ए खाद्या व्यक्तीच्या चरित्राचं नाव ‘माझे बूट, माझे सोबती’ असं असू शकतं का? याचं उत्तर ‘हो’ असं आहे. ‘माझे बूट, माझे सोबती’ हे आत्मचरित्र आहे एका सामान्य शिक्षकाच्या असामान्य मुलाचं, रिचर्ड शिरमनचं. १८७४ साली जर्मनीमध्ये जन्मलेले रिचर्ड शिरमन हे हाडाचे शिक्षक होते. पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या शिक्षणावर त्यांची नितांत श्रद्धा होती. विद्यार्थ्यांबरोबर हसतखेळत, गाणी म्हणत, त्यांना दऱ्या-खोऱ्यात, डोंगरमाथ्यावर फिरायला नेणं, निसर्गाचं प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यातून इतिहास, भूगोल, विज्ञानाचं शिक्षण घेणं अशी रिचर्ड शिरमन यांची साधीसुधी पद्धत होती. शहरात असलेल्या शाळांमधल्या दमट, कुबट हवेपेक्षा डोंगरावरची शुद्ध मोकळी हवा मुलांना मिळावी, हा रिचर्ड यांचा ध्यास. सहलींसारख्या उपक्रमातून ‘आउटडोअर एज्युकेशन’ म्हणजेच ‘बहि:शाल शिक्षण’ देण्याच्या अभिनव संकल्पनेचे रिचर्ड शिरमन हे उद्गाता होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वीच बहि:शाल शिक्षणाचं मोल जाणणाऱ्या या शिक्षकाचं खरोखरच कौतुक वाटतं.
रिचर्ड यांच्या मनात असलेल्या या उपक्रमाला ‘सहल’ असं संबोधणं चुकीचं ठरेल. कारण या उपक्रमाची कल्पना इतकी व्यापक होती की, ‘निसर्गाच्या पाठीवर अंगाखांद्यावर हुंदडणारी मुक्त शाळा’ हेच रिचर्ड यांचे स्वप्न होते.
रिचर्ड यांची ही कल्पना किती व्यापक होती, हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा, औरंगाबाद शहरापासून पायी प्रवास करत करत अजिंठा लेण्यांच्या परिसरात पोहोचायचे. तिथे चांगला सात दिवस मुक्काम ठोकायचा आणि या सात दिवसांत इतिहास, भूगोल, शिल्पकला, रंगकला, पुरातत्त्व, पर्यावरण, धर्म अशा विविध अंगांनी अजिंठा लेण्यांचा अभ्यास करायचा. अर्थात, हे सारं गटाने करायचं. प्रवासी गटांसाठी प्रत्येक २० किलोमीटरच्या टप्प्यावर राहण्या-खाण्यासाठी हॉस्टेलची सोय करायची. अशा प्रकारची रिचर्ड यांची संकल्पना होती.
१९१२ साली जर्मनीत अल्तेना इथे अशा प्रकारचे पहिले कायमस्वरूपी ‘यूथ हॉस्टेल’ स्थापन झाले. या हॉस्टेलमध्ये दोन प्रशस्त शयनगृहे, सार्वजनिक बठकगृह, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह आणि स्नानगृह अशी सोय होती.
रिचर्ड यांची ही पद्धती इतकी पसंत पडली की, १९१९ साली बहि:शाल शिक्षणासाठी यूथ हॉस्टेल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकटय़ा जर्मनीत ६० हजार इतकी होती. १९२८ साली ही संख्या वाढून तब्बल ३० लाखांवर पोहोचली. यूथ हॉस्टेलची प्रत्येक इमारत म्हणजे जणू रिचर्ड शिरमन यांच्या कलात्मक आणि अभ्यासू मनाचा आविष्कार ठरला. बहि:शाल शिक्षणाच्या या संकल्पनेचे जाळे हळूहळू जगभर विणले गेले.
चार िभतींमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाने ज्ञान वाढते. पण या ज्ञानाला जर अनुभूतीची जोड नसेल तर या ज्ञानाचा काय उपयोग?
माणसाला पक्ष्याप्रमाणे हवेत उडावेसे वाटले, समुद्राच्या तळाशी जावेसे वाटले, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालावीशी वाटली, चंद्रावर पाऊल ठेवावेसे वाटले आणि विशेष म्हणजे त्याने हे सारे काही साध्य केले. हे साध्य करणारी तुमच्या-आमच्यासारखी माणसंच होती, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात ही माणसं वेगळ्या मानसिकतेची होती. त्यांनी वेगळीच व्यवस्थापनकौशल्ये आत्मसात केलेली होती. नील आर्मस्ट्राँग, एडमंड हिलरी, शेरपा तेनसिंग, सुनीता विल्यम्स या सर्वानी ही विशेष कौशल्यं आत्मसात करण्यासाठी बहि:शाल शिक्षणाचे धडे गिरवले होते, हे आपण विसरता काम नये. डॉ. सलीम अली यांचं मन शाळेच्या चार िभतींत कधीच रमलं नाही. रवींद्रनाथ टागोर आणि सी. व्ही. रामन यांनीही बहि:शाल शिक्षणाचा पुरस्कार केला होता.   
स्वानुभवातून शिक्षण, केलेल्या प्रत्येक चुकीला गुरू मानून त्यातून शिकणे आणि पुन्हा तीच चूक होऊ न देणे, पारंपरिक विचारांची जळमटं काढून टाकणे, साहसी वृत्तीची जोपासना करणे, नवविचारांचा अवलंब करणे, अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, प्रत्येक प्रयोग हा संशोधन मानणे ही बहि:शाल शिक्षणाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
२१ व्या शतकात ‘मास एजुकेशन’च्या रेटय़ामुळे विद्यार्थ्यांवर फक्त माहितीचा मारा होतो आहे. त्यामध्ये ज्ञानाचा पत्ता नाही आणि अनुभूतीला थारा नाही. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, योग्य अंदाज बांधावेत, उत्तम नियोजन करावे, प्राप्त परिस्थितीवर उत्तम प्रकारे ताबा मिळवावा, उपलब्ध संसाधने प्रभावीपणे आणि तारतम्याने वापरावीत, गटाचे उत्तम नेतृत्व करावे आणि सहकाऱ्यांना प्रेरणा द्यावी अशी जर  शिक्षणाची उद्दिष्टे असतील तर बहि:शाल शिक्षणाचा प्रसार जोमाने होण्याची गरज आहे.                                                                 
ल्ल          
१ंल्ल्नंल्लॠं१ॠी@८ंँ.ूे
(समन्वयक : हेमंत लागवणकर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direct experience of outdoor education
First published on: 15-07-2013 at 12:04 IST