इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व मोनाश रिसर्च अकादमी, मेलबॉर्न- ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या संशोधनपर पीएच.डी. शिष्यवृत्तीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत –
शिष्यवृत्तीची पाश्र्वभूमी
या संशोधनपर शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, डिझाइन, गणित यांसारख्या विषयात संशोधनपर पीएच.डी. करून त्याद्वारे संबंधित क्षेत्रात विशेष योगदान द्यावे हा आहे.
शैक्षणिक अर्हता : अर्जदार संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक अथवा अभियांत्रिकीमधील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.वरील पात्रतेशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी जीएटीई, जीआरई, सीएसआयआर- एनईटी, जेएएम यांपैकी अथवा यासारखी विशेष पात्रता परीक्षा दिलेली असेल अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
निवड प्रक्रिया : अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व विशेष पात्रता परीक्षेच्या गुणांकाच्या आधारे त्यांची मुलाखत घेऊन त्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पीएच.डी.-संशोधन सत्र डिसेंबर २०१५ पासून सुरू होईल. संशोधन कालावधीत संशोधक विद्यार्थ्यांना आकर्षक शिष्यवृत्ती, संशोधनपर कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन, मोनाश विद्यापीठाला शैक्षणिक भेट यासारखे लाभ प्राप्त होतील. संशोधनपर प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या संशोधकांना आयआयटी-मुंबई व मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित विषयातील संशोधनपर पीएच.डी. देण्यात येईल.
अधिक माहिती : शिष्यवृत्तीसह संशोधनपर पीएच.डी.च्या संदर्भात अधिक माहितीसाठी http://www.iitbmonash.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  १३ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.