या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांपकी पूर्व परीक्षेतून सुमारे दहा हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतील. अर्थात पूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण उमेदवारांपकी मुख्य परीक्षेस ०.०५टक्के विद्यार्थी पात्र ठरतील. स्पर्धा कठीण आहे पण अवघड नाही. या खेळात सर्व लढाया आणि युद्ध दोन्हीही जिंकणे अनिवार्य असल्यामुळे पूर्व परीक्षेसोबतच मुख्य परीक्षेचाही विचार करणे अनिवार्य आहे. पूर्व परीक्षा देण्यापूर्वीच मुख्य परीक्षेची तयारी जर असेल तर पद मिळविण्याचे युद्ध सहज जिंकता येते. वेळेचे नियोजन आणि नियोजनपूर्ण अभ्यास हा मंत्र लक्षात ठेवा.

मुख्य परीक्षा देण्यापूर्वीची पूर्व तयारी पुढीलप्रमाणे

परीक्षा योजना व अभ्यासक्रम समजून घ्या –

  • मुख्य परीक्षा योजना –
  • पेपर संख्या – दोन,
  • पेपर क्र. एक – मराठी व इंग्रजी भाषा,
  • पेपर क्र. दोन – सामान्य अध्ययन व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान

पेपर क्र. एक मराठी व इंग्रजी भाषा, एकूण गुण – १०० प्रश्नसंख्या – १०० दर्जा – मराठी  बारावी, इंग्रजी  पदवी, परीक्षेचा कालावधी – एक तास

पेपर क्र. दोन – सामान्य अध्ययन व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान, एकूण गुण -१००,  प्रश्नसंख्या – १००, दर्जा – पदवी, परीक्षेचा कालावधी – एक तास

मुख्य परीक्षा योजना लक्षात घेता पेपर क्र. दोनमधील बराचसा अभ्यासक्रम पूर्व परीक्षेशी साधम्र्य साधतो. पूर्व व मुख्य परीक्षेतील समान घटक पुढीलप्रमाणे आहेत.

१) चालू घडामोडी २) महाराष्ट्राचा भूगोल ३) महाराष्ट्राचा इतिहास ४) भारतीय राज्यघटना ५) बुद्धिमत्ता चाचणी.

जुन्या प्रश्नपत्रिकांचे पृथक्करण करणे अनिवार्य

मुख्य परीक्षेचा घटकवार अभ्यासक्रम  https://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. त्यापकी पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सामायिक विषयावर येणारे प्रश्नप्रकार, काठिण्यपातळी आणि प्रश्नसंख्या यांचा अभ्यास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक कक्षाधिकारी आणि राज्यसेवा या परीक्षांच्या मुख्य परीक्षांचे पेपर्स यांचा आधार घ्या. अभ्यासाअंती असे लक्षात येईल की, पूर्व परीक्षेच्या अभ्यासासोबत या सामायिक घटकांचा तपशीलवार अभ्यास करणे हितावह ठरेल.

मराठी व इंग्रजी भाषा विषय

या दोन्हीचा अभ्यासक्रम एकसारखा आहे. यात व्याकरण, शब्दधन आणि उताऱ्यावरील प्रश्नांचा समावेश होतो. या घटकावर येणारे प्रश्न, काठिण्यपातळी आणि दर्जा यांचा जुन्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे अभ्यास करावा आणि पूर्व परीक्षेनंतर खऱ्याखुऱ्या अभ्यासाला सुरुवात करावी. अभ्यास साहित्य मिळविणे, अभ्यासगट तयार करणे, मार्गदर्शक शोधणे यासारख्या बाबी पूर्व तयारी म्हणून करून ठेवाव्यात.

सामान्य अध्ययन घटकातील इतर विषय

सामान्य अध्ययनातील पूर्व परीक्षेच्या सामायिक घटकाशिवाय संगणक व माहिती तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम २००५, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा या विषयांसाठीची तयारी व नियोजन पूर्व परीक्षेनंतर आणि पूर्व परीक्षा निकालाच्या अगोदर करावयास हवी.

शारीरिक चाचणी तयारी

निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी परीक्षेत प्राप्त गुणांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र माझ्या मते यास पूर्व परीक्षेपूर्वी जास्तीचा वेळ देणे आवश्यक नाही. पाच ते सहा महिने या सबंध परीक्षाविषयक तयारीच्या कालावधीचा विचार करता कितीही मेहनत घेतली तरी शारीरिक क्षमतेत विशेष फरक पडणार नाही. जर आपणास ही तयारी लगेच सुरू करावी वाटत असेल तर आपण योगासने, प्राणायाम, फिरायला जाणे, स्ट्रेचिंग व्यायामाचा सराव, हाताची आणि पायाची ताकद वाढविण्यासाठी जोर, दंड, बठका, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम प्रकार करावयास हरकत नाही.

परीक्षा अभ्यासाची नव्हे, मानसिकतेची आहे

२०११ सालानंतर ज्या स्पर्धा परीक्षांचा दर्जा पदवी आहे त्या परीक्षांत विचारले जाणारे प्रश्न हे अभ्यासापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, पृथक्करण करण्याची क्षमता, परीक्षा कक्षातील मानसिकता तपासणारी आहे. अभ्यास करतानाचा सकारात्मक दृष्टिकोन, परीक्षा कक्षातील वेळेचे नियोजन आणि प्रत्येक प्रश्नाला दिलेला समान न्याय व नकारात्मक गुणदान पद्धतीचे भान असणारे उमेदवार किमान परीक्षाभिमुख अभ्यासाच्या जोरावर यशश्री खेचून आणू शकतात यात शंका नाही. नशिबावर अवलंबून न राहता आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहिल्यास यश नक्की मिळते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi main test preparations
First published on: 06-01-2017 at 04:18 IST