|| रोहिणी शहा

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आíथक भूगोल अशी या घटकाची व्याप्ती विहित केलेली आहे. मात्र विश्लेषण करताना संकल्पनात्मक / प्राकृतिक भूगोल आणि जगाचा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल अशा प्रकारे विश्लेषण केल्यास अभ्यासाचीही चौकट ठरविणे आणि तयारी करणे सोपे होते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पुढील टेबलमध्ये देण्यात आले आहे.

वरील विश्लेषणावरून घटकनिहाय प्रश्नांची संख्या कळते आणि त्या त्या घटकाचे कमी जास्त होणारे महत्त्वही. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकांचे अवलोकन केल्यावर लक्षात येते की, जगाच्या भूगोलामध्ये मुख्यत: प्राकृतिक व सामाजिक भूगोलावर भर असतो तर भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक, आíथक आणि सामाजिक अशा क्रमाने घटकांना महत्त्व असते. महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर कमी प्रमाणात प्रश्न विचारले जात असले तरीही मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या दृष्टीने या घटकास महत्त्व असल्याने त्याचा सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे. या चच्रेच्या आधारावर भूगोलाची तयारी कशा प्रकारे करावी ते पाहू.

प्राकृतिक व संकल्पनात्मक भूगोल

भौगोलिक संकल्पनांवरील प्रश्नांवरील भर वाढत आहे. भूगोलाच्या या विभागांतर्गत भूगोलाच्या शाखा, सूर्यमालेतील इतर ग्रहांची वैशिष्टय़े, पृथ्वीच्या उत्पत्तीबाबतचे सिद्धांत, पृथ्वीचे अंतरंग आणि त्यातील विविध स्तरावरील दाब, तापमान असे भौतिक गुणधर्म, भू अंतर्गत हालचाली, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन), वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची, वाऱ्यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास आवश्यक आहे.  या घटनांचा दिलेल्या क्रमाने समजून घेत अभ्यास करणे फायद्याचे ठरेल. या संकल्पना समजल्या की त्यावरील विश्लेषनात्मक, बहुविधानी प्रश्न तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न सोडविणे सोपे होते.

जगाचा भूगोल

ज्वालामुखी, सागरी प्रवाह, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरूपे, मृदा, हवामान, वने, बंदरे यांच्याबद्दलचे प्रश्न विचारण्यावर भर दिलेला दिसून येतो. नकाशा समोर ठेवून या घटकांचा अभ्यास केल्यास विषय समजून घेण्यसाठी उपयोगी ठरतोच शिवाय फोटोग्राफिक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो.

या विभागात अग्निकंकणाचा भाग असणारे प्रदेश, स्थानिक वारे, क्षारतेनुसार समुद्रांचा क्रम, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, भुरूपे, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे आणि त्यांची वैशिष्टय़े, विविध भागांत आढळणारे विशिष्ट संस्कृतीचे लोक आणि प्रदेश तसेच जगात घेतली जाणारी चहासारखी नगदी पिके आणि त्यांची वैशिष्टय़े या उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे ठळक भूरूपे, ठळक जमाती व त्यांचे प्रदेश या बाबींच्या टेबलमध्ये नोट्स व नकाशावर अभ्यास आवश्यक आहे.

भारताचा भूगोल

या विभागात साधारणपणे भारतातील हवामान, पर्जन्य, पठारे, पर्वतरांगा, नद्यांची खोरी – त्यांचा आकार, पशुधन, कृषीचे प्रकार, मासेमारी, वने, प्रमुख पिके-नगदी व अन्नधान्य-त्यांचे वितरण, मृदा समस्या, कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, महत्त्वाची शहरे-त्यांची टोपण नावे, धबधबे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, वस्त्या (मानवी भूगोल), लोकसंख्या वितरण, साक्षरता, आदिवासी जमाती या उपघटकांवर विशेष भर दिलेला आहे. यातील हवामान, मान्सून, मृदा समस्या यांचा संकल्पनात्मक अभ्यास आणि इतर मुद्दय़ांचा टेबलमध्ये नोट्स काढत अद्ययावत अभ्यास आवश्यक आहे. या घटकाच्या तयारीसाठी सर्वाधिक अधिकृत स्रोत आहे, इंडिया इयर बुकमधील संबंधित प्रकरणे.

महाराष्ट्राचा भूगोल

सन २०१३ मध्ये परीक्षेचे स्वरूप बदलल्यापासून या घटकावरील प्रश्नांची संख्या कमी झालेली आहे. तरीही काही अपेक्षित मुद्दय़ांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मृदा, हवामान, पर्वतरांगा, नद्या, खाडय़ा, बंदरे, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांच्या काठावर वसलेली शहरे, खनिज संपत्ती, पिके, शेती, उद्योग, वाहतूक, संदेशवहन व पर्यटन आणि लोकसंख्या वितरण.

चालू घडामोडी आणि भूगोल

या विषयावर गेल्या चार ते पाच वर्षांत विचारलेले प्रश्न पाहिल्यास प्राकृतिक भूगोल, जगाचा / भारताचा / महाराष्ट्राचा भूगोल या घटकांचा अभ्यास करताना विचारले जाणारे बहुतांश प्रश्न चालू घडामोडींशी निगडित असल्याचे जाणवते. त्याचबरोबर महत्त्वाच्या परिषदा, संमेलने, नसíगक आपत्ती, चच्रेतील मोठे उद्योग वा इतर प्रकल्प यांच्यावरील प्रश्नामध्ये त्या त्या मुद्दय़ाच्या भौगोलिक पलूचाही समावेश असू शकतो. या दृष्टीने नोट्स काढणे जास्त फायद्याचे ठरते.