अमेरिकेतील रेड क्रॉस या संस्थेतर्फे अमेरिकी विद्यापीठांतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह सध्या अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. ही अधिछात्रवृत्ती विविध क्षेत्रांसाठी देण्यात येत असून वेतनासह व विनावेतन असे या उन्हाळी अधिछात्रवृत्तीचे (summer internship) स्वरूप आहे. २०१५ साली घेतल्या जाणाऱ्या या उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रमासाठी (८ जून २०१५ ते १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत) तुमचे अर्ज ‘अमेरिकन रेड क्रॉस’कडे २७ फेब्रुवारी २०१५ पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

अधिछात्रवृत्तीविषयी..
‘रेड क्रॉस’च्या भविष्यकालीन ध्येयधोरणांसाठी विविध क्षेत्रांत बहुविध पाश्र्वभूमी असलेले युवा नेतृत्व जागतिक पातळीवर तयार व्हावे आणि वेगवेगळ्या देशांमधील युवावर्गाला अल्पवयातच ही संधी उपलब्ध व्हावी हा या अधिछात्रवृत्तीचा हेतू आहे.
अमेरिकन रेड क्रॉस या संस्थेच्या वतीने ही अधिछात्रवृत्ती देण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड क्रॉसचे कार्य वैद्यक क्षेत्रासोबत इतर कार्यक्षेत्रांतही सुरू आहे. भविष्यात विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची वानवा भासू नये हेही यामागचे एक प्रमुख कारण आहे. संबंधित अधिछात्रवृत्तीसाठी रेड क्रॉसने खालीलप्रमाणे विषय निवडले आहेत-
युवक व युवा प्रौढ सेवा, स्वयंसेवक व्यवस्थापन, लोकपाल कार्यालय, सर्वसाधारण वकील कार्यालय, गरिबी, बेरोजगारी, आरोग्य आणि सुरक्षितता सेवा, विकास, आपत्ती सेवा, वित्त, शासकीय संबंध, मानव संसाधन विकास, मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा, चक्रीवादळ पुर्नवसन कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सेवा, विपणन, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितता सेवा.
या अधिछात्रवृत्तीचा कालावधी दहा आठवडय़ांचा असेल. हा कालावधी अधिछात्रवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांला संस्थेच्या वॉिशग्टन येथील प्रमुख कार्यालयात किंवा अमेरिकेतील रेड क्रॉसच्या इतर कार्यालयात व्यतीत करता येईल. रेड क्रॉसच्या अधिछात्रवृत्तींपकी काही अधिछात्रवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाईल, तर काहींना स्वखर्चाने आपली अधिछात्रवृत्ती पूर्ण
करावी लागेल.

आवश्यक अर्हता
ही अधिछात्रवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. ज्या उमेदवारांचे सध्या अमेरिकी विद्यापीठामध्ये पदवी शिक्षण सुरू आहे असे कोणत्याही विद्याशाखेचे विद्यार्थी या अधिछात्रवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. रेड क्रॉस उन्हाळी अधिछात्रवृत्ती कार्यक्रम ८ जून २०१५ पासून १४ ऑगस्ट २०१५ या कालावधीत पार पडेल. ज्या काही ठराविक अधिछात्रवृत्तीधारकांना विद्यावेतन मिळणार आहे, ते उमेदवाराच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी सुसंगत आणि अनुभवांवर आधारित असेल. साधारणत: एका तासाला १० ते २० डॉलर्स एवढी रक्कम त्याला मिळू शकते. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक क्षेत्रातील सुमारे ८५ अधिछात्रवृत्त्या रेड क्रॉसकडून दिल्या जाणार आहेत.
अधिछात्रवृत्तीसाठी अर्जदाराची शैक्षणिक कामगिरी आणि इंग्रजी अतिशय उत्तम असावे. कामाचा अनुभव असल्यास अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे.     

अर्ज प्रक्रिया
ज्या विद्यार्थ्यांना या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी संस्थेला स्वत:च्या माहितीसह ई-मेल पाठवावा. रेड क्रॉसच्या संपर्काबद्दलची विस्तृत माहिती संस्थेच्या वेबसाइटवर मिळेल.

निवड प्रक्रिया
अर्जदारांची निवड प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये केली जाते. प्राथमिक निवड, मुलाखत आणि अंतिम निवड. प्राथमिक निवडीमध्ये उमेदवाराशी दूरध्वनीवर संवाद साधला जातो. संस्थेकडे मोठय़ा संख्येने अर्ज येत असल्याने त्यातून योग्य उमेदवारांची  निवड करण्याचे काम या टप्प्यात पार पडते. त्यानंतरच्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते आणि त्यातून निवडलेल्या उमेदवारांची अंतिम निवड अधिछात्रवृत्तीसाठी केली जाते.
अंतिम मुदत
या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०१५ .
महत्त्वाचे संदर्भ
<http://www.redcross.org/support/get-involved/internship-program&gt;      
itsprathamesh@gmail.com