News Flash

भारतीय वारसा आणि संस्कृती

इ. स.पूर्व ६ व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो.

यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती यामधील भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला या घटकांविषयी आढावा घेणार आहोत. या घटकावर सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी प्रश्न विचारले जातात. भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागैतिहासिक कालखंडापासून सुरू होते. या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात.

इ. स.पूर्व ६ व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्यापासून या कलांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायला सुरुवात झालेली होती. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. प्राचीन भारतात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या प्रभावातून स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली होती. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो, कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता. प्राचीन काळापासूनच बौद्ध धर्मासह जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिर शैलीचे नागर आणि द्रविड असे दोन प्रकार असून ते प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतात आणि द्रविड शैली दक्षिण भारतात आढळते. या दोन शैलींमधील काही वैशिष्ट्ये घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते. साधारणत: गुप्त कालखंडापासून हिंदू धर्माशी संबंधित मंदिर शैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते आणि त्यापुढील काळामध्ये यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते. गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड. यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्तांच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये इत्यादींच्या काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्ट्ये याचे तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्त्वाचे ठरते. मध्ययुगीन कालखंडात भारतात इन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. ती दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य या कालखंडात विकसित झाली. याचबरोबर विजयनगर साम्राज्य, १३ व्या आणि १४ व्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, १८ व्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्पकला याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात, या मुद्द्याची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व त्याची वैशिष्ट्ये यांसारख्या बाबींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी एक तरी प्रश्न या घटकावर विचारला जातो.

उपरोक्त विचारण्यात आलेले प्रश्न हे विशिष्ट कालखंडातील कलांचा आधार घेऊन विचारण्यात आले आहेत. म्हणून कालखंडनिहाय या कलांचा विकास, वैशिष्ट्ये याची माहिती असणे गरजेचे आहे. प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात, त्यामुळे या घटकाची तयारी सर्वांगीण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्द्याशी संबंधित प्रश्न सद्य:स्थिती लक्षात घेऊन विचारले जातात. उदा. सरकारने स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या योजना, कायदे आणि यांची उपयुक्तता इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११ वीचे An Introduction to Indian Art Part – I  हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच याच्या जोडीला १२ वीचे Themes in Indian History part – I  आणि II   व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृतीसंबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर या विषयावर बाजारामध्ये अनेक गाईडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत ज्याद्वारे या मुद्द्याचा अधिक सखोल आणि सर्वांगीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.

या विषयावर २०१३ ते २०२० मध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न.

मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते. चर्चा करा.

सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान (input) दिलेले आहे. चर्चा करा.

गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमनांचीही ऋणी लागते. स्पष्ट करा.

सुरुवातीची बौद्ध स्तूपकला, लोकांची तत्त्वे आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. स्पष्टीकरण द्या.

भारतीय कलेचा वारसा याचे संरक्षण ही सद्य:स्थितीमधील गरज आहे. टिपण्णी करा.

गांधार कलेमध्ये मध्य आशियाई (Central Asian) आणि ग्रीको-बॅक्टेरियन (reco—Bactrian) घटकावर प्रकाश टाका.

शैल स्थापत्य (Rock cut architecture) हे ‘भारतीय कला आणि इतिहासा’च्या ज्ञानाच्या  सुरुवातीच्या अति महत्त्वपूर्ण स्रोतांमधील एकाचे प्रतिनिधित्व करते. चर्चा करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:04 am

Web Title: upsc exam study akp 94 25
Next Stories
1 दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा नागरिकशास्त्राची तयारी
2 यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास
3 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – भूगोलाची तयारी
Just Now!
X