डॉ. नीता ताटके,  क्रीडा मानसतज्ज्ञ

करोनानंतर नोकरी व्यवसायाच्या संधी कशा बदलत जातील, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत.  टाळेबंदीच्या काळातील ठप्प झालेले व्यवहार आणि अर्थचक्रातील बदल पाहता त्या रास्तही आहेत पण पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेच. पुढच्या काळातील करिअरचा मार्ग कसा असेल, याविषयी विविध विषयांतील तज्ज्ञांनी लिहीलेली ही लेखमाला..

खेळणे ही माणसांची नैसर्गिक ऊर्मी! धावणे, उडय़ा मारणे, लोंबकळणे, झोका घेणे, डुंबणे, पोहणे अशा विविध माध्यमांतून या नैसर्गिक ऊर्मीला वाव मिळत असे. यानंतर हळूहळू खेळण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या साधनांचा वापर करायला माणसांनी सुरुवात केली. स्वत: न खेळता, प्राण्यांच्या झुंजी, माणूस व प्राणी यांच्या झुंजी आणि इतर माणसा-माणसांच्या लढती बघतही तो आपली करमणूक करून घ्यायला लागला. कालांतराने खेळाला एक शिस्तबद्ध स्वरूप आले. खेळाच्या स्पर्धा आल्या, त्याचे नियम तयार झाले, स्पर्धेतील यश वैयक्तिक न रहाता राष्ट्राचे झाले, खेळाचे ‘इव्हेन्ट्स’ झाले, खेळाडूंना पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळू लागली. खेळाला पूरक असे अनेक उद्योग उभे राहिले आणि अनपेक्षितपणे करोनाच्या वैश्विक महामारीने पत्त्यांचा बंगला कोसळावा अशी खेळ व क्रीडा क्षेत्राची अवस्था गंभीर करून टाकली.

कोणत्याही संकटाचा मुकाबला करायचा, प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायचा हा एक खूप मोठा गुण माणसाकडे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकटाला संधी मानण्याचा अनमोल सल्ला देशवासीयांना दिला. तद्नुसार पहिल्या काही दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर किंचित काळ थबकलेल्या क्रीडा क्षेत्राने गती घेतली. सुरू झाले ‘इंटरनेट’च्या माध्यमातून व्यायामाचे वर्ग, ‘यू-टय़ूबवर प्रशिक्षणाचे व्हिडीओ, मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती, आपल्याच खेळाडूंपर्यंत सीमित न राहता राष्ट्रीय—आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ‘वेबिनार’ आणि या प्रक्रियेमध्ये सामान्यांपासून अगदी ‘सेलेब्रिटीज’पर्यंत सर्वच दिसले. काही क्रीडा संघटनांनी ‘ऑनलाइन’ स्पर्धाही घेतल्या. केवळ करोनाचाच नव्हे तर टाळेबंदीचाही अंत दृष्टिपथात येत नसताना, संगणकीय आंतरजालावरती उठलेल्या या क्रीडा वादळांनी काही मोठी आव्हाने समोर उभी केली आहेत.

अनेक क्रीडा प्रशिक्षकांनी स्वत:हून, तर काहींनी संस्था, शाळा वा क्रीडा संघटनांच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ क्रीडा वर्ग घ्यायला सुरुवात केली. यासाठी लागणाऱ्या अगदी मूलभूत सुविधा जरी बघितल्या तर त्यात येतात- ‘संगणक, लॅपटॉप वा स्मार्टफोन’ ही महागडी उपकरणे आणि ‘वाय-फाय’ किंवा ‘३ जी-४ जी’चे वेगवान ‘नेटवर्क’. आपापल्या घरात हे व्यायाम केले जाणार असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे वा त्यांच्या पालकांकडे हे स्वत:चे साधन असायला हवे, म्हणजेच ते घर सधन असायला हवे. आजकाल पालकांचेही ‘घरूनच काम’ सुरू असल्याने काही घरांमध्ये पालकांच्या कचेरीची ही साधने उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा काही मुलांनाही आपसूक मिळत असला तरी शाळेचे वर्ग, शिकवणीचा अभ्यासवर्ग या प्राधान्यक्रमापुढे क्रीडा प्रशिक्षण मात्र मागे पडणार आहे.

खेळाचा वर्ग हा कृतिजन्य असतो. खेळ एकटी व्यक्ती खेळत नाही. त्यासाठी मित्र, मैत्रिणी लागतात. व्यायाम करतानासुद्धा जर सहकारी असेल तर व्यायाम चांगले केले जातात. प्रत्यक्ष वर्ग सुरू असताना असलेली शिक्षकांची नजर, इतरांबरोबर खेळताना करावा लागणारा समन्वय आदी सर्व बाबी या संगणकीय वर्गात नसल्यामुळे व्यायामासाठी ऊर्जा, उत्साह व प्रेरणा यांचा अभाव आढळून आला तर नवल ते काय? यावर मात करण्यासाठी क्रीडाशिक्षकांना खूपच सर्जनशील व्हावे लागेल. स्वत:चे प्रभावी व्यक्तिमत्त्व, चांगले वक्तृत्व, बोलण्यातील मिठास याबरोबरच योग्य तंत्र, मनावरचा संयम या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. मात्र प्रशिक्षकामध्ये ही  सर्व कौशल्ये असूनही घरात असलेली मुले एक वेळ शारीरिक कृती करतील, मात्र त्यात त्यांचे मन किती रमेल यावर नक्कीच प्रश्नचिन्ह आहे.

घरात असलेली प्रत्येक व्यक्ती स्वत:चे विश्व सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना मुलांसाठी त्यांचे विश्व तयार करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. हा ‘ऑनलाइन’ वर्ग घेताना प्रशिक्षक ना मुलांना रागावू शकतात ना कौतुकाची थाप पाठीवर मारू शकतात. संगणकाच्या एका बाजूला असलेला प्रशिक्षक तसे बघायला गेले तर असहाय असतो. समोरची मुले काही चुकीचे करत आहेत, मस्ती करत आहेत अथवा त्यांचा ‘व्हिडीयो’ सुरू न झाल्यामुळे ती त्याला दिसत नाही आहेत, वर्ग सुरू असताना समोरच्या यंत्रावर वेडय़ावाकडय़ा रेघोटय़ा मारत आहेत, अशा वेळी प्रशिक्षक काही करू शकत नाही. मात्र या शिक्षकांवर पालकांची, त्यांच्या संस्थेची कायम नजर असते, वर्गाचे संपूर्ण चित्रीकरण होत असते, त्यामुळे इथे शिक्षकांनी अनवधानानी केलेल्या चुकीलासुद्धा क्षमा नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे प्रशिक्षक प्रचंड तणावाखाली येऊ शकतो, ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी नाही आहे. ‘या तंत्रज्ञान प्रणालीची उपलब्धता, त्याचे सर्व संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि मग त्याचा सुयोग्य वापर’ हे एक मोठे आव्हान आपणा सर्वासमोर आहे.

अनेक खेळाच्या संघटनांनीसुद्धा अनेक ‘ऑनलाइन’ उपक्रम सुरू करून या बदलत्या व्यवस्थेशी जुळवून घेण्याचा चांगला प्रयत्न केला. आपापल्या खेळातल्या दिग्गजांच्या मुलाखती, प्रशिक्षणाची मूलभूत तत्त्वे, सुरक्षेचे नियम आदींवर चांगले उपक्रम घेण्यात आले. काही संघटनांनी ‘ऑनलाइन’ स्पर्धाही घ्यायला सुरुवात केली. क्रीडाप्रेमी याविषयी एका बाजूनी आनंदी आहेत, पण यामध्येदेखील अनेक प्रश्न उभे राहात आहेत. आपापल्या ठिकाणाहून स्पर्धा खेळताना स्पर्धा वातावरण, स्पर्धा साहित्य यांचे प्रमाणीकरण कसे होणार? ते तपासण्यासाठी काही यंत्रणा आहे का? आतापर्यंत वापरत असलेली नियमावली या स्पर्धाना चालेल का? नसल्यास नवीन नियमावली आली आहे का? ती कोणी तयार केली? स्पर्धाचे नियम बदलताना काही प्रशासकीय प्रक्रिया असतात, त्या इथे पाळल्या गेल्या का? एखाद्या राज्य स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येतात, आभासी माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा अशा सर्व जिल्हे समावेशक असतील का? नसल्यास या स्पर्धा, त्यांचे निकाल किती प्रमाणात वैध धरले जावेत? याआधारे कुठले पुरस्कार, आर्थिक लाभ दिले गेल्यास ते योग्य ठरेल का? यातील ‘पंचगिरी’ चांगल्या दर्जाची राहील का? जे पंच ही माध्यमे चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाहीत ते बाहेर फेकले जाणार नाहीत का? समाजमाध्यमांचा चांगला वापर करू शकणारे पंचांवर/ संघटकांवर  काही अयोग्य दबाव सहज टाकू शकणार नाहीत का? या व अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधायला लागणार आहेत. साधन-संपत्ती-सुविधा असणारा ‘आहे रे’चा गट आणि हे कमी प्रमाणात असलेला किंवा नसलेला ‘नाही रे’चा गट या मधली दरी बुजविण्याचे खूप मोठे काम खेळाच्या माध्यमातून झाले होते, करोनाने या मुळालाच खूप मोठा धक्का दिला आहे. सर्वाना एकत्र ठेवण्याचे कार्य करणारा खेळ टिकवणे हेच मोठे आव्हान क्रीडा क्षेत्रातील लोकांसमोर आहे.

मोठी मैदाने, महागडी साधने लागणारे खेळ यांच्यासमोर खेळाचा गाभा न बदलता संपूर्ण खेळाची यंत्रणा बदलण्याचे वा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळण्याचे आव्हान असणार आहे. एका संक्रमण अवस्थेतून जात असतानाही खेळ खेळला जात आहे, त्यावर चर्चा होत आहे, बदलाचे वारे सहन करण्याची ताकद त्यात दिसत आहे, हेच खेळाचे मोठे सामर्थ्य आहे. करोना संकट संपेल तेव्हा खेळांनीही कात टाकून नवीन उभारी घेतली असेल हे नक्की!!