*  सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात आहे. मला इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करिअर करायचे आहे. मी काय करू?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– रोहित मोहन गोळे

रोहित, इलेक्ट्रॉनिक्स विषय आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये तुझा काही गोंधळ झाला नसेल अशी खात्री आहे. तुला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नेमके  कशासाठी जायचे आहे, हे आधी नक्की कर. या क्षेत्रासाठी वार्ताहर, संहिता लेखक, छायात्रिकार, ध्वनिमुद्रण, संपादक, सादरकर्ता, उपसंपादक, संशोधक, प्रसिद्धी आदी मनुष्यबळ आवश्यक असते. पत्रकारिता वा मास कम्युनिकेशन विषयातील पदवी अथवा पदविका घेऊन तू या क्षेत्रात प्रवेश करू शकतो. या क्षेत्रात चांगल्या अभियंत्यांचीही गरज भासतच असते. हा पर्यायही तुझ्यासाठी आहेच.

 *   मी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. पण मला एमपीएससीमध्ये रस आहे. अभियांत्रिकीचा अभ्यास करत असताना मी एमपीएससीची तयारी कशी करावी?

– शुभम सुर्से

शुभम, एमपीएससीच्या परीक्षेला दरवर्षी साधारणत: लाखाच्या वर विद्यार्थी बसतात. त्यापैकी केवळ १०० ते १२५ विद्यार्थी वेगवेगळ्या पदांसाठी निवडले जातात. त्यामुळे अत्यंत स्पर्धा असलेल्या या परीक्षेच्या रिंगणात उतरण्याआधी आपला बॅकअप प्लॅन तयार ठेवणे अतिशय गरजेचे आहे. नाहीतर अपयशातून निराशा येत राहते. प्रयत्नागणिक निराशेची पुटे वाढत जातात. ते मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

आपल्याकडे बॅकअप प्लॅन तयार असेल तर अपयशाचे धक्के पचवणे अवघड जात नाही. त्यामुळे तू सध्या तुझ्या अभियांत्रिकीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावेस.

प्लेसमेंटमधून एखादी नोकरी मिळवावीस आणि नंतर एमपीएससीची तयारी करावी असे वाटते. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट आदींमध्ये भरपूर वेळ द्यावा लागतो. आताच एमपीएससीची तयारी करायला घेतली तर या वेळेचे विभाजन होईल आणि दोन्ही बाबींना न्याय देता येणार नाही.

* मला एमपीएससी करायचे आहे. मी असे ऐकले आहे, की या क्षेत्रासाठी वाचनाची खूप आवश्यकता असते. पण मला तर अवांतर वाचनाची जराही आवड नाही. ती कशी निर्माण करावी?

– भाऊ  कर्तस्कर

भाऊ, एमपीएससी ही उमेदवाराच्या चौफेर ज्ञानाची व सभोवतालच्या विविधांगी परिस्थितीच्या आकलनाची, विचारक्षमतेची परीक्षा आहे. ही पाठांतराची परीक्षा नाही. तसेच विद्यापीठीय परीक्षेचा व त्यातील यशाचा या परीक्षेशी काहीही संबंध नाही. या परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी चौफेर दर्जेदार वाचन अत्यावश्यकच आहे. त्यासाठी तू चांगली वृत्तपत्रे, नियतकालिके, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांशी संबंधित मूलभूत पुस्तके किंवा ग्रंथ वाचायला सुरुवात कर. असे ग्रंथ तुझ्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये निश्चित उपलब्ध होतील. कोणत्याही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नोट्सवर विसंबून राहून यश मिळत नाही, हे ध्यानात घे.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert tips for successful career in different fields
First published on: 05-04-2017 at 01:40 IST