‘कन्सेप्ट्स अनलिमिटेड’ ही संस्था विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांवर काम करत असून संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभ्यासक्रम आखलेला आहे. त्याबद्दल-
 शालेय स्तरावर शिकवला जाणारा ‘विज्ञान’ हा विषय तसा खरा सर्व इतर विषयांशी संबंधित आणि रोजच्या आयुष्याशीही! वरच्या इयत्तांमध्ये आणि शालेय शिक्षणानंतर शिकल्या जाणाऱ्या सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स यापैकी कुठल्याही शाखेतील विषय शिकताना, विज्ञानातल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तर यश मिळवण्यासाठी मोठीच मदत होते.
तसं बघायला गेलं तर सध्या माहितीच्या महाजालामुळे म्हणजेच इंटरनेटमुळे प्रचंड माहिती सहजी उपलब्ध होते आहे. फक्त त्यातली आपल्या उपयोगाची नेमकी माहिती शोधणं, हे जरा गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ काम आहे. आजचे शिक्षक म्हणा किंवा पालक म्हणा.. इच्छा असूनही वेळेअभावी या माहितीच्या खजिन्याचा हवा तसा नेमका उपयोग आपल्या मुलांसाठी करू शकत नाही आहेत. तेव्हा योग्य वेळी, योग्य माहिती विद्यार्थ्यांच्या हातात पडेल, जेणेकरून त्यांच्या विज्ञान संकल्पना तर स्पष्ट होतीलच, पण त्याचबरोबर आजच्या जगातल्या अनेक स्पर्धाना आणि स्पर्धा-परीक्षांना सामोरं जाण्यासाठी त्यांची तयारीही होईल अशा एखाद्या उपक्रमाची गरज आहे.
त्यातच आजकालच्या विद्यार्थ्यांनाही वेळेची कमतरता जाणवते आहे. नेहमी शाळा चालू असते तेव्हाचा काही वेळ आणि विशेषत: सुट्टीतला काही वेळ हा विद्यार्थ्यांनी थोडेतरी अर्थपूर्ण वाचन करण्यात किंवा काही माहिती मिळवण्यात घालवावा, कधी त्यांनी पुढच्या वर्गातल्या अभ्यासाची तयारी करावी, अशी पालकांची इच्छा असते. त्यासाठी नेमकी कोणती गोष्ट मुलांच्या हातात द्यावी, असा प्रश्न पालकांना पडलेला असतो. या सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न मुंबईतील ‘कन्सेप्ट्स अनलिमिटेड’ या शालेय शिक्षणावर विशेषत:  ‘विज्ञान शिक्षणा’वर काम करणाऱ्या एका संस्थेने केला आहे.
‘कन्सेप्ट्स अनलिमिटेड’ ही डॉ. मानसी राजाध्यक्ष संचालित संस्था विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांवर काम करत असून संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभ्यासक्रम आखलेला आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील विविध शहरं आणि गावांमधून साधारणपणे ९०च्या आसपास विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. त्यात कोकणातली काही गावं किंवा आंबेजोगाईसारख्या एखाद्या लहान गावातल्या विद्यार्थ्यांपासून ते मुंबईतल्या अगदी संस्थेच्या कार्यालयाच्या बाजूच्या गल्लीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांचा सहभाग होता. कारण हा कार्यक्रम संगणकाच्या आणि इंटरनेटच्या साहाय्याने थेट विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आला. वर्षभर घरबसल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘रोज’च्या कामाची दखल संगणकाच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या मदतीने घेतली गेली. ३१ जुलै २०१३ला मागील वर्षीचा अभ्यासक्रम संपला असून, १ सप्टेंबर २०१३ला नवीन वर्षांचा अभ्यासक्रम चालू होईल.
या उपक्रमांतर्गत फक्त ‘विज्ञान’ संकल्पनांचा अभ्यासक्रम असून यंदाच्या वर्षी म्हणजे येत्या १ सप्टेंबर २०१३पासून तो इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. उपक्रमात हाताळला जाणारा अभ्यासक्रम ‘ग्लोबल’ अभ्यासक्रम असून, त्यात प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी जगभरातील भारत सोडून इतर ८ बोर्ड्सच्या आणि भारतात अमलात आणल्या जाणाऱ्या काही बोर्ड्समध्ये समाविष्ट असलेल्या ७५ हून अधिक ‘विज्ञान संकल्पनां’चा समावेश आहे. अभ्यासक्रमासाठी भारतातल्या विविध राज्यांत वापरल्या जाणाऱ्या सीबीएसई, आयसीएसई, एसएससी, आयबी यांसारख्या बोर्ड्सद्वारा अमलात आणल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचाही सविस्तर विचार केला गेला आहे. १ सप्टेंबर २०१३ ते १ जून २०१४ या नऊ महिन्यांतील दर सोमवारी ‘ग्लोबल’ अभ्यासक्रमातल्या दोन संकल्पनांची माहिती वेबसाइटवर दिली जाणार आहे. प्रत्येक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कधी आकृत्या, कधी छोटय़ा फिल्म्स तर कधी एखाद्या प्रयोगाची माहिती यांचा वापर केला जाईल. शिवाय त्या संकल्पनेला अनुसरून काही उदाहरणं आणि काही जास्तीची माहितीही दिली जाईल. ही माहिती विद्यार्थ्यांला त्याच्या संगणकामध्ये कायम स्वरूपात साठवून ठेवता येईल आणि पुन्हा कधीही गरज वाटल्यास पाहता येईल. वेबसाइटवर दिली गेलेली माहिती, तिथे एका महिन्यापर्यंत उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांने एका आठवडय़ात, अर्धा ते एक तास एवढाच वेळ दिला तरी ही माहिती विद्यार्थी सहज आत्मसात करेल. एकदा कुठलीही संकल्पना चांगली ‘समजली’ की ती पाठ करावी लागणार नाही आणि ती व्यवहारात किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठीसुद्धा वापरता येईल. तसंच ही माहिती कोणत्याही शालेय अभ्यासक्रमाला पूरक अशीच असेल.
या अभ्यासक्रमाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण माहिती जरी इंग्रजी माध्यमातून असली तरी दर आठवडय़ाला ज्या संकल्पना वेबसाइटवर दिल्या जातील त्याबरोबर त्या संकल्पनांच्या इंग्रजी आणि मराठी शब्दार्थाची यादीही दिली जाईल. संपूर्ण अभ्यासक्रमात ज्या विज्ञान संकल्पना वेबसाइटद्वारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत त्या सर्व थोडक्या शब्दात मांडलेलं एक पुस्तक आणि वेबसाइट कशी वापरावी हे सांगणारी एक पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठवली जाईल. सोपी, सुलभ शब्दरचना, मराठी शब्दार्थ आणि अनेक चित्रे आणि फिल्म्स या सर्वामुळे संकल्पना समजण्याची प्रक्रिया आनंददायी आणि आकलनीय होते, असे गेल्या वर्षी हा उपक्रम वापरलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.
विद्यार्थ्यांना संकल्पना समजल्या आहेत किंवा नाहीत ते तपासण्यासाठी काही ठरावीक कालावधीने ‘ऑनलाइन’ चाचण्या घेतल्या जातील. वर्षांअखेर एक ‘ऑनलाइन’ परीक्षा घेतली जाईल. या चाचण्या अतिशय सोप्या आणि मनोरंजक असल्यामुळे पालकांना किंवा विद्यार्थ्यांना त्यांचं ‘टेन्शन’ येणार नाही किंवा या चाचण्यांचा वेगळा असा काही अभ्यास करावा लागणार नाही. या उपक्रमाखेर म्हणजेच जून २०१४मध्ये उपक्रमाच्या पूर्ण कालावधीत झालेल्या चाचण्या, वेबसाइट किती वेळा वापरली गेली, संस्थेशी झालेला ‘ई-संवाद’ आणि उपक्रमाखेर घेतली जाणारी ऑनलाइन चाचणी यांवर आधारित, सर्वात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीही दिली जाईल.
विज्ञानात गती असलेल्या विद्यार्थ्यांची अधिक प्रगती व्हावी आणि विज्ञान फारसं आवडत नसलेल्या विद्यार्थ्यांला संकल्पना सहज समजून त्याची विज्ञानातील गोडी वाढावी, हेच या ‘विज्ञानाच्या ग्लोबल अभ्यासक्रमा’च्या उपक्रमाचं फलित असेल. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक नोंदणी करता येईलच, पण शाळांनाही या उपक्रमाचा फायदा घेता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१३ असून, अधिक माहितीसाठी cuonline.in किंवा conceptsunlimited.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा ०८६८९९४५४४४, ०९६६४२७२०११ किंवा ०९८२०८६२४९४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा concepts.olt@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.