जिल्हा परिषद शाळा खोरीचा पाडा इथले आदिवासी विद्यार्थी वारली भाषेतूनच शिकतात. प्रमाण मराठीशी ओळख झाल्यावर ती भाषाही छान वापरतात आणि सोबत इंग्रजीही उत्तम बोलतात. त्यांच्या या भाषाप्रगतीचे कारण आहेत, त्यांचे शिक्षक राजन गरुड.

डीएड केल्यानंतर राजन गरुड यांना पहिलीच शाळा मिळाली ती जि.प.शाळा खोरीचा पाडा. २००९ मध्ये ते या शाळेवर रुजू झाले. पालघर जिल्ह्य़ातली ही शाळा डोंगरातच. जाण्यासाठी दुर्गम. सफाळ्यापासून १५ किमी तर पालघरपासून ३०किमीवर. सुरुवातीला शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्याने गरुड यांना फारसे वेतन नव्हते. त्यामुळे ज्या गावात शाळा तिथेच राहणे भाग होते. शिवाय राजन तिथे गेले तेव्हा शाळा जवळपास एकशिक्षकीच होती. या प्राथमिक शाळेचा पट होता, ३०. आदिवासी वस्ती. त्यामुळे त्यांची आणि शाळेची भाषा वेगळी. मुले शाळेत येत नव्हती. त्यांना शाळेची ओढ नव्हती. अशी सगळी परिस्थिती होती. पण हिंमत न हरता राजन यांनी कामाला सुरुवात केली. राजन यांना खरे तर अभिनेता व्हायचे होते पण परिस्थितीमुळे ते शिक्षक झाले. पण आपल्या कलेचा पुरेपूर उपयोग त्यांनी या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केला.

विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी सर्वप्रथम त्यांनी स्वत:च्या भाषा शिक्षणाला सुरुवात केली. दिवसभर त्याच गावात राहात असल्याने वारली शिकणे त्यांना शक्य झाले. शिवाय गुरुजी स्वत:च आपली भाषा शिकत असल्याचे कळल्यावर विद्यार्थीही विशेष खूश झाले.

इथे केवळ भाषा हीच अडचण नव्हती. इथल्या अनेक विद्यार्थ्यांचे राहणीमान सुधारणे, किमान स्वच्छतेच्या सवयी लागणे गरजेचे होते. त्यांनी स्वत:च्या आचरणातून मुलांना हे धडे द्यायला सुरुवात केली. शाळेच्या आवारात प्रसन्नता यावी, यासाठी विद्यार्थ्यांसोबत शाळा आणि परिसराची स्वच्छता केली. तिथे फुलझाडे लावली. परसबागेत फळझाडांची लागवड केली. आदिवासी हे मुळातच निसर्गप्रेमी, त्यामुळे या मातीतल्या कामांद्वारे विद्यार्थी नकळतच शाळेकडे ओढले गेले. झाडांची निगा राखता राखता स्वत:ची निगा राखणेही शिकू लागले.

विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, यासाठी राजन यांनी अनेक युक्त्या लढवल्या. त्यातील एक म्हणजे अनोखी शिक्षा. अभ्यासाची नी गुरुजींच्या माराची, शिक्षेची भीती धरून मुले शाळेत येतच नसत. ती दूर डोंगरात पळून जात. त्यांना हुडकून आणण्यासाठी राजनही त्यांच्या मागे जात. एकदिवस असेच जंगलात गेलेले असताना काही वाळलेली लाकडे पाहून राजनना वाटले, याचे काष्ठशिल्प किती छान होईल. मग या विद्यार्थ्यांच्या बोटातील कलेचा त्यांना उपयोग करून घ्यायचा ठरवला. त्या दिवशी पळून गेलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षा म्हणून त्यांना ते लाकूड रंगवायला दिले. ही अनोखी शिक्षा ऐकून विद्यार्थी चक्रावले आणि सुखावलेही. ‘गुर्जी रानातून धरून आणतो पण लाकूड रंगवायला देतो.’ त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची भीती राहिली नाही. शिक्षा पूर्ण करण्याच्या निमित्ताने ते शाळेत बसू लागत मग तिथले उपक्रम पाहताना स्वत:च हळूहळू वर्गात येत. चित्रकले, रंगकलेसोबतच या विद्यार्थ्यांना नृत्यगायनाचीही आवड असते. त्यामुळेच राजननी वर्गातल्या कवितांना छान चाली लावल्या. धडय़ांचे नाटय़ीकरण करायला सुरुवात केली. अभिनय, नृत्याच्या आपल्या आवडीला राजन गरुड यांनी असे वेगळे स्वरूप दिले. या सगळ्या प्रयत्नांना यश मिळून हळूहळू विद्यार्थी शाळेत येऊ लागले.

या दरम्यान राजन वारली भाषा बऱ्यापैकी शिकले होते. त्यांनी लगेचच ती अध्यापनात वापरायला सुरुवात केली. मराठीतून शिकवण्याऐवजी ते चक्क वारलीतून विद्यार्थ्यांना शिकवू लागले. अ अननसाचा असे पुस्तकातले शिकवण्यातून विद्यार्थ्यांना ते फारसे समजत नसे. कारण मुळात अननस हे फळच त्यांना ओळखीचे नसे. त्यामुळे मग अ अनुनाचा (सीताफळ) आ आयाचा (आई) अशाप्रकारे वारली भाषेतील शब्दांपासूनच सुरुवात करत राजन यांनी मुळाक्षरे शिकवली. आपल्या भाषेत शिकल्याने विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमताही वाढली. जी मुले शाळेतही धड जात नसत. ती शिष्यवृत्ती परीक्षेत झळकू लागली. त्यांच्या या उपक्रमाची शासनस्तरावरही दखल घेतली गेली. अशा प्रकारे जवळपास ३५०-४०० वारली शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ असा शब्दसंग्रह त्यांनी आजवर तयार केला आहे. त्याचबरोबर मराठी पुस्तकाचे वारली भाषांतरही त्यांनी केले आहे. सध्या त्यांच्यासोबत गेली काही वर्षे जयवंत परेड हे मूळचे वारली समाजातील शिक्षकही आहेत. त्यांचीही या वारली-मराठी शब्दसंग्रहासाठी खूप मदत झाली, असे राजन आवर्जून सांगतात.

याबरोबरच इंग्रजी, विज्ञान, गणित या इतर विषयांसाठीही त्यांनी अनेक उपक्रम राबवले. इंग्रजीही सर्वसामान्य मराठी मुलांसाठी द्वितीय भाषा असते. परंतु या आदिवासी पाडय़ातील विद्यार्थ्यांसाठी प्रमाण मराठी हीच त्यांची द्वितीय भाषा ठरते. कारण प्रथम भाषा वारली. मग इंग्रजी मराठीतून शिकवण्याऐवजी राजनसरांनी वारली ते इंग्रजी अशाप्रकारे शिकवायला सुरुवात केली. सोबत इंग्रजीसाठी अनेक कल्पक उपक्रम घेतले. अध्यापनसाहित्य तयार केले. उदा. अक्षरांच्या ढिगातून शब्द तयार करणे, संगीतमय पाढे, निसर्गभेटी,  त्याच्या नोंदी ठेवणे.  भूगोल समजून घेण्यासाठीही राजन यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रकलेचा वापर केला. शाळेच्या पटांगणात मातीमध्ये नकाशे आखून विद्यार्थ्यांना ते फुलांनी सजवायचे असतात. सरावाने विद्यार्थी हळूहळू स्वत:च कोणता प्रदेश कुठे, कोणता नकाशा कसा, हे रेखाटण्यात तरबेज होतात. वर्गामध्ये धडय़ांचे नाटय़ीकरण करता करताच राजननी स्वत: काही नाटुकली बसवली आणि विद्यार्थ्यांकडून त्यावर नाटय़प्रयोग बसवून घेतला. जिल्हास्तरापर्यंत त्यांच्या नाटकांना पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या नृत्यकौशल्याचा उपयोग करून इतर भागांतील लोकनृत्येही बसवली. लवकरच पंचक्रोशीत विद्यार्थ्यांच्या या कलेची ख्याती पोहोचली. त्यांना गावोगावी बोलावणे येऊ लागले. शाळेचे वेळापत्रक सांभाळून राजन विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी आवर्जून नेतात. ‘कारण यानिमित्ताने आमच्या लेकरांना बाहेरील जग पाहायला मिळते,’ असे त्यांना वाटते. कधी घराच्या बाहेरही न पडलेली ही खोरीची पाडामधील मुले आता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. एकेकाळी शाळा पाहिल्यावर पळून जाणारी पोरे आता मात्र ‘माना हो शालात जायाचा आहे,’ असे हक्काने पालकांना सांगू पाहात आहेत. हेच राजन गरुड यांच्या कामाचे यश आहे.