माणूस अनादिकालापासून प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर व अधिकाधिक सुंदर कशी करता येईल याकरिता सतत नवनवे शोध लावण्याकरिता प्रयत्नशील राहिला आहे. गडगडत जाणाऱ्या दगडापासून चाकांच्या उत्क्रांतीपर्यंत व खळाळत वाहणाऱ्या धबधब्यातून वीजनिर्मितीपर्यंत कल्पनेलासुद्धा कल्पना येणार नाही, असे विचार माणसाच्या बुद्धीतून साकारत गेले आहेत व अनंतकाळापर्यंत साकारले जाणारच आहे. त्यातीलच एक कलादालन म्हणजे फोटोग्राफी. समोर दिसणारे दृश्य व्यक्ती आणि निसर्ग अगदी काहीही जसेच्या तसे टिपता आले व कायमस्वरूपी जतन करता आले तर.. या विचारातून जन्म झाला फोटोग्राफीचा. अनेक नामवंत प्रकाशचित्रकारांनी त्यात आपापल्या परीने वेगवेगळी क्षेत्रं विकसित केली. पोट्र्रेट (व्यक्तिचित्र), निसर्गचित्रे, फॅशन, प्रॉडक्ट ग्लॅमर, ज्वेलरी असे असंख्य प्रकार आहेत, ज्यात तुम्ही करिअर करू शकता. गंमत म्हणजे इथेसुद्धा प्रथम स्वत:ला आनंद देणारे आणि एकटय़ानेच करता येणारे करिअर करता येते. विवाहसमारंभ तर छायाचित्रकाराशिवाय होऊच शकत नाही. मग तो नोंदणी विवाह असो किंवा समारंभपूर्वक केलेले लग्न असो. निगेटिव्हज् डेव्हलपिंगच्या काळात तर त्यांना जादूगारच समजायचे. दोन हातात एक खोका घेऊन प्रकाशाशी खेळणारे जादूगार विलास भेंडे, गौतम राजाध्यक्ष, जगदीश माळी, अधिक शिरोडकर, अतुल कसबेकर असे कितीतरी मराठी छायाचित्रकार आपली वेगळी ओळख पटवून आहेत. त्यांनी आपापल्या कार्याचा एक वेगळाच ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. आता तर डिजिटल क्रांतीमुळे या क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी अमाप आहेत आणि हो! छोटेसे डिजिटल प्रिंट बुक बनवणे आता फार खर्चाचे राहिलेले नाही. आपण कोणताही विषय निवडा, त्याची फोटोग्राफी करा व पुस्तक छापा, इतकं ते सोप्पं झालेलं आहे. एकाच कॅमेऱ्यात सर्व ऑप्शन्स प्लग्ड आहेत. एकदा हा कॅमेरा कसे काम करतो हे समजून घेतले की, आपण आणि आपली कल्पनाशक्ती अनंतरूपे अनंतनामे विकसित होऊ शकते. इथे पण इंटरनेट आपल्याला अतिशय उपयोगी आहे. वेगवेगळ्या मेगा पिक्सेलचे अनेक प्रकारची फंक्शन्स असलेले वैविध्यपूर्ण सेन्सची उपलब्धता सध्या मार्केटमध्ये आपल्यासाठी सज्ज आहेत. आपण या क्षेत्रात उत्तम प्रतीचे काम करण्यासाठी उत्तम साधनसामग्री आवश्यकच आहे. अगदी दोन ते पाच हजारांपासून कित्येक लाख रुपयेसुद्धा एका दिवसाला तुम्ही आपल्या कलेच्या जोरावर मिळवू शकता. त्यासाठी अनेक फोटो बँकसुद्धा काम करीत आहेत. जगभर चालणाऱ्या अनेक स्पर्धातून भाग घेऊन आपण आपले कर्तृत्व सिद्धच करू शकतो. गरज आहे ती इच्छाशक्तीची. आता कॅमेरे सहज उपलब्ध आहेत. प्रथम आपल्या गरजेनुसार त्याची योग्य निवड करावी व तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेतल्यास आलिशान विवाह समारंभ हे आता इव्हेण्ट बनले आहेत. त्याचा उपयोग करून घेता येईल. या कार्यक्षेत्राची सुरुवात अगदी लगेच आपल्या घरापासून सुरू करता येते. पोर्टफोलिओ, प्रवासचित्रण, लहान मुले, वाढदिवस, बारसे अगदी घरगुती छोटय़ा समारंभातून तुम्ही स्वत:ची परीक्षा स्वत:च घेऊ शकता. अधिक मार्गदर्शनासाठी अनेक प्रकारच्या कार्यशाळा, पदविका, पदव्या आपले ज्ञान विकसित करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी कॅमेरा मात्र ‘एसएलआर’च घ्यावा. सुरुवातच योग्य कॅमेऱ्यापासून करावी. कारण छायाचित्रणासाठी प्रसंगानुरुप आपल्याला वेगवेगळ्या लेन्सेस वापराव्या लागतात आणि ती सुविधा याच कॅमेऱ्यात उपलब्ध आहे. तोच तर खरा कॅमेऱ्याचा डोळा आहे. आपल्या डोळ्यांमागे जसा आपला मेंदू कार्यरत असतो, त्या आपल्या डोळ्याला कॅमेऱ्याचा डोळा भिडला की सृष्टीतील सप्तरंग उधळत आपल्यासमोर छायाचित्राच्या रूपात येतात. फोटोग्राफीचे करिअर कधीच अपयशी ठरत नाही. व्हा फोटोग्राफर आणि दाराच्या पाटीवर लिहा, ‘येथे फोटोग्राफर राहतात.’ ज्यांचा डोळा १२० मेगा पिक्सेल आहे, अगदी तुमच्याच सारखा, पण चित्र-छायाचित्र वेगळेच निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. मग उघडणार ना तिसरा डोळा?