करिअरमंत्र

आपल्या देशात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सांख्यिकी तज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणावर गरज आहे.

मी बारावी नापास आहे. मी शीट मेटल फॅब्रिकेशन या विषयात एक वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम केला आहे. मला अप्रेंटिसशिप करायची आहे. काय करू?

– भैरवनाथ जेटीथोर

भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने अप्रेंटिसशिपसाठी साहाय्य करण्यासाठी एका वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळू शकेल.http://apprenticeship.gov.in/Pages/Apprenticeship/EstablishmentRegistration.aspx?IsNAPS=Yes

मी बीई केले आहे. यानंतर मला एमई आणि एमटेक करायचे आहे. मात्र त्यानंतर काय करू हे काही समजत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

– अनुराग सेगेकर

इंजिनीअरिंगच्या चार वर्षांत तुम्हाला ज्या विषयात विशेष आवड किंवा रुची निर्माण झाली असेल त्या विषयात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअरिंग) या परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. आयआयटी, एनआयटी, सीओईपी, व्हीजेटीआय यांसारख्या नावाजलेल्या संस्थांमधून एमई किंवा एमटेक केल्यास पुढे करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या कॉलेजमध्ये चांगल्या कॅम्पस प्लेसमेंटही मिळतात. शिवाय एमई किंवा एमटेक केल्यानंतर तुम्ही संशोधन क्षेत्राकडेही वळू शकता. सध्या त्याला बरीच मागणी आहे. गेटमधील उत्तम गुणांमुळे तुम्हाला नामांकित पब्लिक कंपन्यांमध्ये थेट नोकरीही मिळू शकेल.

मी सांख्यिकी विषयात पदवी अभ्यासक्रमाला शिकत आहे. मला त्यानंतर याच विषयात पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. त्यानंतर मी काय करू?

-अदिती गोगटे

आपल्या देशात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सांख्यिकी तज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणावर गरज आहे. त्यामुळे चांगल्या गुणांनी पदव्युत्तर पदवी मिळाल्यास तुम्हाला विविध प्रकारच्या करिअर संधी मिळू शकतात. तुम्ही इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन देऊन भारत सरकारच्या अर्थ विभागात उच्चश्रेणीचे पद हस्तगत करू शकता. अध्यापन/संशोधनाचे क्षेत्र तुम्हासाठी खुले होऊ शकते.

 

मी २०१५ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात बीई केले आहे. मी २०१७ मध्ये गेट परीक्षा (GATE) देण्याचा विचार करत आहे. मी या परीक्षेसाठी माझे विषय बदलू शकते का? तसे जर असेल तर मी कोणता विषय घेऊ ?

अक्षरा कदम

आपल्या देशातील ज्या काही कठीण परीक्षा समजल्या जातात त्यात गेटचा समावेश आहे. बहुतेक विद्यार्थी दीड-दोन वर्षे या परीक्षेची तयारी करतात. अशा स्थितीत नवा विषय घेण्यापेक्षा तुम्ही ज्या विषयात बीई करत आहात तोच विषय कायम ठेवणे उचित ठरेल.

मी आता १२वीला आहे. मला रसायनशास्त्राची आवड आहे. पण मग मी बीएस्सी केमिस्ट्री करू की केमिकल इंजिनीअरिंग? मला शिकवण्याची आवडही आहे. पण माझे उद्दिष्ट एमपीएससी आहे. पुरता गोंधळ उडाला आहे. मी काय करू?

-विशाल मरकड

जर तुमचे उद्दिष्ट एमपीएससी हेच असेल तर मग इतर बाबींचा विचारच करू नका. रसायनशास्त्रात खरंच रस असेल तर बीएससीऐवजी केमिकल इंजिनीअरिंग करणे तुमच्या करिअरसाठी श्रेयस्कर राहील.

मी अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला बारावीनंतर वायुदलामध्ये जायचे आहे. त्यासाठी निवड प्रकिया कशी असते? काय करावे लागेल?

-अजित केदार

तुम्ही नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी व नॅव्हल अ‍ॅकॅडेमीमधील प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी परीक्षा देऊन वायुदलात जाऊ  शकता. त्यासाठी बारावीमध्ये तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेणे आवश्यक आहे. ही परीक्षा वर्षांतून दोनदा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची असते तिचा दर्जा १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेसारखाच असतो. त्यामुळे तुम्ही

११ वी १२ वीच्या विज्ञान शाखेचा परिपूर्ण अभ्यास केलात तर या परीक्षेत यश मिळू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tips for successful career planning