विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, सगळ्या गदारोळानंतर काही बदल करून अखेरीस यूपीएससी पूर्वपरीक्षा काल पार पडली. स्वाभाविकत: आता येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेचे नियोजन व त्याच्या अंमलबजावणीस तातडीने सुरुवात करणे अत्यावश्यक ठरते. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिली त्यांनी आपले मूल्यमापन जरूर करावे, मात्र त्यानंतर आपण पूर्वपरीक्षेत पात्र होणारच या दृष्टीने पुढची तयारी करणे महत्त्वाचे आहे. कारण एकतर २०१३ पासून बदललेल्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा व्याप वाढला आहे. दुसरे म्हणजे डिसेंबर महिन्यात मुख्य परीक्षा होणार असल्याने तयारीसाठी उपलब्ध कालावधी अपुरा वाटू शकतो. तिसरे, यूपीएससीने वयोमर्यादा आणि प्रयत्नांची संख्या वाढवल्याने स्पध्रेत तीव्र स्वरूपाची वाढ होणे अपेक्षित आहे. परिणामी, थेट अभ्यासाला सुरुवात करणे केव्हाही श्रेयस्कर.
अभ्यासाचे योग्य व परिणामकारक नियोजन हा अर्थातच आता कळीचा मुद्दा ठरणार यात शंका नाही. त्यासाठी पुढील प्रक्रिया हाती घेऊन नियोजनाची आखणी करावी. सर्वप्रथम मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पुन्हा एकदा बारकाईने पाहून त्यातील कोणता विषय, प्रकरण व घटकाला केव्हा सुरुवात करायची आणि त्यासाठी किती वेळ राखीव ठेवायचा हे ठरवावे. त्यातही निबंध, सामान्य अध्ययनाचे चार विषय आणि वैकल्पिक विषय अशी विभागणी करून वेळ निर्धारित करावा. हा अभ्यास एका बाजूला सामान्य अध्ययन आणि त्यासह वैकल्पिक विषय असा समांतरपणे करावा लागणार, यात दुमत नाही.
त्यानंतर प्रत्येक विषय व अभ्यास घटकासाठी वाचावयाच्या सर्व संदर्भसाहित्याचे संकलन करून जुने व नेहमीचे साहित्य आणि चालू घडामोडींसाठीचे साहित्य असे वर्गीकरण करावे. प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मागील वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि विशेषत: २०१३ च्या प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म अवलोकन करावे. अभ्यासक्रम, त्यावरील मागील वर्षांचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न असा विचार करून त्या त्या विषयातील अभ्यास घटकांची तयारी करावी. प्रत्येक प्रकरणातील संकल्पना, विचार, प्रतिपादने, कळीचे मुद्दे, समस्या-आव्हाने, भवितव्य, सुधारणांची कार्यक्रम पत्रिका इ. सर्व घटकांची बारकाईने उजळणी करून मुद्देसूद, नेमक्या व थोडक्यातच नोट्स काढाव्यात. हे करताना संबंधित घटकावरील प्रश्न (मागील व संभाव्य) सतत नजरेसमोर ठेवावेत. त्यामुळेच अभ्यास समग्र, नेमका आणि परीक्षाभिमुख राहील याची
हमी देता येते.
सामान्य अध्ययन हा नव्या पद्धतीत मध्यवर्ती विषय आहे हे लक्षात घेऊन त्याला उपलब्ध वेळेतील किमान ६० टक्के वेळ राखीव ठेवणे गरजेचे आहे. सामान्य अध्ययनातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना पारंपरिक भागासह त्यासंबंधी चालू, समकालीन घडामोडींचीही तयारी करावी. सद्य:स्थितीत चच्रेत असलेला मुद्दा विविध आयामांसह अभ्यासावा. कारण परीक्षेत त्यातील कोणत्याही एखाद्या आयामावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी राज्यघटना, भूगोल-पर्यावरण, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकांतील सद्य:स्थितीत चच्रेत असलेल्या मुद्दय़ांची यादी करावी.
२०१३ पासून बदललेल्या मुख्य परीक्षेचा एकंदर विचार करता हे लक्षात येईल की, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संख्या व शब्दमर्यादा यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याशिवाय सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत विकल्पच ठेवलेला नाही. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न अनिवार्य करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेत लिहिताना वेळ अपुरा पडल्याने पेपर पूर्ण करता आला नाही, अशी समस्या भेडसावू शकते. त्याखेरीज नेमक्या शब्दांत, परंतु प्रश्नांची मागणी पूर्ण करणारे प्रभावी लेखन, निर्धारित (अपुऱ्या) वेळेत करणे आणखी कठीण बनते. या समस्येवर एकच उपाय आहे. तो म्हणजे, आतापासूनच उत्तर लेखनाचा सराव आणि सराव प्रश्नपत्रिकांचा अवलंब करणे. त्याद्वारेच लेखन नेमके, प्रभावी व गतिमान पद्धतीने करता येईल. अर्थात वाचन व उजळणीचा भार सांभाळत प्रश्नोत्तरांच्या सरावाची कसरत करावी लागणार यात शंका नाही.
उपरोक्त चच्रेत म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये नियोजित असल्यामुळे एका बाजूला सर्व अभ्यास वेळेत पूर्ण करणे आणि तो पक्का करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी उपलब्ध, साधारणत: तीन महिन्यांच्या कालावधीतील शेवटच्या २०-३० दिवसांचा कालावधी अभ्यासाच्या उजळणीसाठी आवश्यक ठरतो. त्यासंदर्भात आणखी एक बाब करता येऊ शकते ती म्हणजे दररोज अर्धा तास अशा पद्धतीने आठवडय़ातील पाच-सहा तास असा वेळ सुरुवातीपासूनच उजळणीसाठी राखीव ठेवता येईल. असे झाल्यास उजळणीसाठी निर्धारित केलेला २०-३० दिवसांचा कालावधी आणखी प्रभावीपणे वापरता येईल.
२०१४ च्या जाहिरातीत यूपीएससीने निबंधाच्या स्वतंत्र (२५० गुण) विषयासंदर्भात एक बदल केलेला आहे, हे लक्षात ठेवावे. गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना निबंधाच्या पेपरमध्ये २५० गुणांसाठी दिलेल्या विषयांपकी ‘एकाच’ विषयावर निबंध लिहावा लागे. आता मात्र आयोगाने अनेक निबंध (मल्टिपल एसेज) असा उल्लेख केल्यामुळे त्या दृष्टीने अनेक विषयांची तयारी, कमी शब्द मर्यादा आणि पूर्वीइतक्याच वेळेत सांगितलेल्या विषयावर निबंध लिहायचा सराव करावा लागेल.
थोडक्यात, उपलब्ध वेळेचा प्रभावी वापर आणि अभ्यास प्रक्रियेतील सर्व घटकांची खबरदारी या बाबी निर्णायक ठरतील. तेव्हा विद्यार्थी मित्रहो,
तात्काळ अभ्यासाला सुरुवात करा!                                         
admin@theuniqueacademy.com