सुप्रसिद्ध व्यावसायिक सुब्रोतो बागची यांच्या ‘द प्रोफेशनल’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. या पुस्तकात व्यावसायिक कोणाला म्हणावं, व्यावसायिक होण्यासाठी काय करावं लागतं, आदर्श व्यावसायिकाचे गुणधर्म आणि व्यावसायिकांपुढील आव्हानं अशा विविध विषयांवर त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित भाष्य त्यांनी केले आहे. अनेक पर्यायांतून निवड करून मी घेतलेला निर्णय योग्य आहे का, हा प्रश्न जो प्रत्येक व्यावसायिकाला भेडसावत असतो, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कंपन्यांमधील महाघोटाळे, आर्थिक मंदी, हजारो लोकांवर कोसळणारी बेकारीची कुऱ्हाड, अनीतीचे थैमान यात हे पुस्तक नीतिमूल्य, प्रामाणिकपणा यांचं आत्यंतिक महत्त्व विशद करून सांगतं. स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी आवश्यक असलेलं सामथ्र्य वाढविण्यास ‘मैत्री व्यावसायिकतेशी’ हे पुस्तक निश्चितच मदत करेल. या पुस्तकात प्रामाणिकपणा, आत्मभान, व्यावसायिक लक्षणं, काम आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, गुंतागुंतीचे व्यवस्थापन, नूतन जगाचे आदर्श, व्यावसायिकता व्यावसायिकांची यांवर स्वतंत्र प्रकरणे बेतली आहेत.
मैत्री व्यावसायिकतेशी – सुब्रोतो बागची, अनुवाद- उल्का राऊत, रोहन प्रकाशन, पृष्ठे- २०८, मूल्य- २०० रु.

शिक्षणाचा सर्वागीण विचार
या पुस्तकात बालशिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, शालेय नीतीशिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, प्रशिक्षण या शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर तसेच निरंतर विद्यार्थी, ग्रामीण शिक्षण, पालक शिक्षण, स्त्री शिक्षण, जीवन शिक्षण, साक्षरता प्रसार अशा शिक्षणविषयक विविध विषयांवर विचार मांडण्यात आले आहेत. सर्व घटकांच्या समन्वयातून शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल, याकडेही या पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यासोबतच हे शिक्षण हसतखेळत कसे होईल, याचाही सविस्तर विचार करण्यात आला आहे.
विविधांगी शिक्षण – प्रा. शंकरराव पेंढारकर, प्रियांजली प्रकाशन, पृष्ठे – ११८, मूल्य -१२० रु.

भारतीय उद्योजकांचा प्रेरणादायी प्रवास
इतरांच्या उत्पादनांची नक्कल करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडत भारतीय उद्योजक स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादनं बाजारपेठेत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासोबत जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, अशी कामगिरी भारतीय उद्योजक बजावताना दिसत आहेत. अशक्य कोटीतील वाटाव्यात, अशा गोष्टी शक्य करून दाखवणाऱ्या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास ‘नावीन्यपूर्ण बदल घडवताना..’ या अनुवादित पुस्तकात उलगडून दाखवण्यात आला आहे. इरेव्हन इनोव्हेशन कन्सल्टिंग आणि मेरिको इनोव्हेशन फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे सतत सहा वर्षे केलेल्या संशोधनातून हे पुस्तक साकारले आहे. आपल्या देशात नावीन्यप्रू्ण (इनोव्हेटिव्ह) काम करणाऱ्यांचा शोध घेणं आणि या संशोधकांनी वेगळं काम करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य करून दाखवल्या, हे मांडण्यासाठी या पुस्तकाचा प्रपंच त्यांनी मांडला आहे. या पुस्तकात निवडलेल्या देशातील ११ उपक्रमांनी उद्योगजगतातील आणि विचार क्षेत्रातील संदर्भ पूर्णपणे बदलून टाकले आहेत. त्यात परंपरागत मानसिकतेत बदल, बडय़ा कंपन्यांना झेलण्याचे नावीन्य, अपूर्ण बाजारपेठेसाठी नावीन्य, आजारी संस्थांचा कायापालट यांसारख्या गोष्टींचा समावेश करता येईल.
कॉर्पोरेट क्षेत्रातील दैनिक भास्कर, आयटीसी- आयबीडी, शांता बायोटेक, टायटन, बॉश, चोला व्हेइकल फायनान्स, सु-काम आणि कॅव्हिनकेअर या कंपन्यांची तर सामाजिक सेवा क्षेत्रात कायापालट झालेले सुरत शहर आणि त्रिची पोलीस दलात झालेलं स्थित्यंतर आणि अरविंद आय हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्यांना आपल्या कामात नावीन्यपूर्ण बदल घडवायचा आहे, त्यांना हे पुस्तक वाचून कृतिशील बनण्याची प्रेरणा निश्चितच मिळू शकेल. हे पुस्तक संस्थात्मक पातळीवर अधिक उपयुक्त ठरेल.
नावीन्यपूर्ण बदल घडवताना.. – पोरस मुन्शी, अनुवाद- जॉन कोलासो, रोहन प्रकाशन, पृष्ठे- २७२, किंमत- २३० रु.

धडाडीचे उद्योजक व्हायचंय?
उद्योजकतेच्या विकासासाठी नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व अत्यावश्यक ठरतं. एखादा उद्योग कार्यकुशलतेनं आणि धडाडीनं करण्यासाठी प्रेरणा जाग्या व्हाव्या लागतात. ‘तुम्हीही व्हा.. धडाडीचे उद्योजक’ या अनुवादित पुस्तकातून नेमकी हीच गोष्ट साध्य होते. तुमच्या प्रेरणांना दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात निश्चितच करण्यात आला आहे. सुब्रोतो बागची यांच्या ‘हाय परफॉरमन्स’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्ये कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व या साऱ्या गोष्टींचा अंतर्भाव पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व, योग्य संधींची जाण, सहकाऱ्यांची निवड, उद्दिष्ट आणि मूल्य, उद्योगाचा नियोजन आखाडा, योग्य गुंतवणूकदाराची निवड, चांगली माणसं मिळवणं आणि टिकवणं, प्रक्रियाबद्ध संस्थेची उभारणी, ग्राहकांची यादी हीच कंपनीची ओळख, वित्त व्यवस्थापन, ब्रँड उभा करताना.., संस्थेचा उदय आणि बदलासाठी इच्छाशक्ती, आपत्ती व्यवस्थापन, कल्पना सुचण्यापासून आयपीओपर्यंत, सुरुवातीलाच अपयशी ठरण्याची कारणं, उद्योजकतेविषयी भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योगाकडून घ्यावयाचे धडे अशा विविध स्वतंत्र प्रकरणांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक – सुब्रोतो बागची, अनुवाद- चित्रा वाळिंबे, रोहन प्रकाशन, पृष्ठे- २३८, मूल्य- २०० रु.