एमपीएससी : सामान्य अध्ययन पेपर १ ची तयारी

अभ्यासक्रम, अभ्यासाची तयारी आणि संदर्भपुस्तके यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन.

एमपीएससीची पूर्वपरीक्षा येत्या एप्रिलमध्ये होत असून त्यातील पेपर १ अथवा सीसॅट १ या सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेची तयारी कशी करावी, याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. याचा अभ्यासक्रम, अभ्यासाची तयारी आणि संदर्भपुस्तके यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन-

मित्रांनो, येत्या १० एप्रिल २०१६ रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रात  येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे.

पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच मुख्य परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होते. पूर्वपरीक्षा ही एकूण ४०० मार्काची असून यात दोन पेपर असतात. यांपकी पेपर १ किंवा सीसॅट १ हा सामान्य अध्ययनाचा पेपर असून यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भारतीय संविधान, विज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडी यांसंबधी १०० प्रश्नांचा २०० गुणांचा पेपर असतो. दुसरा पेपर (सीसॅट -२) २०० गुणांचा पेपर असतो.

परीक्षेची तयारी

ही परीक्षा विविध विद्याशाखांतील पदवीधर विद्यार्थी देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांगणिक अभ्यासाची पद्धती थोडय़ाफार प्रमाणात बदलते. उदा. काही कला व वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या घटकांमध्ये गती नसते, मात्र इतिहास, भूगोल यांवर त्यांची पकड असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या घटकांच्या संदर्भात विशेष अडचण येत नाही. मात्र, इतिहास, भूगोल विषयांचा अभ्यास करताना त्यांना  अडचणी येतात. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की, प्रत्येक विद्यार्थ्यांगणिक परीक्षेच्या तयारीची पद्धत बदलणारी असते. तयारी करताना विद्यार्थ्यांनी काही गोष्टी अवश्य लक्षात घ्याव्यात, त्या अशा..

सुरुवातीला पाचवी ते  बारावीपर्यंतच्या राज्य क्रमिक पुस्तकांचे दोन ते तीन वेळा वाचन होणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, साधारणत: १० ते १५ टक्के प्रश्न हे थेट या अभ्यासक्रमावरून घेतलेले असतात. गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास व या वर्षांत झालेल्या आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिका पाहिल्यास तर लक्षात येते की, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप वर्षांकाठी बदलते.

परीक्षेचा अभ्यासक्रम

महाराष्ट्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी ६ इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ ६ राज्य पद्धती व प्रशासन ६ आíथक आणि सामाजिक विकास ६ पर्यावरण  ६ सामान्य विज्ञान

चालू घडामोडी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ व २०१५ या परीक्षेचा विचार करता चालू घडामोडींचा आवाका विस्तारलेला दिसतो. विद्यार्थ्यांनी तयारी करताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन आवश्यक आहे.

इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ – सुरुवातीला अभ्यासक्रमाचे व्यवस्थित वर्गीकरण करा. अभ्यासक्रमात इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह असा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यांचा अभ्यास करावा. याबरोबरच भारताचा सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासावा.

जरी प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असले तरी तयारी वस्तुनिष्ठ स्वरूपाची न करता एखाद्या दर्जेदार पुस्तकाचे दोन ते तीन वेळा व्यवस्थित वाचन करून ऐतिहासिक प्रक्रियांचा संदर्भ समजून घ्या. हे संदर्भ समजल्याशिवाय वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवणे कठीण जाते.

तयारी करताना सुरुवातीला राज्य मंडळाच्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांचे सविस्तर वाचन करावे.  जे विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असतील त्यांनी एनसीईआरटीची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचावीत. यातील कला आणि संस्कृती हा भाग व्यवस्थित समजून घ्यावा.

इतिहासाचा अभ्यास करताना ऐतिहासिक सनावळ्यांची भीती बाळगू नये. परीक्षेमध्ये फक्त सनावळ्यांवर विचारले जाणारे प्रश्न हे मर्यादित असतात. दोनदा-तीनदा वाचन केल्यानंतर व ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजून घेतल्यानंतर सनावळ्या व्यवस्थित लक्षात राहतात.

संदर्भग्रंथ – सर्वप्रथम क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. आधुनिक भारताचा इतिहास – बिपिनचंद्रा (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.). आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.) प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करावा.

महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल – एमपीएससीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल या घटकाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील एक वर्षांच्या विविध परीक्षांचा अभ्यास केला तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येतो.  तो म्हणजे भूगोलावरील काही प्रश्न नकाशासंबंधातील असतात. याची दखल घेत या घटकाचा अभ्यास परीक्षार्थीनी राज्याचा, देशाचा आणि जगाचा नकाशा समोर ठेवून करावा. जगाचा भूगोलाचा अभ्यासताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी आणि नंतर खंडानुसार अभ्यास सुरू करावा जेणेकरून अभ्यास सोपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका- कॅनडा- दक्षिण अमेरिका इत्यादी, युरोप खंड, आफ्रिका खंड.

संदर्भग्रंथ –  सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. ६ भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी महाराष्ट्राचा समग्र भूगोल – प्रा. ए. बी. सवदी यांचे पुस्तक जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक.

पर्यावरण – हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व  रंजक घटक आहे. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुढील प्रकरणांचा आधार घ्यावा- वातावरणातील बदल, जैव विविधता, परिस्थितिकी, ग्लोबल वॉìमग, कार्बन क्रेडिट, बायोस्पेअर रिझव्‍‌र्ह, नॅशनल पार्क, ओझोन थराचा क्षय, बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट. वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा उदा. रिओ परिषद, कॅन्कून परिषद इत्यादी.

भारतीय व राज्यातील राज्यपद्धती व प्रशासन – या घटकाची तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहे त्यांचा संदर्भ ध्यानात घ्यावा. भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यायला हवी. त्यातील महत्त्वाची कलमे लिहून ती वारंवार वाचावीत. निरनिराळ्या घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायतराज, ७३वी घटना दुरुस्ती, ७४वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग त्यांचे कार्य, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी केंद्रीय व राज्य स्तरावर नियुक्त केलेल्या समित्यांचा अभ्यास करावा.

आíथक व सामाजिक विकास – अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात, त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्याात धोरण, कर प्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती यांचाही अभ्यास करावा. याशिवाय वरील अभ्यासाची सांगड शाश्वत विकास, लोकसंख्या, सामाजिक क्षेत्र, देशाची व राज्याची कृषी व्यवस्था व सहकार अशा मुद्दय़ांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होईल.

सामान्य विज्ञान – यात जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित अशा सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करावा. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळ्या अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणी विज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे, जीवनसत्त्वे, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्थेचा अभ्यास करावा.

विषयानुरूप उल्लेख केलेल्या संदर्भ पुस्तकांव्यतिरिक्त योजना व कुरुक्षेत्र, लोकराज्य, या मासिकांमधील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत.

– डॉ. जी. आर. पाटील   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Preparation of mpsc exam paper