अवघ्या ३० व्या वर्षी संदेश सुधीर भट दोन हॉटेल्स आणि एका आइस्क्रीम पार्लरचा मालक आहे. त्याशिवाय वडिलांच्या पश्चात सुयोगनाटय़संस्थेची धुराही तो सांभाळतोय. ही कसरत साधण्याची कला त्याला आईच्या भक्कम पाठिंब्यामुळेच साधली आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा पुढे जातो, असे सर्वसाधारण चित्र असते. काहीजण नक्कीच याला अपवाद असतात. पण काहींचे असेही होते की, त्यांना वेगळा व्यवसाय सुरू केल्यानंतरही काही कारणाने पुन्हा पारंपरिक व्यवसायाकडे वळावे लागते. आजच्या करिअर कथेचा मानकरी असलेल्या संदेश सुधीर भट याच्या बाबतीत नेमके असेच घडले.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत

वडील सुधीर भट आणि त्यांच्या ‘सुयोग’ संस्थेचा नाटय़ व्यवसायात मोठा दबदबा. वडील हयात असेपर्यंत संदेशने ‘सुयोग’कडे विशेष लक्ष दिले नाही. दिले नाही म्हणण्यापेक्षा सुधीर भट यांनीच त्याला या क्षेत्रापासून दूर ठेवले.  एकूणच नाटय़ व्यवसाय हा बेभरवशाचा. यात यश आणि अपयशाचा खेळ कायमचाच. त्यामुळे मुलाने या क्षेत्रात वळू नये, असे सुधीर भटांना वाटत होते. संदेशला आवडत असलेल्या हॉटेल व्यवसायात त्याने करिअर करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते असतानाच संदेशने पुण्यात छोटय़ा प्रमाणात हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली. आज पुण्यात संदेशच्या मालकीची दोन मोठी हॉटेल्स आणि एक आइस्क्रीम पार्लर आहेत. हॉटेल व्यवसायात भरारी घेत असतानाच सुधीर भट यांच्या आकस्मिक निधनाचा धक्का भट कुटुंबीयांना बसला. ‘सुयोग’मध्ये भागीदारीवरूनही वाद झाले. मात्र काही काळानंतर सुधीर भट यांच्या पत्नी कांचन आणि संदेशने त्यावर मात केली आणि या मायलेकांनी ‘सुयोग’ संस्था पुन्हा नव्या जोमाने सुरू केली.

‘सुयोग’ने आत्तापर्यंत ८७ नाटके रंगभूमीवर सादर केली असून संदेशने ‘सुयोग’ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आईच्या मदतीने आत्तापर्यंत पाच नाटके रंगभूमीवर आणली आहेत. २०१६ मध्ये ‘प्लेझंट सरप्राइज’ हे त्याने सादर केलेले पहिले नाटक. त्यानंतर ‘तीन पायांची शर्यत’, ‘अशी ही श्यामची आई’, ‘अन्यया’, ‘उलटसुलट’ ही नाटके सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. ‘अनन्या’ नाटकाला ‘लोकसत्ता’ संपादक शिफारसही आणि प्रेक्षकमान्यताही मिळाली आहे.

त्याचा नाटकाकडे विशेष ओढा नव्हता.  मात्र तो सहावीत असताना ‘सुयोग’च्या एका नाटकाला अमाप लोकप्रियता मिळाली आणि त्याला समजू लागले की आपले बाबा इतर मुलांच्या पालकांपेक्षा वेगळे आहेत. नाटय़व्यवसायात असल्याने त्यांच्या घरी कलाकारांचे येणेजाणे असायचे. आई कांचन त्यांना सुग्रास अन्नाचा पाहुणचारही करत असे. संदेशलाही स्वत:ला पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे आवडायचे. अगदी चौथीत असतानाच त्याने ओव्हनमध्ये चहा केला होता. पुढे याच आवडीमुळे त्याने  बारावीनंतर ‘बॅचलर इन हॉटेल-टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज्’ ही पदवी मिळवली. नोकरी न करता संदेशने थेट व्यवसाय करावा, असा सुधीर भटांचा आग्रह होता. योगायोगाने पुण्यात समीर हंपी आणि दीपक यांच्या साहाय्याने त्यांना एका छोटय़ा हॉटेलची जागा मिळाली. सुरुवातीला संदेशने पुण्यात लॉजवर राहून त्या हॉटेलमध्ये अगदी पडेल ते काम केले. अगदी वेटर म्हणूनही तो राबला. या अनुभवाने त्याला खूप काही दिले. याच छोटय़ा हॉटेलच्या जागी आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यावर संदेशचे ‘फिश करी राइस’ हॉटेल सुरू झाले. सुरुवातीचे काही महिने तसे अडचणीचे होते पण हळूहळू जम बसत होता. त्याच दरम्यान ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी एका वृत्तपत्रात संदेशच्या हॉटेलवर लेख लिहिला. कारण त्यांना तिथली चव फार आवडली होती. या लेखामुळे हॉटेलला अमाप प्रसिद्धी मिळाली. संदेशच्या हॉटेलला गेली काही वर्षे उत्कृष्ट हॉटेल म्हणून गौरविले जात आहे. २०१३ मध्ये सुधीर भट यांचे निधन झाले. त्यानंतर काही महिने संस्थेतील भागीदारीचा वाद, तंटा यात गेले. सुधीर भट यांच्या पत्नी कांचन आणि संदेश यांनी त्या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. नेपथ्यकार अशोक मुळ्ये, दिग्दर्शक विजय केंकरे, भट यांचे मित्र, हितचिंतक ‘सुयोग’च्या पाठीशी उभे राहिले आणि सुधीर भट यांच्या पश्चात ‘सुयोग’ची धुरा संदेशने हाती घेतली. खरे तर नाटक व्यवसायाकडे वळू नकोस असा सल्ला सुधीर भट यांनीच संदेशला दिला होता. पण नियतीचा संकेत काही वेगळाच होता. या व्यवसायाचा कसलाच अनुभव त्याला नव्हता. पण संदेशने व्यवसायातील सर्व बारकावे, खाचाखोचा शिकून घेतल्या. पडेल ते काम शिकून घेत, चुकतमाकत व्यवसायाची माहिती करून घेतली. आता तो येथेही स्थिरावला आहे. नाटक आणि हॉटेल या एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न व्यवसायांची तारेवरची कसरत तो आता साधतो आहे. अर्थात यामध्ये आपल्या आईचा महत्त्वाचा वाटा असल्याचे तो नम्रपणे सांगतो.

नव्याने व्यावसायिक होऊ पाहणाऱ्या मित्रांना संदेश एक मित्रत्वाचा सल्ला देतो, तो म्हणतो, कोणताही उद्योग असला तरी माणसे टिकवणे महत्त्वाचे. त्याशिवाय व्यवसाय शून्य असतो. त्यामुळे व्यवसायात सदैव माणसे आणि माणुसकीच्या नात्याची जपणूक करा.

संदेश सुधीर भट

shekhar.joshi@expressindia.com