तामिळनाडूमधल्या इळूमथूर गावात राहणाऱ्या के. आर. दुराईसामी या शेतकऱ्याने संशोधनाअंती तयार केलेलं प्रारूप रोजच्या जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. शेतात पाणी उपसणाऱ्या पंपाच्या साहाय्याने कोणतंही वेगळं इंधन न वापरता भात कसा शिजेल, अन्नपदार्थ कसे गरम करता येतील, यासाठी त्यांनी शक्कल लढवली. या प्रयोगाचं एकस्वही त्यांना मिळालं आहे. त्याविषयी..
वेगवेगळ्या स्तरांवर आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनांतून अनेक विद्यार्थी मोठय़ा उत्साहाने भाग घेतात. विज्ञान प्रदर्शनांमध्ये मांडण्यासाठी हे विद्यार्थी प्रारूपं, प्रतिकृती तयार करून त्यामागचं विज्ञान काय आहे, हे समजावून देण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा विज्ञान प्रदर्शनांतून ‘विज्ञान कमी आणि कलात्मकता जास्त’ असं चित्र आढळतं. प्रदर्शनांतून मांडलेल्या प्रारुपांचा प्रत्यक्ष जीवनात किती आणि कशा प्रकारे उपयोग होईल, याची चाचपणी बऱ्याचदा केली जात नाही. बहुतेक वेळा असंही आढळतं की, प्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृतींचा प्रत्यक्षात वापर करणे मुळीच शक्य होणार नाही. त्यामुळे विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून संशोधक वृत्ती जोपासली जावी, हा उद्देश सफल होताना दिसत नाही. पण, तामिळनाडूमधल्या इरोडे जिल्ह्यातल्या इळूमथूर गावात राहणाऱ्या के. आर. दुराईसामी या शेतकऱ्याने तयार केलेलं प्रारूप म्हणजे एखाद्या विज्ञान प्रदर्शनात शोभावं असं मात्र रोजच्या जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. खरं तर या उपकरणाचा उपयोग करून दुराईसामी दररोज गरमागरम भात आणि रस्समचा आनंद घेत आहेत.
कोणतंही संशोधन हे गरजेमधून केलं जातं, असं म्हणतात. दुराईसामी यांच्या बाबतीतसुद्धा नेमकं हेच घडलं. आपल्या शेतात काम करणाऱ्या दुराईसामींसाठी दररोज दुपारी त्यांची पत्नी जेवण घेऊन यायची. दुराईसामींचं शेत घरापासून बरंच लांब असल्यामुळे त्यांची पत्नी शेतावर पोहोचेपर्यंत जेवण थंड होऊन जायचं. त्यामुळे दुराईसामींना रोज थंड झालेला भात आणि रस्सम खावा लागायचा. त्यामुळे दुराईसामी नाखूश असायचे.
आपल्या या समस्येवर काहीतरी उपाय काढला पाहिजे, या विचारात असतानाच पाणी उपसण्यासाठी शेतात बसवलेल्या पंपातून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे प्लास्टिकचा पाईप थोडासा वितळला गेल्याचं लक्षात आलं. यावरून दुराईसामींना एक नामी शक्कल सुचली. पाणी उपसण्यासाठी बसवलेल्या पंपातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेचा वापर अन्न गरम करण्यासाठी करता येऊ शकेल का, या दृष्टीने त्यांचं विचारचक्र सुरू झालं.
दुराईसामींनी मग पाणी उपसण्यासाठी वापरला जाणाऱ्या पंपाचा वापर कॉम्प्रेसरसारखा केला. त्यांनी एक प्रेशर कुकर घेऊन त्याच्या खालच्या बाजूने दोन भोकं पाडली. कॉम्प्रेसरमधून बाहेर पडणारी गरम हवा वाहून नेणारा एक पाइप कुकरच्या एका भोकात घट्ट बसवला आणि त्याला सील करून टाकलं. कुकरला पाडलेल्या दुसऱ्या भोकातून आणखी एक पाइप बसवून त्याचं कुकर बाहेर असलेलं टोक बंद केलं. जर कुकरमध्ये जास्त गरम हवा कोंडली गेली तर जादा असलेली गरम हवा या पाइपमधून बाहेर काढता यावी, हा त्यामागचा उद्देश होता.
सुरुवातीला दुराईसामींनी प्रेशर कुकरमध्ये एका पातेल्यात पाणी ठेवून ते गरम होतंय का, ते बघितलं. कॉम्प्रेसरमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे पाणी उकळलं. गॅसवर कुकर ठेवल्यावर जशी शिट्टी होते, तशी शिट्टीही झाली. दुराईसामींच्या प्रयोगाचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता.
त्यांनंतर त्यांनी एका पातेल्यात तांदूळ आणि योग्य प्रमाणात पाणी घेऊन ते पातेलं कॉम्प्रेसरला जोडलेल्या प्रेशर कुकरमध्ये ठेवलं. काही वेळात शिट्टी व्हायला लागली. प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ शिट्टीमधून वेगाने बाहेर पडायला लागली. दुराईसामींनी पंप बंद केला आणि भात झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुकरचं झाकण उघडायचा प्रयत्न केला. पण कुकरमध्ये कोंडलेल्या जास्त दाबाच्या वाफेमुळे त्यांना कुकरचं झाकण उघडता येईना. झाकण उघडण्यासाठी त्यांना थोडा वेळ वाट पाहावी लागली. अपेक्षेप्रमाणे दुराईसामींचा प्रयोग यशस्वी झाला होता. कुकरमध्ये भात शिजला होता. दुराईसामींच्या शेतात पाणी उपसणारा पंप आता त्यांच्यासाठी भात शिजवण्यासाठीही मदत करणार होता आणि तेसुद्धा कोणतंही वेगळं इंधन न वापरता!
प्रयोग यशस्वी झाला होता, पण त्यामध्ये आणखी सुलभता हवी होती. त्यासाठी दुराईसामींनी पेरूनदुराई इथल्या इन्स्टिटय़ूट ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी या संस्थेशी संपर्क केला आणि तिथल्या प्राध्यापकांची मदत घेतली. प्राध्यापकांनी दुराईसामींना प्रेशर कुकरमधून बाहेर पडणाऱ्या पाइपला प्रेशर व्हॉल्व्ह बसवण्याची सूचना केली. या प्रेशर व्हॉल्व्हमुळे कुकरमधली जास्त दाबाची गरम हवा बाहेर काढून कुकरचं झाकण लगेच उघडणं शक्य झालं.
या प्रयोगामुळे दुराईसामींना शेतावर दररोज गरमागरम जेवण मिळण्याची सोय झाली आणि तीही कोणतीही जास्तीची किंमत न मोजता! कालांतराने दुराईसामींनी आपल्या प्रयोगात काही सुधारणा केल्या. उष्णतेचं वहन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी काही ठिकाणी तांब्याच्या नळ्यांचा उपयोग केला. केवळ सात मिनिटांमध्ये भात आणि नऊ मिनिटांमध्ये इडली करणं; तसंच केवळ पाच मिनिटांमध्ये ३० अंडी उकडणं दुराईसामींनी वाया जाणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर करून शक्य करून दाखवलं. या प्रयोगाचं एकस्व त्यांना मिळालं आहे.
संशोधनाचा उपयोग आपलं दैनंदिन जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने होणं अपोक्षित असतं. दुराईसामींनी तयार केलेल्या प्रयोगावरून नेमकं हेच साध्य होतं.
मुळातच दुराईसामी यांची वृत्ती संशोधकाची आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना शोधक वृत्तीने बघण्याची आणि त्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्याची सवय त्यांना उपजतच आहे. वयाची साठी उलटली तरी ४० एकरांच्या आपल्या शेतात नारळाच्या शेतीबरोबरच दुराईसामींचं संशोधन कार्यसुद्धा सुरू असतं. नारळाची उंच वाढणारी जात आणि तुलनेने खुजी असलेली नारळाची जात यांचा संकर करून एक नवीन जात विकसित करण्यात त्यांना यश आलं आहे. नारळाच्या या संकरित जातीमुळे केवळ दोन वर्षांत उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. दुराईसामींच्या या संशोधन कार्याची दखल गुजरातच्या नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन या संस्थेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन घेतली आहे.     
hemantlagvankar@gmail.com