विविध विद्याशाखांमधील संशोधन संस्थांची सविस्तर ओळख करून देणारे मासिक सदर..
मुंबईची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (ककॅट) ही  पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व तद्संबंधातील भूभौतिकशास्त्र, अवकाश भौतिकी या विषयातील मूलभूत व उपायोजित संशोधन करणारी तसेच पृथ्वीभोवतालच्या वातावरणीय घटकांचा अभ्यास करणारी
१८५ वर्षांचा इतिहास असलेली देशातील अग्रणी संशोधन प्रयोगशाळा आहे. या संस्थेची दोन विभागीय केंद्र व १२ चुंबकीय निरीक्षण प्रयोगशाळा देशात निरनिराळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. १८२६ मध्ये चुंबकीय निरीक्षणशाळा म्हणून स्थापना झालेल्या या संस्थेला १९७१ साली स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला. आता मात्र ही संशोधन संस्था देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत चालविली जाते.
संस्थेची संशोधन केंद्रे
संस्थेचे मुख्य कार्यालय नवी मुंबई पनवेल येथे आहे तर विभागीय संशोधन केंद्रे पुढील ठिकाणी आहेत.
तीरुनेल्वेली (भूभौतिक संशोधन प्रयोगशाळा) इक्वेटोरिअल जिओफिजिकल रिसर्च लॅबोरेटरी – १९९१ मध्ये उघडण्यात आलेल्या संस्थेच्या या केंद्रात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबद्दलची माहिती अद्ययावत यंत्रणेमार्फत सतत मिळवली जाते व तिचा अभ्यासही केला जातो. येथे भूचुंबकत्वविषयक अत्याधुनिक माहिती देणारी पुस्तके व नियतकालिकांचे वाचनालयही आहे.
डॉ. के. एस. कृष्णन जिओमॅग्नेटिक रिसर्च लॅबोरॅटरी, अलाहाबाद – संस्थेचे हे केंद्र २७ मार्च २००८ रोजी कार्यान्वित झाले. येथे या केंद्राचे महत्त्वाचे काम म्हणजे सातत्याने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या मोजमापांची नोंद ठेवणे. प्रामुख्याने पृथ्वीचा खोल अंतर्भाग, वातावरण आणि भूविषयक (सोलर टेरेस्टेरिअल) माहिती मिळवली जाते.  
जिओमग्नेटिक ऑब्झव्‍‌र्हेटरिज (भूचुंबकीय निरीक्षण शाळा) – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची मोजमापे ,चुंबकीय लहरींत  वेळोवेळी होणारे सूक्ष्म बदल या गोष्टींची नोंद येथे ठेवली जाते. हा माहितीचा साठा जमिनीखालील हालचाली उदा. भूकंप, ज्वालामुखी
यांच्या शक्यतांचे परीक्षण, इतर भूभौतिक संशोधन यांमध्ये वापरला जातो.
संस्थेची पहिली जिओमग्नेटिक ऑब्झव्‍‌र्हेटरी कुलाबा (मुंबई)
 येथे १८४१ मध्ये स्थापण्यात आली. सध्या अलिबाग, गुलमर्ग, राजकोट, शिलाँग, सिलचर, तीरुनेवेल्ली, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, जयपूर, नागपूर, अलाहाबाद, पॉन्डीचेरी येथे अन्य निरीक्षणशाळा आहेत.
वर्ल्ड डाटा सेंटर ऑफ जिओमॅग्नेटिझम – हा आय.आय.जी.एम (ककॅट)चा एक भाग असून, येथे १५० वर्षांपेक्षा जास्त काळाची भूचुंबकत्वविषयक माहिती जतन केलेली आहे. जगभरातील भूचुंबकीय निरीक्षण शाळांतून येथे माहिती संकलित केली जाते. ही माहिती कोणत्याही वैज्ञानिक विधायक संशोधनासाठी उपलब्ध होऊ शकते. सध्या संस्थेच्या मुंबई, कुलाबा येथील इमारतीत हे माहिती केंद्र स्थित आहे. १८२६ सालच्या या वास्तूला सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा दिला गेला आहे.
संस्थेतील सेवासुविधा
आयआयजीतील वाचनालयात भूचुंबकत्वविषयक र्सवकष आणि दुर्मीळ माहितीचा संग्रह आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र), अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (खगोल भौतिकी), मिटरोलॉजी (हवामानशास्त्र) या विषयांवरील पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत. देशातील चुंबकत्वविषयक नोंदींची १८४५ पासूनची माहिती येथे अस्तित्वात आहे. पुस्तके आणि नियतकालिके, संस्थेतील शास्त्रज्ञांची प्रकाशित संशोधने, नकाशे, वैज्ञानिक अहवाल असे मुबलक वाचन साहित्य येथे उपलब्ध आहे.
संस्थेने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये धारवाड, बस्तर भागातील पृथ्वीच्या पृष्ठभागावरील चुंबकीय विद्युत क्षेत्रातील बदलांचा अभ्यास, पृथ्वीभोवतालच्या वातावरणीय बदलांचा परिणाम आणि अभ्यास, देशाच्या उत्तरपूर्वेकडील भूकंप प्रवण भागांचा (उदा. आसाम) भूभौतिक दृष्टिकोनातून अभ्यास, भूकंपीय निरीक्षणे, जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भूस्तर रचनेत झालेल्या बदलांचा अभ्यास. हे सर्व प्रकल्प केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग, समुद्र विज्ञान विभागाकडून प्रायोजित केले आहेत.
भारतीय अन्टार्टिक संशोधन मोहिमेत प्रारंभापासूनच ‘आयआयजीएम’चा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. दक्षिण गंगोत्री येथे संस्थेने कायमस्वरूपी निरीक्षण प्रयोगशाळा उभारली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चुंबकीय क्षेत्रातील सूक्ष्म बदल येथे नोंदले जातात.
संस्थेतील संशोधनाच्या संधी
‘आयआयजीएम’ संस्थेकडून भौतिकशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूविज्ञान या विषयात पाच वर्षांचा संशोधन शिक्षणक्रम राबवला जातो. भौतिकशास्त्र, गणित विषयातील एम.एस.सी प्रथम वर्ग, भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी तर गणित, भौतिकशास्त्र, भूभौतिक शास्त्र(जिओफिजिक्स), भूस्तर शास्त्र यांतून प्रथम वर्ग एम.एस.सी पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी, (जिओलॉजी) भूविज्ञानातील संशोधनासाठी पात्र असतात. गेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही मुलाखत चाचणीसाठी निवडले जातात. भूविज्ञानातील संशोधन प्रशिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी वेगळी लेखी परीक्षा घेतली जाते. हा शिक्षणक्रम मुंबई, कोल्हापूर, पुणे विद्यापीठांशी सलग्न असल्याने त्या विद्यापीठांचे नियमही प्रवेशासाठी लागू होतात. निवड झालेल्या संशोधन प्रशिक्षणार्थीना सुरुवातीस १२ हजार रु. मासिक विद्यावेतन दिले जाते. दोन वर्षांतील शैक्षणिक मूल्यांकनानंतर ही रक्कम १४ हजार रु.पर्यंत वाढू शकते, तसेच पुस्तक निधी म्हणून वार्षकि सहा हजार रु. दिले जातात. संस्थेतून कोणत्याही संशोधन विषयातून पी.एच.डी. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची संधी दिली जाते. त्यासाठीची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे –
*    इच्छुक उमेदवाराला प्रथम संशोधन विषयाची व त्यातील प्रकल्पाची (प्रोजेक्ट) निवड करावी लागते.  
*    आय.आय.जी.च्या संचालकांकडे  प्रवेशासाठी रीतसर अर्ज करावा लागतो.
*    स्वतची पात्रता सिद्द करण्यासाठी संशोधनाची वैशिष्टय़े आणि हेतू याबद्दल प्रकल्प शास्त्रज्ञांशी चर्चा करावी लागते.
संस्थेतील नोकरीच्या संधी  
असोसिअेट प्रोफेसर, रीडर, फेलो, टेक्निकल ऑफिसर, सीनिअर टेक्निकल असिस्टन्ट, असिस्टन्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, असिस्टन्ट  या पदांसाठी सध्या संस्थेने अर्ज मागविले आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.iigm.res.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, अर्ज देण्याची अंतिम तारीख १२ फेब्रु.२०१३ आहे.
संस्थेतील संशोधन कार्य
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विद्युत चुंबकीय क्षेत्र व त्यात होणारे सूक्ष्म नसíगक बदलांचा अभ्यास या प्रकारच्या सर्वेक्षण पद्धतीचा वापर ऐंशीच्या दशकात सुरू झाला. उदा. हिमालयीन पर्वतीय भाग, नर्मदा सोन, धारवाड, बुंदेलखंड या परिसरात सुरू असलेले परीक्षण.
टेकटोमॅग्नेटिक स्टडी – पृथ्वीच्या अंतर्भागातील भूरचनेच्या परिवर्तनाशी संबंधित (उदा. भूकंप, ज्वालामुखी उद्रेक) असलेल्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांचा अभ्यास म्हणजे टेकटोमॅग्नेटिक स्टडी. सन २००२ पासून मध्यप्रदेशातील  जबलपूर-कोसमघाट या भूकंप प्रवण क्षेत्रातील सुरू असलेला भूरचनेतील बदलांचा अभ्यास हे याचेच उदाहरण आहे. मग मित्रहो, पृथ्वीच्या पोटात शिरून आपल्या प्रगतीचा मार्ग शोधायचा असेल तर या विषयांतील करिअर संधींचा विचार करायला हरकत नाही. संस्थेबद्दलच्या अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.iigm.res.in
संस्थेच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की संस्थेत संशोधन विभाग, प्राध्यापकीय, शैक्षणिक विभाग, सर्वच स्तरांवर मराठी टक्का अगदीच नगण्य आहे. १८५ वष्रे जी संशोधन संस्था महाराष्ट्राच्या राजधानीत अस्तित्वात आहे अशा विषयातील संशोधन मराठी युवकयुवतींकडूनच इतक्या मोठय़ा प्रमाणात दुर्लक्षिले गेले असेल तर ती आपल्या सर्वासाठी खेदाची बाब आहे. यामागे माहितीचा अभाव हेच प्रमुख कारण असावे.    ल्ल
geetazsoni@yahoo.co.in