scorecardresearch

करिअरमंत्र

सध्या मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला एनडीए करायचे आहे. त्यासाठी काय करावे?

करिअरमंत्र
संग्रहित छायाचित्र

सध्या मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला एनडीए करायचे आहे. त्यासाठी काय करावे?

– ऋषिकेश हरदास

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी / नॅव्हल अ‍ॅकॅडेमीच्या प्रवेशासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी लेखी परीक्षा आणि सेवा निवड मंडळामार्फत घेण्यात येणारी बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच बुद्धिमत्ता व्यक्तिमत्त्व विकास आणि शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते.

परीक्षामध्ये पुढील दोन पेपर असतात –

(१) गणित (कालावधी- अडीच तास/गुण- ३००/ प्रश्नसंख्या- १२०),

(२) सामान्य क्षमता (कालावधी- तीन तास/गुण- ६००/प्रश्नसंख्या- १५० इंग्रजी-५० आणि सामान्य अध्ययन- १००)यामध्ये इंग्रजी- २०० गुण / सामान्य ज्ञान ४०० गुण यांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान विषयाच्या पेपरमध्ये पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जातात- भौतिकशास्त्र- १०० गुण, रसायनशास्त्र- ६०गुण, सामान्य विज्ञान- ४० गुण, इतिहास, स्वातंत्र्य चळवळ- ८० गुण, भूगोल- ८० गुण, चालू घडामोडी-४० गुण, अशी विभागणी केली जाते.

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमीमधील प्रवेशासाठीची शैक्षणिक व इतर अर्हता

भूदल- मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाने घेतलेली १२वी परीक्षा / नौदल आणि वायुदल- भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह १२वी.

एनडीए प्रवेशासाठी वर्षांतून दोनदा प्रवेश परीक्षा घेतली जाते. २०१७ सालातील पहिल्या प्रवेश परीक्षेसाठी वयोमर्यादा- उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९८ ते १ जुलै २००१ या कालावधीत झालेला असावा. २०१७ सालातील दुसऱ्या प्रवेश परीक्षेसाठी वयोमर्यादा- उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९९ ते १ जुलै २००२ या कालावधीत झालेला असावा.

परीक्षेची सूचना साधारणत: दरवर्षी

सप्टें-ऑक्टोबर आणि मे-जून या कालावधीत प्रकाशित केली जाते.

परीक्षेचा कालावधी- पहिली परीक्षा-मार्च-एप्रिल / दुसरी परीक्षा- ऑगस्ट-सप्टेंबर. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई/नागपूर

या परीक्षेचा अर्ज भरतानाच उमेदवारांना नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी किंवा नेव्हल अ‍ॅकॅडेमीच्या प्रवेशाचा पर्याय नोंदवणे अत्यावश्यक आहे. नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी हा पहिला पर्याय नोंदवल्यास त्याला भूदल, नौदल आणि वायुदलातील प्रवेशाचा पसंतीक्रम द्यावा लागतो आणि त्यानंतर नेव्हल अ‍ॅकॅडेमीतील कार्यकारी शाखेचा पसंतीक्रम देता येतो. नेव्हल अ‍ॅकॅडेमीच्या प्रवेशाचा पहिला पर्याय उमेदवाराने नोंदवल्यास नेव्हल अ‍ॅकॅडमीतील कार्यकारी शाखेचा पहिला पसंतीक्रम देऊन नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमीतील भूदल, नौदल आणि वायुदलातील प्रवेशाचा पसंतीक्रम द्यावा लागतो. इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडेमीमध्ये जाऊ  इच्छिणाऱ्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचा बी.टेक. हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जागेच्या उपलब्धतेनुसार उमेवारांना नौदलाच्या कार्यकारी किंवा तांत्रिक शाखेत अधिकारी पदावर सामावून घेतले जाते.

प्रशिक्षणाचा कालावधी-

भूदलासाठी- तीन वर्षे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी-खडकवासला आणि १ वर्ष इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी देहरादून,

नौदलासाठी- तीन वर्षे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी-खडकवासला आणि १ वर्ष नेव्हल अ‍ॅकॅडेमी, इझिमाला वायुदलासाठी- तीन वर्षे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी-खडकवासला आणि १ वर्ष एअर फोर्स अ‍ॅकॅडेमी  हैदराबाद.

संपर्क- http://www.upsconline.nic.in

 

 

 

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-11-2016 at 02:07 IST

संबंधित बातम्या