अझिम प्रेमजी विद्यापीठातर्फे शिक्षण व विकास विषयांतर्गत एम.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१३-२०१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमांची पाश्र्वभूमी : या अभ्यासक्रमांमध्ये मुख्यत: पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे-
एम.ए. एज्युकेशन : या अभ्यासक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व व्यवस्थापन या विषयांवर भर देण्यात येणार आहे.
एम.ए. इन डेव्हलपमेन्ट : या अभ्यासक्रमामध्ये विकासविषयक धोरण, विकास प्रकल्पांची अंमलबजावणी व त्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व, जीवनस्तरमान व त्याचा विकास, पोषणपद्धती, विकासविषयक कायदे व त्यांची अंमलबजावणी या विषयांवर भर देण्यात येणार आहे.
या दोन्ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
शैक्षणिक अर्हता व अनुभव : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. संबंधित क्षेत्रातील अनुभवी अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवड ३६ परीक्षा केंद्रांवर २४ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याद्वारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
भविष्यकालीन संधी : अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा त्यांनी संबंधित अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर अझिम प्रेमजी फाऊण्डेशनच्या शैक्षणिक व विकासविषयक प्रकल्पांमधील रोजगारसंधींसाठी प्राधान्यतत्त्वावर विचार करण्यात येईल.
अझिम प्रेमजी फाऊण्डेशनला त्यांच्या शैक्षणिक व ग्रामीण आणि सामाजिक प्रकल्पविषयक कामासाठी आगामी पाच वर्षांत सुमारे तीन हजार प्रशिक्षित उमेदवारांची गरज निश्चितपणे भासणार आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती योजना : निवड झालेल्या उमेदवारांपैकी निवडक व गरजू उमेदवारांना त्यांची पात्रता व गरजेनुसार शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती प्रेमजी फाऊण्डेशनतर्फे देण्यात येईल.
अधिक महिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अझिम प्रेमजी फाऊण्डेशनच्या १८००२६६२००१ या विनाशुल्क दूरध्वनीवर संपर्क साधावा अथवा फाऊण्डेशनच्या www.azimprejiuniversity.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी, पिक्सेल पार्क, ‘बी’ ब्लॉक, पीईएस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉनिक सिटी, होसूर रोड, बंगळुरू-५६०१०० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१३.
ज्या पदवीधरांना शिक्षण व विकासविषयक विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमासह आपले करिअर साधायचे असेल अशांसाठी हे अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतात.    ल्ल