रोहिणी शहा

मागील लेखामध्ये व्यवस्थापकीय अभिवृत्ती आणि निर्णयक्षमता या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या चच्रेच्या अनुषंगाने प्रश्नांची सर्वात योग्य उत्तरे कशा प्रकारे शोधता येतील याबाबत आयोगाच्या सन २०१८च्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाच्या उदाहरणातून या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

क्षणाचाही वेळ न लागता दंगली उसळणाऱ्या भागात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची कामगिरी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद सुरू आहे. त्यापैकी मोठय़ा संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू पाहतात. सकाळीच दादागटाने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी तेथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलीस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजूत झाली. सायंकाळी लाठय़ा आणि पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;

१) जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोळीबार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगाल. (गुण ०)

२) कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल. (गुण १.५)

३) अटक केलेल्या नेत्याशी बोलाल आणि त्याने स्वत: तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजूत घालाल. (गुण २.५)

४) त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती कराल. (गुण १)

स्पष्टीकरण –

दिलेल्या प्रसंगातील महत्त्वाच्या बाबी आहेत – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारप्राप्त व्यक्ती ही तुमची भूमिका; दंगली उसळू शकतील असे संवेदनशील वातावरण; चकमकीबद्दल अफवा पसरल्याने संतप्त झालेला हिंसक जमाव आणि त्यामुळे हाताळण्यास अवघड झालेली परिस्थिती; जीवित व वित्त हानी होऊ शकण्याची शक्यता.

*दिलेले सर्व पर्याय अमलात आणण्याची अधिकारिता तुमच्याकडे आहे. त्यामुळे अधिकाराचा वापर तुम्ही किती कौशल्यपूर्वक करता यावर यशापयश अवलंबून आहे.

* पर्याय एकमधील कार्यवाही ही तुमचा व तुमच्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी वेळ पडल्यास वापरावी लागेल अशा प्रकारची व रोखठोक असली तरी त्यातून होणाऱ्या परिणामांचा विचार करता सर्वोत्तम व पहिल्या प्राधान्याचा पर्याय ठरू शकत नाही. अशा ‘सिंघम’ पद्धतीच्या पर्यायातून उतावळेपणा आणि असंवेदनशीलता दिसून येते. त्यामुळे या पर्यायाला शून्य गुण देण्यात आले आहेत.

* पर्याय क्रमांक चार हा स्वत:चे अधिकार वापरण्याऐवजी इतरांना परिस्थिती हाताळण्याची विनंती करणारा वाटतो. मात्र एकूण संवेदनशीलता पाहता योग्य व्यक्तींची मदत घेण्यात जास्त व्यवहार्यता दिसून येते. अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींचा लोकांशी संपर्क व त्यांच्यावर प्रभाव जास्त असतो. अशा वेळी त्यांच्या हस्तक्षेपामुळे जमाव िहसक बनणार नाही व तुमचे म्हणणे ऐकून घेईल याची शक्यता वाढते. त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य ठरतो.

* पर्याय कमांक दोनमध्ये नेत्याच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही खात्री देणे हे व्यवहार्य आहे. आणि जमावातील काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलायची संधी देण्यातून त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे हा पर्याय जास्त विश्वासार्ह वाटत असला तरी जमाव हिंसक झालेला असताना अशा प्रकारे बोलण्याची संधी मिळेलच, हे सांगता येत नाही. तसेच नेत्यालाच धोका आहे अशी समजूत झालेला जमाव या प्रस्तावाबाबत विश्वास ठेवेल याची खात्रीही देता येत नाही. त्यामुळे संवेदनशील आणि व्यवहार्य असला तरी हा पर्याय तितका परिणामकारक ठरणार नाही.

* पर्याय क्रमांक तीनमध्ये जमावाच्या नेत्याला त्याच्या सुरक्षिततेबाबत जमावाला खात्री देण्यासाठी तयार करणे हा विचार सर्वाधिक योग्य आहे. नेत्याला परिस्थितीची जाणीव करून देऊन तुमच्या प्रस्तावासाठी तयार करण्यासाठी शांतपणे चर्चा करता येणार आहे. स्वत: नेताच जमावासमोर येईल तेव्हा आपोआपच त्याच्या सुरक्षिततेची खात्री पटून जमाव हिंसक कारवाईपासून परावृत्त होईल.

वरील विश्लेषणाचा विचार करता आयोगाने पर्याय चारला १ गुण, पर्याय दोनला १.५ गुण आणि पर्याय तीनला २.५ गुण दिले आहेत, त्यामागचा विचार लक्षात येतो.