नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि, सिंगापूर

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार २०१९सालच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि हे जगातले बाराव्या क्रमांकाचे तर आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे. नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि या विद्यापीठाची स्थापना १९८१ साली करण्यात आली. तत्कालीन संस्थेचे नाव नानयांग टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटय़ूट असे होते. १९९१ साली हे नाव बदलून नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि असे करण्यात आले. नानयांग टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटि एनटीयू या नावाने सर्वत्र ओळखले जाते. एनटीयू हे विद्यापीठ सिंगापूरमधील दुसरे स्वायत्त संशोधन विद्यापीठ आहे. जागतिक स्तरावर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अद्ययावत संशोधन करणाऱ्या प्रमुख विद्यापीठांपैकी एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. विद्यापीठात विज्ञान, वैद्यकीय, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय इत्यादी सर्वच विद्याशाखांमधील प्रमुख विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचे अध्ययन-अध्यापन-संशोधन केले जाते.

सिंगापूरच्या ज्युरोंग वेस्ट या निवासी परिसराजवळ एनटीयू विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस-युनान गार्डन कॅम्पस एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रफळामध्ये साकारला गेलेला आहे. तसेच शहरात नोव्हेना आणि वन नॉर्थ या ठिकाणी विद्यापीठाचे इतर दोन कॅम्पस आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे सर्व प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग व महाविद्यालये आहेत. एनटीयूमध्ये सध्या जवळपास दोन हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर तेहतीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम एकूण आठ शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून चालवले जातात.

अभ्यासक्रम

एनटीयू विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी व्यवसाय-व्यवस्थापन, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. एनटीयूच्या तीन कॅम्पसमध्ये एकूण आठ स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत. विद्यापीठातील नानयांग बिझनेस स्कूल, कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीज, आर्ट्स अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, कॉलेज ऑफ प्रोफेशनल अ‍ॅण्ड कंटीन्युइंग एज्युकेशन, ली काँग चियान स्कूल ऑफ मेडिसिन, कॉलेज ऑफ सायन्सेस, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन आणि राजारत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

एनटीयू विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यापीठाकडे एकूण चोवीस हॉल्स ऑफ रेसिडेन्सेस आहेत. त्या माध्यमातून एकूण चौदा हजारांहूनही अधिक विद्यार्थ्यांसाठी निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. प्रत्येक हॉलसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा या पंचतारांकित दर्जाच्या आहेत. तसेच, शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व इतर वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़

सिंगापूरमधील अनेक ख्यातनाम राजकारणी व उद्योजक हे एनटीयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तंत्रज्ञ व प्राध्यापक तयार केलेले आहेत. एनटीयूमध्ये अध्यापन करणारे अनेक प्राध्यापक हे त्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विद्यापीठाचे नानयांग बिझनेस स्कूल हे आशियातील एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य बी-स्कूल म्हणून नावारूपास येत आहे. विद्यापीठाच्या परिसरातच अर्थ ऑब्झव्‍‌र्हेटरी स्थित आहे.

संकेतस्थळ  https://www.ntu.edu.sg/