न यांवर भर द्यायला हवा.

* याबाबतच्या विविध स्तरावरील प्रयत्नांचा आढावा घेताना भारताची निर्धारीत लक्ष्ये, सौर ऊर्जाविषयक प्रयत्न, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम उदा. रासायनिक खते, प्लास्टीक यांबाबतची धोरणे, हरीत न्यायाधीकरणाचे महत्त्वाचे निर्णय, शाश्वत व हवामानपूरक शेतीसाठीची अभियाने, या क्षेत्रातील ठळक अशासकीय संस्थांचे कार्य असे मुद्दे विचारात घ्यावेत.

* ग्रामीण जीवनावर सखोल परिणाम करणाऱ्या पाच क्षेत्रांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्यातील राजकीय क्षेत्रातील विकासाचा अभ्यास ७३वी घटनादुरुस्ती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुपाने झालेले विकेंद्रीकरण या राज्यव्यवस्था घटकातील मुद्यांच्या आधारे करावा. या उपायांमुळे ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

* ग्रामीण जीवन हे शेती केंद्रीत असल्याने आर्थिक विकासाचा ग्रामीण जीवनावरील परिणाम अभ्यासताना वर चर्चा केलेल्या आर्थिक व शाश्वत शेतीविषयक मुद्यांचा ग्रामीण जीवनावरील प्रत्यक्ष परीणाम समजून घ्यावा.

यामध्ये राहणीमान, उत्पन्न, कर्जपुरवठा, रोजगाराची उपलब्धता हे आयाम लक्षात घ्यावेत.

* आरोग्य क्षेत्रातील विकासामुळे ग्रामीण क्षेत्रातील आरोग्यसेवांची उपलब्धता, अर्भक, बाल व माता मृत्यू प्रमाणातील बदल, अंगणवाडी सेवा, आशा कार्यकर्त्यांचे कार्य, जिल्हा व ग्राम स्तरावरील शासकीय आरोग्य सेवा व त्यांची अवस्था तसेच याबाबत शासकीय योजना व उपक्रम या मुद्यांच्या अनुषंगाने आढावा घ्यावा.

* दळणवळणाची साधने, इंटरनेट, मोबाईल, विविध अ‍ॅप्स यांचा ग्रामीण जीवनावरील परिणाम समजून घ्यावा. यामध्ये शासकीय सेवा, शिक्षण, बँकिंग, शेती, व्यापार या क्षेत्रातील प्रगतीसाठी होणारा उपयोग विशेषत्वाने लक्षात घ्यावा.