होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या अभियांत्रिकी विषयांतर्गत संशोधनपर पीएच. डी.साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, केमिकल, मेटॅलर्जिकल, न्यूक्लीअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रमेंटेशन वा कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा : अर्जदारांचा जन्म १ ऑगस्ट १९८५च्या नंतर झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटअंतर्गत भाभा अणू संशोधन केंद्र- मुंबई, इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रिसर्च कालपक्कम, व्हॅरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर, कोलकाता व इन्स्टिटय़ूट फॉर प्लाझ्मा रिसर्च गांधीनगर येथे उपलब्ध असणाऱ्या के. एस. कृष्णन रिसर्च असोसिएटशिप योजनेअंतर्गत संशोधनपर पीएच. डी. करता येईल.
शिष्यवृत्तीचा कालावधी व तपशील : वरील शिष्यवृत्तीसह संशोधनपर पीएच. डी. योजनेचा कालावधी ३ वर्षांचा असेल. त्यादरम्यान निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा २४००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना घरभाडे भत्ता व वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होतील.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व अधिक तपशिलासाठी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटच्या http://www.hbni.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज एचबीएनआय- डीजीएफएस प्रोग्रॅम ऑगस्ट २०१३ (इंजिनीअरिंग पोस्ट ग्रॅज्युएटस) अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर -३ एचबीएनआय, ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई-९४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मे २०१३.
इंजिनीअरिंगमधील ज्या पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांना होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटसारख्या प्रतिष्ठित संस्थेतील संशोधनपर पीएच.डी.सह आपले भविष्य घडवायचे असेल अशांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P hd from homi bhabha national institute
First published on: 06-05-2013 at 12:23 IST