‘आपल्या ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी खुलं करणाऱ्या शिक्षकापेक्षा तुमच्या स्वत:च्या मनाच्या उंबरठय़ापाशी तुम्हाला नेणारा शिक्षक खरा.’ अशा अर्थाचं खलील जिब्रानचं एक विधान आहे.
शिकणाऱ्याच्या मनाचा सहभाग असेल तर शिकणं सहज घडतं. यासाठी त्याच्या मनाचं दार उघडणं, ‘मला हे शिकायचंय’ असं वाटणं किंवा किमान ‘पाहू तरी काय आहे ते’ एवढा रस वाटून त्या विषयात मनाचं गुंतलं जाणं यापकी काहीतरी घडायला हवं. तर शिकण्याचं ओझं वाटत नाही. या जागेपर्यंत शिकणाऱ्याला पोहोचवणारा तो शिक्षक. फक्त पेशाने नव्हे, तर वृत्तीने. थोडक्यात, ज्याच्याकडून शिकवलं जातं किंवा ज्याच्याकडून शिकता येतं तो शिक्षक आणि जो शिकू इच्छितो तो विद्यार्थी अशा व्यापक व्याख्या आपण करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनाचा शिकण्यात सहभाग असेल तर उत्तमच, पण नसेल तर तो मिळवणं हे शिक्षकाचंच काम असतं.
मनाचा सहभाग कशामुळे मिळतो?
सहभागासाठी ‘आवड वाटणं’ आवश्यक आहे. ‘चला, आता शिकण्यात सहभागी होऊ या,’  असं नुसतं ठरवून किंवा ‘चला, सर्वानी सहभागी व्हा,’ असं सांगून सहभाग मिळत नाही. कारण शिकण्याची आवड ही आतून आली पाहिजे. व्यक्तीच्या शिकण्यामध्ये ती स्वत:, तिचे मित्र, शिक्षक आणि कुटुंबीय यातल्या प्रत्येकाचा २५-२५ टक्के वाटा असतो, अशा अर्थाचं एक संस्कृत वचन आहे. शिकवणाऱ्याला विद्यार्थ्यांचं निरीक्षण आणि आकलन नेमकं करता आलं, विद्यार्थ्यांनं स्वत: कळत नकळत लक्ष पुरवलं, कुटुंबियांनी सहकार्य केलं किंवा मित्रांनी प्रोत्साहन दिलं तर या सगळ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीतून शिकणाऱ्याच्या मनाचा सहभाग मिळतो आणि शिकण्याची प्रक्रिया आवडीने पुढे सरकते. या संदर्भात वाचलेली परदेशातील एक केसस्टडी आठवते.
एका शाळेतल्या दुसरीच्या वर्गातल्या जवळ जवळ सर्व विद्यार्थ्यांना काही केल्या वाचनात रसच वाटत नव्हता. शिक्षकांचे सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरत होते. कुठलाच उपाय चालेना, तेव्हा त्यांनी एका मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली. त्या मानसशास्त्रज्ञाच्या लक्षात आलं, की आवड वगरे दूरच, वाचनाचं नाव काढलं की बरीचशी मुलं आपला त्याच्याशी काही संबंधच नसल्यासारखी अलिप्त होऊन जातात. मानसशास्त्रज्ञाच्या लक्षात आलं की, वाचनाशी काही घेणंदेणं नसल्यासारखं मुलांचं हे अलिप्त होणं नेहमीपेक्षा वेगळं आहे, समस्येचा गाभा तिथे आहे.
मग त्या मानसशास्त्रज्ञानं त्या मुलांची वैयक्तिक, कौटुंबिक वगरे पाश्र्वभूमी शोधली. पालकांच्या भेटी घेऊन चर्चा केल्या. त्यात असं लक्षात आलं की, त्या वर्गातली बहुसंख्य मुलं एका विशिष्ट समाजातली होती,
ज्यांच्या बोलीभाषेला लिपी नव्हती. मागच्या पिढीपर्यंत त्यांचा सगळा
व्यवहार तोंडीच चालत होता, ‘लेखी’ ही संकल्पनाच त्यांच्या घरांमध्ये कित्येक पिढय़ा नव्हती. वाचनापर्यंत पोहोचलेली ही पहिली पिढी, लेखन अजून दूरच.  
समस्या एक-दोघांची नव्हती, तर पूर्ण वर्गाची होती. त्यामुळे उपायही सामुदायिकच हवा होता. वाचन म्हटलं की अलिप्त होण्याच्या िबदूपासून आख्ख्या वर्गाला लेखी लिपीच्या स्वीकारापर्यंत  न्यायचं हे आव्हानच होतं. त्यानं एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. त्या वयाच्या मुलांना आवडण्यासारखे, इंग्रजी सबटायटल्स असलेले इंग्रजी सिनेमे दर शनिवार-रविवारी दाखवायला सुरुवात केली. प्रवेश ऐच्छिक होता. पण पहिल्या एक-दोन सिनेमांनंतर मित्रमित्रांच्या सांगण्यावरून मुलांची संख्या वाढत गेली. पालकांनीही मुलांना आवर्जून पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे उपक्रम उत्तम चालला. सिनेमा पाहता पाहता, सबटायटल्स पण नकळत मुलांच्या नजरेखालून जायची. सबटायटल्स नकळत वाचल्यामुळे शब्दांचं दिसणं आणि उच्चार यांचं साहचर्य मुलांच्या मनात रुजत गेलं, लिपी ओळखीची होत गेली. काही दिवसांनी घेतलेल्या एका सोप्या चाचणीला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. आणखी काही दिवसांनी मुलं मनापासून लेखन-वाचनात सहभागी व्हायला लागली. ते अलिप्तपण विरघळून गेलं.
या केसस्टडीतून सहभागाबद्दल बरंच काही स्पष्ट होतं. त्या मानसशास्त्रज्ञानं ‘वाचन-लेखनाची नावड’ या ‘खऱ्या’ समस्येचा मुलांपाशी उच्चारच केला नाही. त्यामुळे समस्येचा ‘इश्यू’ झाला नाही. त्यानं आवडत्या सिनेमांच्या माध्यमातून मुलांच्या मनाच्या वेगळ्याच दारावर टकटक केली आणि किलकिल्या झालेल्या फटीतून सिनेमांच्या भेटीसोबत सबटायटल्सपण हळूच आत सारून दिली. त्यामुळे कुठलाही बाऊ न होता लिपीचा सहज स्वीकार झाला.  मानसशास्त्रज्ञानं त्यांच्या मनाचा सहभाग खुबीनं मिळवला. त्यामध्ये सिनेमा पाहणं हा शनिवार-रविवारचा ‘ऐच्छिक उपक्रम’ ठेवला हेदेखील
महत्त्वाचं होतं. अनिवार्य केला असता तरी मुलांच्या मनातला विरोध कुठेतरी जागा झाला असता. तसं न होता एकमेकांच्या नादानं मुलं वाढत गेली, त्यातून गटाचे फायदे मिळाले आणि पालकांच्या सहकार्यामुळे सातत्य राहिलं.
शिकवणारा आवडणं
विद्यार्थ्यांच्या मनाच्या सहभागामध्येशिकवणारा आ़ळडणं, आपला वाटणं हादेखील महत्त्वाचा भाग असतो. विनोद करून हसवत शिकवणारे लोक – शिक्षक पालक, दादा-ताई हे जास्त लाडते असतात. तसं तर इस्त्री केलेल्या मख्ख चेहऱ्यानं बोलणारा फक्त शिकवणाराच कशाला, कुणीही व्यक्ती कंटाळवाणी होते, हे उघड सत्य आहे. पण शिकवणाऱ्याच्या भूमिकेत आपण आवडायला हवे असू तर फक्त चांगलं शिकवणं पुरेसं नाही. मजा करत, हसतखेळत शिकवणं जाणीवपूर्वक करायलाच हवं. मनापासूनच्या सहभागासाठी हे ‘मस्ट’ आहे.
मनाचा सहभाग कशामुळे मिळत नाही?
अपमानकारक, कुचकट बोलणाऱ्या, समोरच्याला टार्गेट करणाऱ्या, दुसऱ्याचा सन्मान न जपणाऱ्या लोकांकडून कुणालाच शिकावंसं वाटत नाही. मनाचा सहभाग दूरच, ते नको नकोच म्हणत राहतं. तसंच खूप जास्त बोलणं हे कंटाळा येण्याचं आणखी एक कॉमन कारण असतं. शिकवणारा एवढं बोलतो, की विद्यार्थ्यांचं काम फक्त ‘तोंडावर बोट ठेवून ते सांगतील ते ऐकणं’ एवढंच उरतं. अर्थात ‘ऐकणं’ या गोष्टीत कोणीही व्यक्ती किती काळ सहभाग देऊ शकेल? कंटाळा येणारच. सतत बोलण्यामागची शिकवणाऱ्याची ‘बेसिक नीड’ नकळतपणे ‘बघा, मला किती येतंय’ ते दाखवण्याची असेल तर विद्यार्थ्यांला किती समजतंय? ते पाहणं राहून जातं. मग सहभाग दूर राहतो.
उत्सुकता, स्वत: काहीतरी केल्याचं समाधान, क्रिएटिव्हिटी या गोष्टीचाही सहभागाशी जवळचा संबंध आहे. त्यांचं असणं-नसणं किंवा प्रमाण यातून शिकणं ही आनंददायक प्रक्रिया आहे की त्रासदायक हे ठरतं.
neelimakirane.com