फारुक नाईकवाडे

महाराष्ट्र कृषिसेवा पूर्वपरीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिकांमधील मराठी घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण मागील लेखामध्ये करण्यात आले. या विश्लेषणाच्या आधारे मराठी भाषा घटकाची तयारी कशी करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

प्रश्नपत्रिकेतील २०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. १०० प्रश्नांमध्ये ३० गुणांचे १५ प्रश्न मराठी भाषा घटकाचे आहेत. पेपरचा स्तर शालांत (दहावी) परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याप्रमाणे योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल अशी प्रश्नांची काठिण्य पातळी असल्याचे वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते. त्यामुळे १५ पैकी किमान १२ गुण तरी या घटकामध्ये मिळवणे हे चांगल्या गुणसंख्येसाठी आवश्यक आहे. या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.

* या पेपरच्या अभ्यासक्रमाचे भाषिक आकलन (शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार व उताऱ्यावरील प्रश्न) आणि व्याकरण (शब्दांचे प्रकार, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूपे, संधी, समास, अलंकार आणि वाक्यरचनेतील काळ, प्रयोग आणि वाक्याचे प्रकार) असे ढोबळमानाने दोन भाग दिसून येतात.

* अभ्यासक्रमामध्ये वाक्यरचना आणि व्याकरण यांचा वेगवेगळा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांवरील प्रश्नांची संख्या कमी-जास्त होऊ शकते हे लक्षात घेऊन वाक्यरचना हा भाग जास्त भर देऊन अभ्यासावा लागेल.

* उर्वरित व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

व्याकरण हा नेमक्या नियमांनी बनलेला घटक असल्याने नियम व्यवस्थित समजून घेतल्यास वस्तुनिष्ठ प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतील. भाषा विषयामध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी भावार्थ व शब्दप्रभुत्व कमजोर असल्यानंतर येणाऱ्या मर्यादा येथे कमी प्रमाणात जाणवतील. आणि त्यामुळे चांगली गुणसंख्या मिळवता येईल.

* अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

* विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद्भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. यामुळे अनोळखी शब्द विचारला गेल्यास सामान्यज्ञान वापरून प्रश्न सोडविता येईल.

* वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात. काळ आणि प्रयोग यांची उदाहरणे नुसती पाठ करून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविता येत नाहीत. त्या त्या काळाची किंवा प्रयोगाची वाक्यरचना, त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यये यांचे स्थान व इतर घटकांशी संबंध व्यवस्थित समजून घेतले तर हे प्रश्न सोडविणे सहज सोपे होते. वाचताना खूप अवघड वाटले तरी रोज एका वाक्याचे सगळ्या काळ आणि प्रयोगात रूपांतर करणे हा सराव करत राहिल्यास नियम पक्के लक्षात राहतील.

* म्हणी व वाक्प्रचार हा या पेपरमधील खूप महत्त्वाचा भाग आहे. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि सामान्य ज्ञान, व्यावहारिक ज्ञान यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे भाषेतील म्हणी, वाक्प्रचार वारंवार नजरेखालून जातात आणि त्यांचा समर्पक अर्थही लक्षात येतो व राहतो.

* तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा िपट्र आऊट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा.

* समानार्थी / विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी, उकारांमधील बदलामुळे तसेच काना, मात्रा, वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. ‘पाणि’ म्हणजे हात आणि ‘पाणी’ म्हणजे जल.

* एकाच शब्दाचे पूर्णपणे वेगळे असे अर्थ असू शकतात. उदा. ‘वर’ या शब्दाचे पती आणि आशीर्वाद असे अर्थ आहेत. अशा शब्दांचे जास्तीतजास्त अर्थ माहीत असल्यास शब्दार्थाशी संबंधित फसवे प्रश्न आत्मविश्वासाने सोडवता येतील.

* उताऱ्यावरील प्रश्न आतापर्यंत विचारलेले नसले तरी त्यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असल्याने त्यांचीही तयारी आवश्यक आहे. यासाठी सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष पेपर सोडविताना आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा.

वाचन करतेवेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.