scorecardresearch

Premium

दिवस ‘समर जॉब्ज’चे!

‘समर जॉब’चा ऋतू लवकरच सुरू होईल. पॉकेटमनी आणि त्याहून महत्त्वाचा असा कामाचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी ‘समर जॉब’कडे वळणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे.

दिवस ‘समर जॉब्ज’चे!

‘समर जॉब’चा ऋतू लवकरच सुरू होईल. पॉकेटमनी आणि त्याहून महत्त्वाचा असा कामाचा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी ‘समर जॉब’कडे वळणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. समर जॉब कसा शोधावा, या कामांची नेमकी निवड कशी करावी आणि त्यातून नक्की काय मिळवता येईल, हे कथन करणारा लेख-
पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांच्या वार्षिक परीक्षा आवरल्या आहेत आणि सुटीचे दोन – अडीच महिने विद्यार्थ्यांच्या हातात आहेत. भ्रमंती आणि मौजमजेसाठी काही दिवस राखले तरीही बराच कालावधी विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहतो. हा कालावधी प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान आणि अर्थार्जनासाठी नक्कीच वापरता येईल. जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षांत प्रवेश करताना तुमचा आत्मविश्वास दुणावलेला असेल आणि तुमचे पाठय़पुस्तकापलीकडचे ज्ञानही.
क्रमिक अभ्यासक्रमांतून पदरी पडणारी माहिती आणि ज्ञान पुढील वाटचालीसाठी पुरेसे नसते. वैद्यक, व्यवस्थापनासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्येही प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठीही काही सत्रे राखीव असतात.  काही उच्च शिक्षणविषयक अभ्यासक्रमांना तर स्वतंत्ररीत्या संशोधनाचीही गरज असते.  पुस्तकी वा अभ्यासाद्वारे संपादन केलेले ज्ञान याचे प्रत्यक्ष उपयोजन काम करताना कसे करता येईल, याचा जणू पाठ या कामातून मिळत असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना मिळणारा कोणत्या ना कोणत्या कामाचा अनुभव हा त्यांचा करिअरला पूरक ठरतो. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या – दुसऱ्या वर्षांला जर करिअरची दिशा निश्चित झाली नसेल तर नेमकी दिशा निश्चित व्हायलाही समर जॉब्जची मदत होऊ शकते. कार्यालयीन कामकाज, विविध विभागांचा समन्वय, सहकाऱ्यांसोबतचे संबंध या सर्व बाबींचाही अंदाज येतो.  
बव्हंशी पदवी प्रमाणपत्राच्या आधारे जेव्हा विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करतो, तेव्हा उद्योगसमूह मात्र पदव्यांच्या भेंडोळ्यांच्या पलीकडे पाहणं पसंत करतो. कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कामाचा अनुभव हा तुमच्या बायोडेटय़ात भर घालणारा असतो आणि नोकरी देतानाही तो लक्षातही घेतला जातो. म्हणूनच विद्यार्थीदशेत केलेल्या ‘समर जॉब्ज’चा लाभ विद्यार्थ्यांना नोकरीसाठीच्या उमेदवारीच्या काळात होतो.
शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या खर्चाचा वा एखादा आवडीचा छंद जोपासण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चातील खारीचा वाटा उचलण्यास मदत होते, त्याचसोबत महाविद्यालयीन, विद्यापीठीय जगतातून बाहेर पडत जगाला सामोरं जाण्याची उमेद या ‘समर जॉब’मुळे जागी होते. वर्गाच्या बाहेरच्या- व्यावहारिक जगात शिकण्याची एक संधी यानिमित्ताने मिळते.
सुटीत पैसे कमावण्यासारखं काहीतरी करता आलं असतं तर किती छान, असा विचार करणाऱ्यांना भोवताली कितीतरी पर्याय खुले आहेत. वेगवेगळे फूड जॉइंटस्, रेस्तराँ, रिटेल स्टोअर्स, मनोरंजन नगरी, छोटे-बडे उद्योगसमूह, उन्हाळी शिबिरे.. ही यादी बरीच वाढत जाते. यातील कुठले काम करायला तुम्हाला आवडेल हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग तुमची सुटी कारणी लागली, म्हणून समजा! एकदा का अमूक एक काम करायला आवडेल, हे तुम्ही ध्यानात घेतलेत, तर मग ते आपल्या अर्हतेच्या तुलनेत काहीसे कमी अथला तुच्छ आहे, असे वाटून घेण्याची गरज नाही. प्रत्येक कामातून कुठला ना कुठला अनुभव हा गाठीशी जमा होत असतोच.
‘समर जॉब’ ही संकल्पना तशी मूळची पाश्चात्य राष्ट्रांची! मात्र गेल्या काही वर्षांत आपल्याकडच्या युवावर्गानेही ती उचलून धरली आहे. काही आर्थिक गरजेपोटी, काही पॉकेटमनीसाठी तर काही अनुभव पदरात पडावा म्हणून समर जॉबकडे वळताना दिसतात.
‘समर जॉब’च्या या उण्यापुऱ्या दोन महिन्यांत मिळणारी कमाई गलेलठ्ठ जरी नसली तरी तो अनुभव आणि त्यातून होणाऱ्या ओळखी या तुमच्या करिअरच्या आगामी टप्प्यात लाखमोलाच्या ठरू शकतात. तुमच्या कामावर खूष होत वेगळ्या प्रकारच्या कामाची ऑफरही तुम्हांला मिळू शकते.  
तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यातील ‘समर जॉब’ मिळाला तर सोने पे सुहागा! त्या क्षेत्रातील अनुभवासोबतच प्रत्यक्ष त्या क्षेत्रातील घडामोडींचा आणि तुम्हांला करिअरची ही दिशा कितपत पेलेल, याचा अचूक अंदाज या दोन महिन्यात येऊ शकतो.
असा हा समर जॉब शोधायचा कसा आणि मिळवायचा कसा, हे प्रश्न युवावर्गाला पडणे तसे साहजिकच. सुटीच्या कालावधीतला ‘समर जॉब’ मिळवणं तसं फारसं अवघड नाही. अनेक कंपन्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा मागोवा घ्यायचा असतो. अशा वेळेस मार्केट रीसर्च, अल्पावधीसाठीचे ‘सेल्स प्रमोशन’चे प्रकल्प यासाठी त्यांना उमेदीचे नवे चेहरे हवे असतात. अशी कामं करून घेण्यासाठी या कंपनींना त्यांच्या स्वतच्या टीमपलीकडच्या व्यक्तींची गरज भासते. मग अशा प्रकारची कामं ते मार्केट रिसर्च एजन्सीजकडून करून घेतात. अशा मार्केट रिसर्च एजन्सीजची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. या एजन्सीजकडे जाऊन स्वतचा बायोडेटा देऊ शकता. एखाद्या उत्पादनाचे टेस्ट मार्केटिंग, टेलिमार्केटिंग, एखाद्या प्रदर्शनाचे कामकाज अशा वेगवेगळ्या कामांसाठी त्यांना विद्यार्थीवयाचे उमेदवार हवे असतात. अशा कामांच्या जाहिराती झळकताना दिसणार नाहीत. मात्र बाजारपेठेतील अशा संधी तुमच्या तुम्हाला शोधाव्या लागतात. यासाठी तुमच्या आवडत्या करिअरमधील व्यक्ती, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या संपर्कात राहिल्याने मदत होते.
सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठीचा ‘समर जॉब’ हा प्रामुख्याने मार्केट रीसर्च संबंधित कामांमध्ये उपलब्ध असायचा. आज मात्र फास्ट फूड जॉइंट हे समर जॉब देऊ करणारी एक मोठी दुनिया झाली आहे. अनेक रेस्तराँजमध्ये घाईगर्दीच्या वेळेस कॅश काऊंटरपासून घरपोच सेवा अशा वेगवेगळ्या कामांसाठी नवीन मुलं हवी असतात. वेगवेगळ्या अम्युजमेन्ट पार्क अर्थात मनोरंजन नगरीमध्येही उन्हाळी सुटीचा मोसम आणि संभाव्य गर्दी लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर ‘समर जॉब्ज’ उपलब्ध असतात. तिथल्या गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी, ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी नव्या दमाचा युवावर्ग त्यांना हवा असतो. व्यापारी प्रदर्शनात एखाद्या स्टॉलची जबाबदारी सांभाळणे, स्टॉलला भेट देणाऱ्यांना एखाद्या उत्पादनाची माहिती देणं अशा प्रकारची कामं ‘समर जॉब’अंतर्गत तुम्हांला करता येतील. अशा कामांसाठी प्रदर्शनांच्या आयोजकांशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. अशा कामांमधून तुम्हाला व्यापारउदीमाचा आणि मनुष्यस्वभावाचा भरगच्च अनुभव मिळतो. अशा प्रकारची व्यापरप्रदर्शने सलग तीन-चार दिवस असतात. प्रदर्शन किती दिवसांचे आहे, यावरून तुम्हाला तुमचा मोबदला मिळतो.
‘समर जॉब्ज’साठी युवावर्गाला गेल्या काही वर्षांत एक नवा पर्याय खुला झाला आहे, तो म्हणजे शॉप्स आणि रिटेल आऊटलेटचा! अनेक युवक-युवती केवळ समर जॉब म्हणून नव्हे तर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना अर्धवेळ कामासाठी हे क्षेत्र निवडतात. मोठमोठाली डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्समध्ये कुठले ना कुठले उत्सव नि धमाके सुरू असतातच. त्यावेळी उसळणाऱ्या गर्दीच्या वेळेस ग्राहकांना माहिती देण्यापासून गर्दीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत अनेक कामं करण्यासाठी तडफदार युवावर्गाची गरज असते.
त्याचप्रमाणे उन्हाळी शिबिरं, रिसॉर्टस्, सुटीची ठिकाणं, फिटनेस सेंटर इथे उसळणारी गर्दी लक्षात घेता युवावर्गासाठी वेगवेगळी कामं उपलब्ध होऊ शकतात. अशा कामांमध्ये तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते, ही आणखी एक जमेची बाब.
तुम्ही रुग्णालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, प्राण्यांचे रुग्णालय, स्वयंसेवी संस्थांचे प्रकल्प अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवाभावाने काम करू शकाल. कदाचित, केलेल्या कामांच्या तुलनेत मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम ही काहीशी कमी असू शकते. मात्र तिथे मिळणारा कामाचा अनुभव आणि मिळणारे आशीर्वाद हे अनमोल असतात.
‘समर जॉब’च्या रूपात तुम्हाला एखाद्या छोटय़ा-मोठय़ा कंपनीमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे एखाद्या बडय़ा उद्योगसमूहात कुठल्या संधी उपलब्ध आहेत, याचा तऱ्हेतऱ्हेने अंदाज घ्या. अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्याही सुटय़ांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देतात. अशा संधींचा शोध तुम्हाला वेबसाइटवर घेता येईल. त्याचबरोबर अनेक बँका, उत्पादन कंपन्या, विमा कंपन्या या त्यांचे नवे उत्पादन वा सेवांची माहिती ग्राहकवर्गाला करून देण्यासाठी, नवे ग्राहक मिळवून देण्यासाठी युवक-युवतींना समर जॉब देऊ इच्छितात. अशा कामांची जमेची बाजू अशी की, यात पैसेही मिळतात. त्याचसोबत कामाचे तासही लवचीक असतात.
एखाद्दुसरा ‘समर जॉब’ केल्यानंतर तुमच्याही लक्षात येतं की, तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करायला आवडेल. तुमच्या भविष्यातल्या करिअरचे नियोजन करायला एका प्रकारे ‘समर जॉब’ मदत करीत असतात. विद्यार्थीदशेतला हा कामाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात करिअर सुरू करताना उपयोगी पडू शकतो. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उदा. एमबीए- प्रवेश परीक्षेच्या दरम्यान मुलाखतीच्या वेळेस कामाचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. तुमचं व्यक्तिमत्व, काम करताना विविध व्यक्तींशी साधावा लागणारा समन्वय याबाबत मोलाचा अनुभव तुम्हाला या ‘समर जॉब’मधून मिळतो. त्याही पलीकडे जर तुम्ही या दोन महिन्यांच्या ‘समर जॉब’मध्ये तुमचे नैपुण्य दाखवून दिले तर ते उच्चपदस्थांच्या लक्षात आल्याखेरीज राहत नाही आणि पदवी पूर्ण झाल्यानंतर त्या उद्योगसमूहाचे द्वार तुमच्यासाठी किलकिले होण्याची शक्यताही वाढते.
पाल्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी ही पालकवर्गावर असते, हा समज गेल्या काही वर्षांत युवावर्ग खोडून काढतोय. केवळ अर्थार्जनासाठी नाही तर मुलाला व्यावहारिक शहाणपण यावे, यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला समर जॉब करू द्यावा. त्याची उमेद वाढवत उमेदवारीच्या कामात तुलनेनं हलकं काम केलं तरी त्यातून त्याला मिळणारा अनुभव मोलाचा असेल, याची खात्री पालकांनी बाळगायला हवी. मुलाला प्रोत्साहन द्यायला हवे. ‘समर जॉब’चा मुलाच्या अभ्यासावर अनिष्ट परिणाम होईल का, अशी अनाठायी भीती बाळगण्याचे कारण नाही. उलटपक्षी, उत्तम शिक्षण चांगल्या पदाच्या नोकरीसाठी किती आवश्यक ठरते, हे मुलांना या कमी कालावधीच्या नोकरीमधूनही उमजते आणि पैशाची किंमत कळते, हेही विसरून चालणार नाही.
समर जॉब शोधताना..
०    इंटरनेटवर समर जॉब्जच्या संधी देणाऱ्या अनेक संस्थांची भरपूर माहिती असते. वर्तमानपत्रांतून अशा प्रकारच्या जाहिरातीही झळकत असतात. त्याकडे लक्ष ठेवा.
०    तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायचे आहे, हे आधी पक्कं ठरवा. त्यानुसार ‘समर जॉब’ शोधणे सोपे जाईल.
०    अमुक एक नोकरी करण्यास तुम्ही पात्र आहात, हे सुस्पष्ट करणारा सीव्ही अथवा रिझ्युम नेटकेपणाने बनवा.
०    झळकणाऱ्या जाहिरातींव्यतिरिक्तही अनेक उद्योगसमूह वा करिअरमध्ये ‘समर जॉब्ज’ची संधी असते वा निर्माण होऊ शकते. यासाठी तुम्ही तुमचे नेटवर्क विकसित करणे वा आवडत्या क्षेत्रातील कामाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
समर जॉब्जमधून नक्की काय साध्य होते, तर वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या लोकांशी काम करण्याचा अनुभव मिळतो. मतभिन्नता असताना कसे वागावे, हे कळते. ‘समर जॉब’मुळे कार्यसंस्कृतीशी परिचय होतो. वेळेचे व्यवस्थापन करायला शिकतो. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीच्या व्यक्तींशी कसे जमवून घ्यावे, हे शिकतो. स्वतच्या पैशाचे आणि वित्ताचे व्यवस्थापन कसे करावे, हे शिकता येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Summer jobs

First published on: 30-03-2014 at 01:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×