|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख

देशाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर राज्यासाठी १९४८मध्ये जम्मू-काश्मीर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. राज्यामध्ये उच्चशिक्षणाच्या विस्तारासाठी संस्थांच्या वाढत्या गरजांचा विचार करत १९६९साली या विद्यापीठाची विभागणी करून, दोन स्वतंत्र विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी श्रीनगरमध्ये तयार झालेले विद्यापीठ आता काश्मीर विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. श्रीनगरमधील हजरतबल भागामध्ये जवळपास अडीचशे एकरांच्या परिसरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल कार्यरत आहे. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जगप्रसिद्ध अशा दाल सरोवराच्या परिसरामधील हे संकुल विद्यार्थी आणि संशोधकांसाठी एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र ठरते. विद्यापीठाचे मुख्य केंद्र असलेले हजरतबल येथील शैक्षणिक संकुल तीन भागांमध्ये विभागलेले आहे. हजरतबल संकुल, नसीमबाग संकुल आणि मिर्झाबाग संकुल या तीन भागांमधून विद्यापीठाचे बहुतांश शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. त्याशिवाय विद्यापीठाने अनंतनाग, बारामुल्ला, कुपवाडा, कारगिल आणि लेह या ठिकाणी आपले सॅटेलाइट कॅम्पस सुरू केले आहेत. त्या आधारे या भागांमधील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाकडे वळविण्यासाठी आणि त्यांना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधा विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. अनंतनागमध्ये वर्ष २००८पासून, तर बारामुल्ला येथे २००९पासून विद्यापीठाच्या शैक्षणिक केंद्राच्या कामाची औपचारिक सुरुवात झाली. या माध्यमातून विद्यापीठाने स्थानिक गरजांचा विचार करत उपयुक्त ठरू शकतील अशा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांवर भर दिला आहे. श्रीनगरमधील झाकुरा येथील संकुलामध्ये विद्यापीठाने इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीची सुरुवात केली आहे. ‘एनआयआरएफ’च्या २०१८ सालच्या मानांकनामध्ये हे विद्यापीठ देशामध्ये ४७व्या स्थानी आहे.

सुविधा

विद्यापीठांतर्गत एकूण १३ वेगवेगळी संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये सेंटर ऑफ सेंट्रल एशियन स्टडिज, सेंटर ऑफ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन रिसर्च सेंटर इक्बाल इन्स्टिटय़ूट ऑफ कल्चर अँड फिलॉसॉफी आदी केंद्रांचा समावेश होतो. विद्यापीठाने विद्यार्थी-विद्याíथनींसाठी उभारलेल्या एकूण ७ वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठीच्या निवासी सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला आहे. विद्यापीठामधील अल्लामा इक्बाल लायब्ररी हे विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. जम्मू आणि काश्मीर विद्यापीठाच्या निर्मितीपासूनच, १९४८पासूनच विद्यापीठासाठीचे स्वतंत्र ग्रंथालय अस्तित्वात आले होते. काश्मीर विद्यापीठाच्या निर्मितीनंतर १९६९ पासून या ग्रंथालयाचे कामकाज दोन स्वतंत्र ग्रंथालयांमधून विभागण्यात आले. जुल २००२ पासून काश्मीर विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय हे अल्लामा इक्बाल लायब्ररी या नावाने ओळखले जाते. या मुख्य मध्यवर्ती ग्रंथालयांतर्गत एकूण ५७ विभागीय ग्रंथालये कार्यरत आहेत. जम्मू आणि काश्मीर राज्यामधील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणूनही हे ग्रंथालय ओळखले जाते. ग्रंथालयाचे एकूण १६ विभाग आहेत. त्या आधारे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी सहा लाखांहून अधिकची ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘झूम- एक्स’ ही विशेष सुविधा या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच डिजिटल पुस्तके वाचण्यासाठीचे ‘अँजेल प्रो करिश्मा प्लेयर’ही या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर, टेक्स्ट टू स्पीच सॉफ्टवेअर अशा विविध सुविधा हे ग्रंथालय विद्यार्थ्यांना पुरविते. विद्यापीठामार्फत गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम

काश्मीर विद्यापीठामध्ये कला, उद्योग आणि व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, विधी, उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवविज्ञान, पदार्थविज्ञान, सामाजिकशास्त्रे, आरोग्यविज्ञान, अभियांत्रिकी, संगीत आणि ललित कला आदी विद्याशाखांतर्गत विविध विभाग आणि अभ्यासक्रम चालविले जातात. या विद्यापीठाने स्कूल्सच्या संकल्पनेचा अवलंब केला आहे. त्यानुसार विद्यापीठाने एकूण १४ स्कूल्समधून सर्व विभागांची विभागणी केली आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आर्ट्स, लँग्वेजेस अँड लिटरेचरमध्ये विविध भाषांशी निगडित अभ्यासक्रम चालतात. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना पíशअन, उर्दू, काश्मिरी, हिंदी या भाषांशी संबंधित पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकता येतात. काही मोजक्या परकीय भाषांमधील अभ्यासक्रमही विद्यार्थी येथे शिकू शकतात. स्कूल ऑफ बिझनेस स्टडिजमध्ये मास्टर ऑफ फायनान्स अँड कंट्रोल, मास्टर इन क्राफ्ट मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप, एम. कॉम आणि एमबीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. स्कूल ऑफ फिजिकल अँड मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये विज्ञानाच्या पारंपरिक विषयांच्या जोडीने ‘जिओग्राफी अँड रिजनल डेव्हलपमेंट’ विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम, ‘रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस’ या विषयातील पदव्युत्तर पदविका, एम. एस्सी. जिओइन्फम्रेटिक्स हे वेगळे अभ्यासक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये इस्लामिक स्टडिजमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविला जातो. स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये जीवशास्त्राच्या विविध विषयांच्या जोडीने बायोइन्फम्रेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदविका, तर क्लिनिकल बायोकेमिस्ट्री व बायोरिसोस्रेस या विषयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठाने सुरू केले आहेत. स्कूल ऑफ अप्लाइड सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीमध्ये होमसायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. त्याअंतर्गत विद्यार्थी फूड अँड न्युट्रिशन, एक्स्टेन्शन अँड कम्युनिकेशन आणि ह्य़ुमन डेव्हलपमेंट या तीन विषयांपकी कोणत्याही एका विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. बारामुल्ला संकुलामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एमसीए, बी.टेक- कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअिरग, तसेच पाच वष्रे कालावधीचा ‘इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्राम इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन’ (आयएमबीए) या अभ्यासक्रमांचे पर्याय खुले केले आहेत.

borateys@gmail.com