मागील काही लेखांमध्ये आपण उपयुक्ततावादी आणि कर्तव्यवादी विचारप्रणालींची चर्चा केली. उपयुक्ततावादामध्ये निर्णयाची नतिकता निर्णयाच्या परिणामांवर अवलंबून असते. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळवून देणारा निर्णय अधिक ग्राह्य़ मानला जातो. उपयुक्ततावाद सुखी निर्णयातल्या उपयुक्ततेला महत्त्व देतो तर त्यातील संख्यात्मक मुद्दय़ांना दिलेले अवास्तव महत्त्व दाखवून देण्याचे काम कर्तव्यवाद करतो. नतिकतेचा कोणताही आधार नसलेली समाजव्यवस्था केवळ संख्यात्मक बळावर प्रगती करू शकत नाही व म्हणूनच नतिक मूल्ये जोपासणे हे समाजहितासाठी अत्यावश्यक असते. नितांत आवश्यकतावादाच्या नियमांमधून कान्टने हे ठामपणे मांडले आहे. उपयुक्ततावाद आणि कर्तव्यवाद या दोन्ही नतिक विचारप्रणालींचा वापर केस स्टडी लिहिताना कसा करता येऊ शकतो हे आता पाहू या.

केस स्टडी

सार्वजनिक बांधकाम विभागात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना आवश्यक सामग्री विकत घेण्यासाठीचे अधिकार दिलेले असतात, अली नावाच्या वरिष्ठ अभियंत्याने या संधीचा पुरेपूर वापर करीत स्वतच्या घराच्या बांधकामासाठी आवश्यक सामग्री कार्यालयाच्या अधिकारातून व पशातून मागवली. महेश जो अलीच्या विभागात काम करणारा कनिष्ठ अभियंता आहे त्याला या सर्वाबाबत कुणकुण होती, त्यावर अली आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील संभाषणाने शिक्कामोर्तब झाले. महेशने याबाबत प्रत्यक्ष अलीशी किंवा अलींच्या वरिष्ठांशी संपर्क करणे टाळून सरळ मध्यवर्ती अन्वेषण शाखेकडे तक्रार केली. मात्र स्वतचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर त्याने अशा प्रकारच्या काळ्या कृत्यांची माहिती अन्वेषण विभागास दिली. कालांतराने याचा परिणाम म्हणून अलीला चौकशीस सामोरे जावे लागले. अलीने याचा राग आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर काढत सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. या वेळेस महेशने आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र घरी गेल्यानंतर अशा प्रकारे खोटे बोलायला लागल्याबद्दलची खंत त्याने पत्नीजवळ बोलून दाखवली. वरील प्रकरणात कोणते नतिक व नीतीनियमविषयक मुद्दे उपस्थित होतात? विविध नतिक विचारसरणींचा उपयोग करून चर्चा करा.

प्रतिसाद 

उपयुक्ततावादी मांडणी ही अशा प्रकारचे नतिक द्विधा प्रश्न समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरु शकते. निर्णयाचे गुणात्मक मूल्य गृहीत न धरण्याचे उपयुक्ततावादी मांडणीचे अंग लक्षात घेतल्यास त्यातील मर्यादा आपल्या लक्षात येतात. परंतु, उपयुक्ततावादी चौकट ही सार्वत्रिक कल्याणकारी स्वरूपाचे निर्णय घेण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते.

वरील प्रकरणामध्ये महेशने अभियंता अली यांच्या निर्णयाचे खंडन करीत असताना वापरलेला दृष्टिकोन हा पूर्णत उपयुक्ततावादाच्या बाजूला झुकणारा निर्णय आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेल्या वस्तूंचा केवळ वरिष्ठ अभियंता अली यांच्या वैयक्तिक फायद्याकरिता उपयोग केला जाणे, हे जास्त लोकांच्या फायद्याचा विचार धुडकावून केलेले कृत्य आहे. त्याच निधीचा उपयोग जास्त लोकांच्या फायद्याकरिता आणि म्हणूनच त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदाकरिता केला जावा, हा महेशचा आग्रह उपयुक्ततावादी विचारसरणीला धरुन आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण अधिकाधिक लोकांच्या सुखासाठी कार्यरत असणे आवश्यक आहे या बांधिलकीतून स्वत: खोटे बोलून महेशने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.

परंतु कान्टच्या उच्च नतिक मूल्यांच्या मोजपट्टीवर महेशचा निर्णय तपासून पाहिल्यास महेशने स्वतच्या नतिक मूल्यांचे अध:पतन करण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसून येतो. याच वेळी महेशने व्यावसायिक जीवनातील नतिक मूल्यांना खासगी जीवनातील नतिक मूल्यांपेक्षा अधिक महत्त्व दिल्याचे जाणवते, म्हणूनच कमी दर्जाचा वाटणारा वैयक्तिक निर्णय एकंदर सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता उच्च नतिकतेचा आदर्श समोर ठेवणारा असू शकतो.

अशा प्रकारे काही प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त नतिक विचारसरणींचा वापर करून दिलेल्या प्रकरणांचे आकलन व विश्लेषण केले जाऊ शकते. कान्टने मांडलेल्या उच्च नतिक विचारांचे मूल्य कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियांकरता अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांचा वापर इतर लोकशाही प्रक्रियांशी जुळवून घेताना कसा करता येऊ शकतो, हे अशा प्रकरणांसाठी प्रभावीरित्या मांडता येऊ शकते. पुढील लेखात आपण एथिक्स, इंटिग्रिटी, अ‍ॅप्टिटय़ूड या पेपरमधील पुढील काही घटकांचा विचार करणार आहोत.