स्वाती केतकर- पंडित

जि. प. शाळा हाताणे, ता. मालेगाव, जि. नाशिक या शाळेमध्ये मुळाक्षरे गिरवली जातात मुकुटावर, तर गणिते सुटतात खिशांवरच्या संख्यापत्रांवर, तर वर्गातली हजेरी सजते उपस्थिती कुंडीमध्ये. या सगळ्या गोष्टी साकारल्या आहेत, तेथील प्रयोगशील शिक्षिका वैशाली भामरे यांच्या कल्पनेतून..

अगदी लहानपणापासून वैशाली भामरेंना शिक्षिकाच व्हायचे होते. त्यामुळे बारावीनंतर कला शाखा घेऊन त्यांनी गुणांच्या बळावर डीएडला प्रवेश घेतला. आणि शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांना लगेच नोकरीही मिळाली ती पण जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका म्हणून.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नागमठाण येथे २००३ मध्ये त्या रुजू झाल्या. पहिली ते सातवीपर्यंतची ही शाळा मोठी होती. अगदी एखाद्या नवख्या शिक्षकाच्या स्वप्नातल्यासारखीच. वैशालींकडे पहिलीचा वर्ग आला. तिथे शिकवताना त्यांनी फक्त पाठय़पुस्तकांवर अवलंबून न राहता मुलांच्या जगण्यातील अनेक गोष्टींचा शिक्षण साहित्य म्हणून वापर केला. त्यात अगदी फुलापानांपासून बिया, गोटय़ा, रांगोळ्या इतकेच काय सुई-दोऱ्याचाही समावेश होता. अशाप्रकारे हसतखेळत अभ्यास शिकवणाऱ्या वैशाली लवकरच शाळेत आणि गावात सगळ्यांच्या लाडक्या शिक्षिका झाल्या. परंतु २००९ मार्चमध्ये त्यांची बदली झाली.

जिल्हा परिषद शाळा हाताणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक ही प्राथमिक शाळा होती आणि पटही चांगला होता. जवळपास १५०ची पटसंख्या होती, पण गैरहजेरीचे प्रमाण खूप होते. इथल्या अनेक विद्यार्थ्यांचे पालक मजुरी करणारे असल्याने आपल्या पाल्यांच्या गैरहजेरीबाबत म्हणावी तितकी संवेदनशीलताही नव्हती. शाळा मोठी असूनही तिला स्वत:ची सुस्थितीतील इमारत नव्हती. वैशालीसोबत बाकीचेही तीन शिक्षक तिथे बदली होऊन आले होते. सर्वानी निश्चय करून लोकसहभागातून शाळेसाठी बेंचची खरेदी केली. भिंतींना रंग दिले. अनेक नवोपक्रम राबवून त्याद्वारे शासनाकडून मदत मिळवली. शाळेच्या आवारात एकही झाड नव्हते. ही परिस्थिती बदलण्यासाठी वैशालींनी सहकाऱ्यांच्या आणि काही गावकऱ्यांच्या मदतीने वृक्षदिंडी काढली. शाळेतल्या प्रत्येक मुलाला एक झाड दत्तक दिले. त्या झाडाची काळजी त्यांनीच घ्यायची, असेही नेमून दिल्याने आज आवारात जवळपास १०० झाडे दिमाखात डोलत आहेत. या झाडांप्रमाणेच नव्याने बहरत आहेत, इथले विद्यार्थी.

इथेसुद्धा वैशालीकडे पहिलीचा वर्ग आला होता. आधीच्या शाळेत असतानाच वैशालीची ज्ञानरचनावादाशी ओळख झाली होती. त्यामुळे त्या सगळ्या कौशल्यांचा प्रभावी उपयोग त्यांनी हाताणे शाळेमध्ये करायला सुरुवात केली. पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी विविध खेळ, गाणी, गप्पा यातून त्यांनी शिकवायला सुरुवात केली. उपस्थिती ही तर या शाळेतील महत्त्वाची समस्या होती. त्यावर उत्तर म्हणून वैशालींनी ‘उपस्थिती फूल’ हा उपक्रम हाती घेतला. ज्या दिवशी ज्या वर्गाची उपस्थिती जास्त असेल त्या वर्गाला परिपाठामध्ये ‘खास उपस्थिती फूल’ मिळत असे. हे फूल मिळवण्यासाठी मुलांची अगदी चढाओढ लागत असे. त्यातून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. मुळाक्षरांची ओळख करून देताना ती फक्त वाळूवर किंवा पाटीवर गिरवून नव्हे तर ‘मुळाक्षराच्या मुकुटा’तून विद्यार्थ्यांना होऊ लागली. हे मुळाक्षरांचे मुकुट वैशालींनी स्वत: बनवले आहेत. उदा. ‘घ’ घराचा तर मुकुटावर घराचे चित्र असून त्यात ‘घ’ हे अक्षर असे. असे मुकुट घालून मुलांना जणू काही राजाच झाल्यासारखे वाटे शिवाय अभ्यास होई, तो वेगळाच. मग दोन अक्षरांतील दोन राजे शेजारी आले, की तयार होत शब्द. या दोन मुलांमध्ये बोलणे होताना आपसूकच दोन अक्षरांमध्ये संवाद घडत असे. याचबरोबर वैशालींनी ‘उपस्थिती कुंडी’ हा उपक्रम घेतला. यामध्ये वर्गातील प्रत्येक मुलाच्या नावाचे एक कागदी फूल तयार केले जाते. कागदी कुंडीमध्ये त्या दिवशी उपस्थित असलेल्या मुला-फुलांची नावे लागत. आपलेही नाव या कुंडीत यावे, यासाठी विद्यार्थी न चुकता शाळेत येतात.

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी तर लावायची होती पण यातल्या अनेकांना घरातून पाठय़पुस्तकापलीकडे काही साहित्य वाचायला मिळणे कठीण होते. मग त्यांच्यासाठी ‘रद्दीतले बालवाचनालय’ सुरू झाले. यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके यांच्या रद्दीतून चांगली कात्रणे मुले आणि वैशाली शोधून काढत. मग ती चिकटवून त्याची वही तयार केली जाई. हेच ते रद्दीतले बालवाचनालय. अंतराळवीर, बोधकथा, शब्दकोडी, जगाची सफर, किल्ल्यांची ओळख, तिकिटे, कार्टूनचे जग, खेळाडू असे अनेक संग्रह विद्यार्थ्यांनी केवळ रद्दीतून जमा केले आहेत. यातूनच ‘अब्दुल कलाम वाचनकट्टय़ा’ची सुरुवात वैशालींनी केली. सध्या दररोज जेवणाच्या सुट्टीत हे वाचनालय, वाचनकट्टा चांगलाच गजबजलेला असतो. गणिताचे धडे घेताना ‘माझा खिसा’ हा अनोखा उपक्रम वैशालींनी राबवला. संख्यापत्रके तयार करून ती विद्यार्थ्यांच्या खिशाला लावली जातात. दिवसभरात विद्यार्थी स्वत:कडली संख्या तर पाठ करतच, पण कुतूहलाने मित्राकडे कोणती संख्या आहे, ते पाहून तीही पाठ होई. त्याचबरोबर सापशिडीच्या चौकडय़ांप्रमाणे संख्याज्ञानाची चौकटही वर्गाच्या जमिनीवर आखलेली आहे. या चौकटीतून खेळताना गणित एकदम सोपे होऊन जाते. स्पेलिंग पाठ करण्याचा दट्टय़ा न लावता उच्चारावरून इंग्रजी शिकवल्याने आता वैशालीच्या पहिलीच्या वर्गातली मुलेही त्यांच्यापरीने छान इंग्रजी बोलतात, तेही न घाबरता.

या सगळ्याबरोबरच कला, कार्यानुभवासारख्या विषयांनाही वैशाली विसरलेल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्या वर्गातले विद्यार्थी कला-कार्यानुभवाच्या अनेक उपक्रमांमध्ये पुढे असतात. रांगोळी, चित्रकला, हार करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, भेटपत्र बनवणे, पानाफुलांच्या राख्या बनवणे, अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थी कलेला वाव देत असतात. शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावरील चित्रकला, नृत्य, गायन स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. त्यासोबत शिष्यवृत्ती परीक्षेतही ते मागे नाहीत.

ई-लर्निग, डिजिटल शाळा हे नवे उपक्रम समजून घेऊन वैशालींनी सहशिक्षकांसोबत ते शाळेत राबवले आहेत. नुकतेच ‘प्रभावी विज्ञान शिकण्यासाठी नवीन आणि उदयोन्मुख माध्यमाचा वापर’ या विषयावरील वैशालीच्या शोधनिबंधाची निवड ‘टीचर्स सायन्स काँग्रेस’मध्ये झाली आहे. वैशालींनी लहानपणी स्वप्न पाहिले होते केवळ शिक्षिका होण्याचे, पण विद्यार्थ्यांसोबत दरदिवशी नवे शिकताना त्या आता प्रयोगशील आणि अधिक गुणी शिक्षिका होऊ पाहात आहेत.